‘सखाराम बाइंडर’ची लढाई लालनताई लढल्या, जिंकल्या आणि त्यातून तावूनसुलाखून निघाल्यावर त्यांच्या भूमिकांचा कसही वाढला..

सोवळ्या, मध्यमवर्गीय प्रेक्षकांना मान्य असलेल्या, शिष्टसंमत चाकोरीत फिरणाऱ्या मराठी रंगभूमीला साधारण पाच दशकांपूर्वी ‘सखाराम बाइंडर’मधील चंपा नामक ज्वाळेने लपेटले होते. तोपर्यंत मराठी नाटय़कर्मी आणि प्रेक्षकांत शाबूत असलेला परस्परांच्या जीवनजाणिवांना, आदर्श मूल्यांना जराही धक्का न देण्याचा समंजस अलिखित करार या आगीत राख झाला. रंगभूमी वयात आली. त्याकाळी लैंगिक जाणिवांबद्दल बोलणे, प्रश्न उपस्थित करणे हे अब्रह्मण्यम होते. अशा काळात विजय तेंडुलकरांनी ‘सखाराम बाइंडर’, ‘बेबी’, ‘गिधाडे’, ‘घाशीराम कोतवाल’सारख्या नाटकांतून समाजातील अस्पर्शित अनैतिकतेला, दडपलेल्या विकृतीला वाचा फोडली. साहजिकच त्यामुळे आपल्या सोवळ्या, संस्कृतिरक्षक समाजाचे जणू वस्त्रहरणच झाले. ‘बाइंडर’मधील सखाराम हा सामाजिक विकृतीचे प्रतीक. तो लग्नसंस्था, कुटुंब, धार्मिकता अशा कुठल्याही बंधनांना न मानणारा. कोणत्याही मार्गाने लैंगिक भूक भागवणे हाच त्याचा धर्म. परित्यक्ता स्त्रियांना आसरा देऊन त्यांच्याकडून हे सुख मिळवणारा हा बेमुर्वतखोर गृहस्थ. त्याचा त्या स्त्रीमधला रस संपला की त्यांना आपला मार्ग मोकळा असे. मग पुन्हा नवी मादी. अशात लक्ष्मी आणि चंपा अशा परस्परविरोधी धारणा, स्वभाव व वृत्तीच्या स्त्रिया त्याच्या आयुष्यात येतात आणि त्याचे आयुष्य ढवळून निघते, त्याची ही गोष्ट. लक्ष्मी सतीसावित्री. परंतु तरी तिचा नवरा तिला घराबाहेर काढतो. ती सखारामकडे येऊनही आपल्या पहिल्या नवऱ्याच्या आठवणींचे कढ काढत असे. तर चंपा संसारातील कटू अनुभवांनी नि:संग झालेली. नवऱ्याविनाची स्त्री म्हणजे सार्वजनिक पाणपोई हे तिच्या लेखी नागडे सत्य. त्यामुळे अनेक गिधाडांचे भक्ष्य होण्यापेक्षा सखारामसारख्या एकालाच आपल्या देहाचे लचके  तोडायला देणे इष्ट- या निष्कर्षांप्रत ती आलेली. अशा नि:संग चंपाची भूमिका सत्तरच्या दशकात साकारायला कुणी अभिनेत्री पुढे येणे हे कठीणच. पण लालन सारंग यांनी ते आव्हान स्वीकारले.

तत्कालीन मध्यमवर्गीय धारणांना आव्हान देणाऱ्या या नाटकाने न भूतो न भविष्यति अशी खळबळ माजली. शिवसेनेचे मनोहर जोशी प्रभृती कथित संस्कृतिरक्षकांनी नाटकाचा प्रयोगच उधळून लावला. सखाराम हा जसा विकृतीचे प्रतीक, तसे हे संस्कृतिरक्षक दांभिकतेचे प्रतीक. या नाटकाने दोघांना समोरासमोर आणले. त्या वेळी- आणि खरे तर आताही- सेन्सॉर ही यंत्रणा दांभिकांहातीच असल्याने ‘सखाराम’च्या प्रयोगांवर बंदी आली. मात्र, कमलाकर आणि लालन सारंग या दाम्पत्याने या अन्याय्य बंदीविरोधात न्यायालयात दाद मागितली. मोर्चे, आंदोलने, खटले यांमुळे ‘सखाराम’ने एकच वादळ निर्माण केले. परंतु कमलाकर आणि लालन सारंगांनी या सगळ्यास तोंड देऊन अखेर ही लढाई जिंकली. लालन सारंगांना ती व्यक्तिगत जीवनातही लढावी लागली. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न झाले. आश्चर्य नाही, पण त्यांचे चारित्र्यहनन करण्यात महिलावर्गही मागे नव्हता. परंतु न डगमगता त्यांनी या साऱ्याला तोंड दिले. दुसरी तिसरी स्त्री असती तर ती खचून गेली असती. परंतु खंबीर वृत्तीच्या लालनताई कमलाकर सारंगांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढल्या आणि अखेरीस त्यांचा विजय झाला. हा केवळ ‘सखाराम बाइंडर’चा लढा नव्हता, तर तो अभिव्यक्ती आणि कलावंतांच्या स्वातंत्र्याचाही होता.

‘सखाराम’ने लालनताईंना रंगकर्माकडे व स्वत:कडेही पाहण्याची नवी दृष्टी दिली. आपल्यातील क्षमतांचा प्रत्यय त्यांना यानिमित्ताने आला. रंगकर्मी म्हणून वैचारिक खोली प्राप्त झाली. त्यातून त्यांना भूमिका स्वीकारताना कलाकृतीचा सांगोपांग विचार करण्याची शिस्त लागली. व्यक्तिगत जीवनातही त्या कणखर झाल्या. ‘सखाराम’ने त्यांची बोल्ड अभिनेत्री अशी प्रतिमा निर्माण झाली. पुढे त्यांनी या धर्तीच्या भूमिका ‘बेबी’ आणि ‘जंगली कबुतर’मध्येही साकारल्या. व्यक्ती आणि समाजातील दडपलेल्या लैंगिक जाणिवा, विकारवासना, त्यांचा विकृत उद्रेक आणि त्यातून होणारा विध्वंस हा तेंडुलकरांच्या नाटकांतला आशय. तो प्रभावीरीत्या पोहोचविण्याचे धारिष्टय़ ‘सखाराम’नेच आपल्याला दिले, असे लालनताईंनी म्हटले आहे.

लालनताईंनी विविध प्रकृती व प्रवृत्तीच्या भूमिका जाणीवपूर्वक स्वीकारल्या आणि त्या समर्थपणे साकारल्या. त्यांत श्री. ना. पेंडशांच्या ‘रथचक्र’मधील नवऱ्यापश्चात प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना हिमतीने वाढवणारी ‘ती’ आणि ‘कमला’तील सरिता या प्रमुख. इंडियन एक्स्प्रेसमधील अश्विनी सरीन या पत्रकाराने स्त्रियांच्या विक्रीच्या प्रथेचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एका अशिक्षित, आदिवासी स्त्रीला विकत आणून तिला पत्रकार परिषदेत सादर के ले. ही घटना वादळी ठरली. तीवर तेंडुलकरांनी लिहिलेल्या ‘कमला’ नाटकात लालनताईंनी पत्रकाराच्या पत्नीची- सरिताची भूमिका के ली होती. ती आदिवासी स्त्री या पत्रकाराच्या पत्नीला सहज विचारते, ‘तुला कितीला विकत घेतले?’ हा या नाटकाचा परमोच्च बिंदू. तिच्या या प्रश्नाने सरिता निरुत्तर होते. यातला लालनताईंचा अभिनय त्यांच्यातील कलावंताची उंची दाखवीत असे. ‘संभूसांच्या चाळीत’, ‘कालचक्र’, ‘खोल खोल पाणी’, ‘सूर्यास्त’ यांसारखी भिन्न प्रवृत्तीची नाटके त्यांनी केली. त्यामागे रंगभूमीबद्दलचा काहीएक विचार होता. नाटक व्यक्तिगत आयुष्यात घुसल्याने होणारे मानसिक क्लेश, अवहेलना, दुभंगावस्था या साऱ्यास तोंड देत त्यांनी आपले रंगकार्य जिद्दीने सुरू ठेवले.

लालन आणि कमलाकर सारंग हे ‘कलारंग’ या आपल्या संस्थेची नाटके  मुख्य धारा रंगभूमीवर सादर करीत होते; तरीही त्यांची नाळ प्रायोगिक रंगभूमीशी कायम होती. त्यांनी ‘स्टील फ्रेम’, ‘पोलीसनामा’ आदी वेगळ्या आशय-विषयांवरची नाटकेही त्याच असोशीने केली. छबिलदास चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. लालन सारंग यांनी आपल्या नाटय़संस्थेची व्यावहारिक जबाबदारीही लीलया पेलली. सर्जन आणि व्यवहार या गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत, हे गृहीतक त्यांनी खोटे पाडले. त्यांनी काही नाटकांचे दिग्दर्शनही केले. लालनताईंनी आपल्या कारकीर्दीचा मागोवा घेणारा ‘मी आणि माझ्या भूमिका’ हा कार्यक्रम पुढे सादर के ला. त्यात विविध भूमिकांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या भूमिकांनी आपल्याला काय दिले, इत्यादीचा त्या अभ्यासू ऊहापोह करीत. त्यांनी ‘सामना’ आदी चित्रपटांतून केलेल्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याखेरीज दूरचित्रवाणीवर त्यांनी उल्लेखनीय काम केले. या सगळ्या मुशाफिरीचा परामर्श घेणारे त्यांचे लेखन त्यांची उत्कटता दाखवून देते.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात परस्परविरोधी अंगांचे चमत्कारिक मिश्रण होते. एकीकडे त्या उत्तम गृहिणी होत्या. त्याचवेळी त्या निर्भीड अभिनेत्रीही होत्या. आपल्या कारकीर्दीकडे आणि जगण्याकडे तटस्थतेने पाहण्याची अलिप्तता त्यांच्या ठायी होती. त्या उत्तम सुगरणही होत्या. त्यांच्या या चतुरस्रतेचा सन्मान विविध पुरस्कारांनी झाला. कणकवली येथील नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. आपले पती कमलाकर सारंग यांचे जन्मस्थान असलेल्या मालवणशी आपले ऋणानुबंध याद्वारे दृढ व्हावेत अशी लालनताईंची हे अध्यक्षपद स्वीकारण्यामागची भूमिका होती. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे प्रतिबिंब दिसते.

अशी ही विचारी, खंबीर, कर्तृत्वसंपन्न अभिनेत्री आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. गतवैभवाच्या स्मृतिरंजनात रंगलेल्या रंगभूमीच्या प्रेक्षकांना त्यांनी आधुनिक काळाशी जोडले. त्या अर्थानेही त्या ‘बाइंडर’ ठरतात. अशा बेडर ‘बाइंडर’ बाईंना लोकसत्ता परिवारातर्फे आदरांजली.

Story img Loader