भारतीय इतिहास, संस्कृती, लोकसाहित्य, प्राच्यविद्या यांसारख्या असंख्य विषयांत रा. चिं. ढेरे यांनी केलेले संशोधन थक्क करणारेच आहे..

एखाद्या विषयात रमून जाता जाता नवाच विषय हाती यावा आणि मग पुढील काही काळ त्या नव्या विषयाची साधने जमा करण्यात जावीत. पुन्हा मागे वळून आधीचे संशोधन पुरे करावे आणि नव्याचा शोध घेत राहावा, असा जीवनक्रम हेतुत: घडवून आणणारे ढेरे हे सहेतुक संशोधक होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

वयाच्या पन्नासाव्या वर्षी केलेल्या कामाचे कौतुक करणारा गौरवग्रंथ प्रकाशित होण्याचे भाग्य डॉ. रामचंद्र चिंतामणी ढेरे यांना लाभले. याचा अर्थ त्या वयापर्यंत त्यांनी केलेले काम सार्वजनिकरीत्या नोंद घेण्याजोगे आणि त्याबद्दल काही भाष्य करावे, असे होते. असे असूनही स्वत: ढेरे यांना त्याबद्दल कधी कोणी बोलताना पाहिले नाही. त्यांचे चित्त आणि देह अखेपर्यंत एकाच फक्त पुस्तकांमध्ये साठून राहिलेल्या नवनव्या संशोधनात साठून राहिला होता. हे सारे घडून येण्यासाठी त्यांच्यापाठी कोणतीच पूर्वपीठिका नव्हती, ना कोणाचा बौद्धिक आधार. कळत्या वयात इतरांप्रमाणे लागलेला कवितेचा छंद संशोधनातील सर्जक शक्यतांसाठी उपयोगात येईल, याची पुसटशी जाणीवही नसलेल्या वयात ढेरे यांनी या क्षेत्रात पाय रोवून उभे राहायचे ठरवले. पैसे हे फक्त शरीराच्या दैनंदिन कर्मासाठी आवश्यक असतात, याचे भान वयाच्या पाचव्या वर्षीच मातापित्यांचे छत्र हरवलेल्या ढेरे यांना कुठून आले असेल? जगण्यासाठीची ही आवश्यकता पार पाडता पाडता होणारी दमछाक पुस्तकांच्या शब्दाशब्दांत विखुरलेल्या प्रतिभेच्या दर्शनाने विरून जाण्याएवढी स्थितप्रज्ञता त्यांच्या ठायी आली, कारण त्यांच्यामध्ये दडून राहिलेले योगीपण. निरलसता हा गुण मुद्दामहून अंगी बाणवता येत नाही. रा. चिं. ऊर्फ अण्णांच्या व्यक्तिमत्त्वात तो खोल दडून बसला होता. त्यामुळे आपला प्रत्येक श्वास नव्या कल्पनांचा ध्यास पुरा करण्यासाठी पूर्णाशाने कसा उपयोगात आणता येईल, याचाच घोर त्यांना सतत लागून होता. वयाच्या एकविसाव्या वर्षी संशोधनासाठी जाहीर केलेल्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या अण्णांनी ती मिळवण्यासाठी संशोधन केले खरे, परंतु त्यांच्या भावी आयुष्याचा गाभाच त्यातून त्यांच्या हाती आला. काय करायचे, कसे करायचे या विवंचनेत असणारे अनेक जण निवृत्तीची वाट पाहत असतात. अण्णांना हे ऐन तारुण्यात उमगले. त्यातून लहानपणी सुटलेल्या गावाकडील सांस्कृतिक जीवनातील आद्र्रता, आजोबांकडून मिळालेला ज्ञानसाधनेचा वसा यांच्या आधारावर वयाच्या तेराव्या वर्षी सारे दारिद्रय़ पोटी घेऊन बहिणीसह शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अण्णांना आयुष्यभर आधार होता, तो पुस्तकांचा.

संशोधनासारख्या शास्त्रकाटय़ाच्या कसोटीच्या क्षेत्रात प्रज्ञेला आणि सर्जनाला केवढा वाव असू शकतो, हे त्यांच्या सहवासात आलेल्या कुणासही सहज कळत असे. बोलता बोलता, ते अलगदपणे इतक्या विषयांबद्दल आणि त्यातील संशोधनाच्या दिशांबद्दल बोलायचे, की त्याची यादी केली असती, तर पुढील काही दशके, शतके संशोधकांसाठी आयती सामग्री मिळाली असती. लोकजीवनाबद्दल अपार जिव्हाळा असल्याने त्यातून नवे विषय मिळू शकतात, त्याच्या खोलात गेले तर हाती काही निश्चित असे लागू शकते, याचे भान डॉ. ढेरे यांना होते. त्यामुळे विविध प्रांतांमधल्या लोकजीवनातील समजुती, तेथील उपासनांची वैशिष्टय़े, तेथील कला, स्थळमाहात्म्य, नावे, आडनावे, जाती अशा सगळ्याच बाबी त्यांच्यासाठी संशोधनाची मऊमुलायम शस्त्रे बनली. १९६२च्या पुरात पुण्यातील नदीकाठच्या शनिवार पेठेतील घरात साठवून ठेवलेली ग्रंथसंपदा वाहून गेल्यानंतर झालेल्या अशक्यप्राय वेदनांनी विव्हल होणारा हा संशोधक प्रसंगी पुस्तके खरेदी करण्यासाठी पत्नीच्या दागिन्यांनाही गहाण ठेवत होता. त्या माऊलीला त्याचेच अप्रूप जास्त वाटले, म्हणून तर संशोधनाची ही दुस्तर यात्राही अलगदपणे पार करता आली. संस्कृती हा विषय शब्दांच्या चिमटीत पकडणे फारच अवघड. त्यातून या शब्दाला असलेल्या नानाविध कंगोऱ्यांनी निर्माण केलेली जंजाळे हळूहळू उलगडत बसण्यासाठी कमालीचा निग्रह अंगी असणे आवश्यक. परंपरांचा अभ्यास करीत असतानाच, वर्तमानातील जीवनव्यवहारात त्याचे उमटलेले प्रतिबिंब न्याहाळणेही तेवढे आवश्यक असते. या परंपरांना जगण्याशी जोडून घेताना निसटलेल्या दुव्यांची जोडणी करावी लागते आणि त्यातून काही शोध घ्यावा लागतो. ढेरे यांनी हे सारे अतिशय कष्टाने आणि प्रेमाने केले.

एकेक व्यक्ती म्हणजे संस्था असे रूप महाराष्ट्रात काळाच्या प्रत्येक तुकडय़ात दिसून येते. इतिहासाचार्य राजवाडे, धर्मानंद कोसंबी, दि. के. बेडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या अनेकांनी संस्थात्मक पाठबळ नसताना संशोधनाचे विशाल कार्य केले. संस्कृतीच्या समग्रतेचे भान सुटू न देता, त्यातील एकेका विषयावर सारे आयुष्य खर्ची घालत या सगळ्यांनी हाती घेतलेला वसा डॉ. ढेरे यांच्या हाती सोपवला. ढेरे मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा सर्वागांनी धांडोळा घेताना, दैवतांचा, त्यांच्याबद्दलच्या मिथकांचा, संतसाहित्याचा, वारशाने आलेल्या कथाकल्पनांचा, अनेक अज्ञात ग्रंथकारांचा अभ्यास ढेरे यांनी केला. विठ्ठलाच्या महासमन्वयाच्या रूपात, लज्जागौरीच्या आणि खंडोबाच्या नवदर्शनात हे संशोधन समाविष्ट झाले. पण ढेरे यांची संशोधनाची भूक अचाट म्हणावी अशी. एखाद्या विषयात रमून जाता जाता नवाच विषय हाती यावा आणि मग पुढील काही काळ त्या नव्या विषयाची साधने जमा करण्यात जावीत. पुन्हा मागे वळून आधीचे संशोधन पुरे करावे आणि नव्याचा शोध घेत राहावा, असा जीवनक्रम हेतुत: घडवून आणणारे ढेरे हे सहेतुक संशोधक होते. एकाच वेळी अनेक विषयांनी साद घालावी आणि मन वाऱ्यासारखे भिरभिरावे, अशी गत आयुष्यभराची होती. त्यामुळे हाती येणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून काही उलगड झाल्याने होणारा क्लान्त आनंद मिळवणारा असा संशोधक ढेरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल अन्य प्रांतातील संशोधकांनी आपला हेवा जाहीरपणे बोलूनही दाखवला.

रस्त्यावरच्या जुन्या पुस्तकांपासून ते जुन्या घरांमधील माळ्यांवर धूळ खात पडलेल्या कागदपत्रांवर अण्णांचा फारच जीव होता. सार्वजनिक कार्यक्रमांतून सहभाग घेण्यापेक्षा अशी ठिकाणे त्यांना आनंदाची वाटत. अमुक ठिकाणी तमुक मिळण्याची शक्यता दिसताच त्यांचे डोळे लकाकत. एखाद्या विषयात संशोधन करीत असताना, त्यातून निर्माण होणाऱ्या उपविषयांची साधनसामग्री गोळा करीत राहणे, हा त्यांचा सततचा ध्यास. जमवलेल्या प्रत्येक पुस्तकातील कोणत्या पानावर कोणता संदर्भ आहे आणि त्याला जोडू शकणारा आणखी संदर्भ कोठे आहे, याबद्दल अतिशय सहजतेने विवेचन करणारे डॉ. ढेरे यांच्या रूपाने अर्वाचीन महाराष्ट्राला ऋषितुल्य असण्याची नवी व्याख्या सापडली. लौकिक जीवनाच्या वाटेवर पारलौकिकातच निवांत राहता येते, याचा हा आदर्श वस्तुपाठ येथील मराठी जनांनी समजून घेणे सांस्कृतिक उन्नयनासाठी फारच आवश्यक बनले आहे.

वयाच्या एकविसाव्या वर्षी आसन्नमरण अवस्थेतही ढेरे यांना १९५१ साली सुचलेली ही कविता, त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू सांगणारी ठरते..

माझ्या क्षयी फुप्फुसांना

हवा अक्षयाचा श्वास,

आणि वितीच्या मेंदूला

हवा अनंताचा ध्यास!

परी आकाराची कारा

कशी सरावी क्षरावी,

आणि अ-क्षराची सुरा

कशी अक्षरी भरावी?

राष्ट्रउभारणी, अस्मिताशोध असा कोणताही बाह्य़ हेतू न ठेवता ‘अ-क्षराची सुरा’ भरण्याचा अनंताचा ध्यास अण्णांनी पुढल्या आयुष्यात घेतला. तो तडीसही नेला. डॉ. ढेरे यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

 

Story img Loader