केवळ संशयानेच माणसे एकमेकांचा जीव घेऊ लागली असतील तर अशा देशाविषयी, त्या देशांतील व्यवस्थांविषयी काय अर्थ निघेल..

तशी अलीकडची गोष्ट. आपल्याकडे अचानक गणपती दूध पिऊ लागले तेव्हाची. त्या वेळी जो तो खुलभर दूध घेऊन आपल्या दिसेल त्या मूर्तीला ते पाजू लागला आणि गणपती दूध कसा पितोय ते दुसऱ्याला सांगू लागला. मग दुसरा तिसऱ्याला. आणि तिसरा चौथ्याला..हे लोण देशभर इतके वेगात पसरले की तेव्हाच्या १०० कोटींच्या भारतातल्या साधारण ९० कोटींनी मातीच्या, शाडूच्या, काळ्या दगडाच्या, पितळ्याच्या, संगमरवराच्या गणेश मूर्तीना पाजण्यात लाखो लिटर दूध वाया घालवले. निश्चित सांगायचे तर ही घटना आजपासून साधारण २३ वर्षांपूर्वी, १९९५ च्या सप्टेंबरातली. गणपती दूध पिऊ लागले ही ‘बातमी’ त्या वेळी वाऱ्यासारखी देशभर पसरली. तिची ताकद इतकी होती की महाराष्ट्राचे गणेशप्रेमी कोहिनूर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीदेखील ‘वर्षां’वरील गणपतीस दोन घोट घ्यायला लावले. मुख्यमंत्रीच पाजत आहेत म्हटल्यावर प्यायलाही असेल तो बापडा दूध. (साक्षात पंत मनोहर जोशी आपल्या हाताने काही पाजत आहेत हे पाहून गणपतीचे डोळे भरून आले होते, असे म्हणतात. खरे तर त्या वेळी दूध पिणाऱ्या गणपतीपेक्षा कोणाला तरी काही तरी देणाऱ्या पंतांनाच पाहायला वर्षांवर जनसमुदाय जमला होता, म्हणे. त्यातले बरेचसे शिवसैनिक होते, अशीही बातमी होती. असो. ) त्याआधी आणीबाणीनंतरच्या काळात अंधेरे में एक प्रकाश असलेल्या जयप्रकाशांच्या निधनाची ‘बातमी’ही अशीच वाऱ्यासारखी पसरली. आकाशवाणीनेही त्या वेळी तीस दुजोरा दिला (ब्रेकिंग न्यूज देणारे टीव्ही जन्मायचे होते तेव्हा) आणि त्यामुळे देशभरातील कार्यालये सोडून दिली गेली. यथावकाश सर्वानाच उमगले जयप्रकाशजी सुखरूप आहेत. त्या वेळी भारतीयांच्या मानसिकतेवर भाष्य करताना बीबीसीचे भारतातील प्रतिनिधी मार्क टली म्हणाले.. ‘‘भारतात अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा अफवा पसरण्याचा वेग अद्भुत आणि अफाट आहे. त्याच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही’’ आणि हे सर्व व्हॉट्सअ‍ॅप आणि समाजमाध्यमे नावाची डोकेदुखी जन्मास यायच्या आधी. दूधपित्या गणपतीच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप आदी असते तर काय हाहाकार उडाला असता याची आता कल्पनाही करवत नाही.

तेव्हा, ज्या देशात गणपती दूध पिऊ शकतो त्या देशात मुले पळवणारी टोळी देशभरात सर्वत्र एकाच वेळी असल्याची बातमी छातीठोकपणे एकमेकांना सांगितली जात असेल तर त्यात आश्चर्य वाटायचे कारणच काय. मुले पळवणाऱ्यांच्या तुलनेत गणपती भाग्यवान. कारण त्यात कोणाचा जीव तरी गेला नाही. दूध पिऊन पिऊन गणपतीस अजीर्ण झाले असेल तेवढेच काय ते. आजमितीस या ताज्या मुले पळवणाऱ्यांच्या संशयकल्लोळात देशातील ९ राज्यांत २७ बळी गेले आहेत. तरीही हा समाजमाध्यमांतील संशयात्मा शांत होण्याची लक्षणे नाहीत. किती भयानक आहे हे? केवळ संशयानेच माणसे एकमेकांचा जीव घेऊ लागली असतील तर अशा देशाविषयी, त्या देशांतील व्यवस्थांविषयी काय अर्थ निघेल? एवढे होऊनही यावर सरकारची प्रतिक्रिया काय? तर अफवा ज्या माध्यमातून पसरतात त्या व्हॉट्सअ‍ॅपला तंबी देणे. जणू काही व्हॉट्सअ‍ॅप स्वत:च संदेश तयार करते आणि एकमेकांना पाठवत बसते. किती हे सुलभीकरण?

पण त्यास इलाज नाही. विवेकशून्य समाजात हे असेच होत असते. स्वत:च्या मेंदूनामक अवयवाचा वापर कमीतकमी कसा करावा लागेल याचेच धडे जर नागरिकांना दिले जात असतील तर आलेला संदेश पुढे पाठवायच्या आधी नागरिक विचार करण्यात स्वत:ला शिणवतील तरी का? आणि कशाला? मग तो संदेश गणपतीने दूध प्यायल्याचा असेल किंवा कोणी तरी कोणाची तरी मुले पळवल्याचा असेल. आधुनिक मानसशास्त्रात या वृत्तीसोडटड असे म्हणतात. म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. मनाने, विचाराने हलक्या असणाऱ्या व्यक्तींच्या मनी ही अशी भीती असते. न जाणो आपण मागे राहू. गणपती दूध पितो.. मग आपल्याला माहीत असायलाच हवे आणि आपल्या गणपतीने ते प्यायले इतरांना कळवायलाच हवे..इतरांच्या आधी. मुले पळवणारी टोळी आहे..मग त्याची माहिती आपल्याला असायलाच हवी आणि आपल्याकडून दोनपाच जणांना सावध करण्याचे पुण्यकर्म व्हायलाच हवे. हा तो मानसिक आजार. यातून प्रत्यक्षात झुंडी तयार न होताच झुंडीचे मानसशास्त्र कामी येते. माणसे एकेकटी असूनही झुंडीने निर्णय घेतात. तशीच वागतात.

तेव्हा निरोप पाठवण्याचे काम करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपसारख्यांना दरडावणे हा त्यावर उपाय खचितच नाही. ज्या हातांनी व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवला जातो त्या हातांचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूंना समजवावे लागते. हे काम एकटय़ादुकटय़ाकडून एकदोनदा करून होणारे नाही. समाजाची विचार करायची क्षमता त्यासाठी घडवावी लागते. आपल्याकडे घोडे पेंड खायला लागते ते याच मुद्दय़ावर. कारण एकदा का समाजाला विचार करायला शिकवले की फक्त अमुकतमुकचाच विचार करा किंवा करू नका..असे सांगता येत नाही. आणि परत नुसता विचार करूनही मामला संपत नाही. विचारांतून प्रश्न निर्माण होतात. म्हणजे एका संकटातून दुसरे. प्रश्न निर्माण झाले की त्याची उत्तरे द्यावी लागतात. ती मिळेपर्यंत मग प्रश्नांची सरबत्ती होत राहते. इतके सगळे हे विचार करण्याने होते. ते न झेपणारे आहे. कारण एकदा का विचार आणि त्यातून प्रश्न विचारण्याची सवय लावली की कोणीही काहीही प्रश्न विचारू शकेल. अशा वातावरणात मग ‘गप्प बसा’ संस्कृतीस तिलांजली द्यावी लागेल. खालच्याने वरच्यास प्रश्न न विचारणे म्हणजे ही गप्प बसा संस्कृती. चिरंजीवांनी तीर्थरूपांस काही विचारावयाचे नाही, विद्यार्थ्यांनी गुरुजनांस प्रश्न विचारावयाचे नाहीत, कनिष्ठ कारकुनाने साहेब सांगेल ते बिनबोभाट, काहीही प्रश्न न विचारता खाली मान घालून करायचे आणि स्वयंसेवकाने..असो.

याचा मथितार्थ इतकाच की आपले वरिष्ठ जे आदेश देतील त्याची पूर्तता कनिष्ठाने डोके नावाच्या अवयवाचा कमीतकमी वापर करून करावयाची. पिढय़ान्पिढय़ा असेच सुरू असल्याने आपल्याकडे प्रत्येकाचा जन्म होताना ही सवय रक्तातूनच येते. त्यामुळे आपण प्रश्न न विचारणाऱ्यांचा देश आहोत. कमी वापरामुळे एखादा अवयव जसा झडून गेला तशीच कमी वापरामुळे आपली सामाजिक विचारशक्ती आकसून गेली. म्हणून एकाने काही केले की आपल्याकडे दुसऱ्यास ते करण्यात धन्यता वाटते. आपल्या कोणत्याही शहरांतील कोणताही रस्ता याची साक्ष देईल. या रस्त्यांवर एखाददुसरा जरा काही विशिष्ट पाहतो आहे असे दिसले की येणारेजाणारे आपापली वाहने थांबून, माना वाकडय़ा करकरून तो काय पाहतोय ते पाहू लागतात. भले कोणालाच काही दिसले नाही तरी चालेल. पण आपण पाहायला मात्र हवे. रोगाची बाधा धोक्याच्या पातळीवर गेल्याचे हे लक्षण. ते दूर करायचे तर मूळ आजारास हात घालावा लागेल. हा आजार आहे विचार न करण्याचा. पण ते अनेक संकटांस निमंत्रण देणारे. त्यापेक्षा गणपतीस सुखाने दूध पिऊ द्यावे.. हे बरे. दोनपाच माणसे गेलीच अफवांत तर त्यांचे नशीब म्हणायचे आणि आपल्या मूर्तीस दूध पाजायचे. कसें?

Story img Loader