आम्ही असू लाडकेया सदरातून सहवासात आलेल्या किमान पंचवीस मुलांविषयी लिहिलं; पण ज्यांच्यावर लिहिलं त्यापेक्षा अधिकांवर लिहायचं राहिलं, याची खंत आहे. किती तरी मुलं! ती फार नावारूपाला आली नसतील, पण एवढय़ा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत ती आपलं आयुष्य नीटपणे जगत राहिली. गेली किती तरी र्वष मी त्या मुलांमध्ये राहिले, वावरले. या मुलांनी मला खूप संपन्न केलं तसं त्यांचं आयुष्य पाहताना अनेक प्रश्नही समोर ठाकले.. त्यांच्या उत्तरांचा शोध चालूच आहे..

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

गेलं वर्षभर ‘आम्ही असू लाडके’ या सदरातून सहवासात आलेल्या किमान पंचवीस मुलांविषयी ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीतून लिहिण्याचा योग आला त्यासाठी ‘लोकसत्ता’ला धन्यवाद! धन्यवाद अशासाठी की, वर्षांच्या सुरुवातीला जेव्हा लिहायचं ठरलं, तेव्हा किती तरी मुलांच्या आठवणी मनात गोळा झाल्या. काय, किती आणि कसं लिहू असं होऊन गेलं. निवडीच्या वेळी तर मनाचा अधिकच गोंधळ व्हायला लागला. प्रत्येक मुलाचा किंवा मुलीचा विचार करताना सगळेच हिरो आणि सगळ्याच हिरॉइन आहेत, असं जाणवायला लागलं. त्यांचं व्हावं तेवढं कौतुक झालं नाही, याची खंत वाटली. मग ही संधी घेतली आणि लिहिलं. यानिमित्तानं अनेक वाचकांशी नव्यानं परिचय झाला, हीदेखील जमेची बाजू.

मात्र ज्यांच्यावर लिहिलं त्यापेक्षा अधिकांवर लिहायचं राहिलं, याची खंत आहे. किती तरी मुलं! ती फार नावारूपाला आली नसतील, पण एवढय़ा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत ती आपलं आयुष्य नीटपणे जगत राहिली. रिमांड होममधल्या सूरजची अगदी लहानपणी आई-वडिलांशी ताटातूट झाली. नंतर भावाशी झाली. अगदी लहानपणी रस्त्यावर भटकताना पोलिसांना सापडलेला हा मुलगा. नाव, जातपात, धर्म यापैकी कशाचाही पत्ता नसलेला. भावाचं बोट घट्ट धरून होता. मग पुढे तेही सुटलं काही कारणांनी. आज आयुष्यात स्थिरावलाय. एका मुलाचा बाप झालाय. मुलाच्या रूपानं हरवलेला भाऊच परत आलाय म्हणतो; पण तरीही रोज, अगदी रोज, भाऊ परत येईल म्हणून वाट बघतोय.

फुगे विकणाऱ्या चांदणीलाही शब्दबद्ध करावंसं सारखं वाटायचं. फुगे विकून आपल्या सात-आठ भावंडांचा सांभाळ करणारी ही मुलगी. ‘मैं स्कूल में दाखिल तो नही हो सकती, लेकिन एक बार स्कूल होता कैसा है ये देखना चाहती हूँ’, असं म्हणून समुपदेशकाचं बोट धरून शाळेत आलेली. शाळा बघत होती चांदनी आणि मी तिच्याकडे बघत होते. ही मुलगी पहिल्यांदाच काही वेगळं बघतेय, असं मुळीच वाटत नव्हतं. शाळेचे बारीकसारीक तपशील अगदी रस घेऊन बघणारी चांदनी मला आठवण करून देत होती, महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची. बरोबर दीडशे वर्षांपूर्वी परदेशात गेलेल्या या स्त्रीबद्दल जाणकारांनी लिहून ठेवलंय की, नवथरपणाचा, गोंधळाचा मागमूसही त्या सतरा-अठरा वर्षांच्या मुलीमध्ये दिसत नव्हता. जणू, त्या परिसराची आणि तिची जुनी ओळख असावी. चांदनीनं शाळा बघितली. फळ्यावर एक चित्र काढलं. मग एक दीर्घ सुस्कारा सोडून ती जायला निघाली. जाताना एक फुगा तिला शाळेत आणणाऱ्या समुपदेशकाच्या हातात ठेवून म्हणाली, ‘तुमने मुझे स्कूल दिखाया इसलिए। इसका पैसा नही चाहिए।’ जीवनाची रिकामी झोळी हातात आलेली चांदनी शाळेतून जाता जाता त्या समुपदेशकाला श्रीमंत करून गेली, कायमची.

संधींना वंचित होण्याचं जे प्रमाण आहे ते खरंच भयावह आहे. एकदाच शिकवल्यावर सुरेल तालासुरात गाणं म्हणणारी सुरेखा, एरवी आठवीत असला तरी दोन ओळीही धडपणी न लिहिता आल्यानं सारखा चुळबुळ करणारा, पण रंग व ब्रश हातात आल्यावर तपश्चर्येला बसल्यावर दिसावा तसा रंगकाम करण्यात निमग्न झालेला नागेश. वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत लिहिणं, वाचणं यांच्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असलेली व केवळ सहा महिन्यांत पहिलीची परीक्षा उत्तम तऱ्हेने पार करणारी रुखसाना! नृत्याचा पहिला बोल कानावर पडल्यानंतर विजेच्या गतीने नाचणारा, पण इंग्रजीच्या तासिकेला खाली मान घालून निर्जीवपणे बसणारा राजेंद्र! अशी किती उदाहरणं आसपास दिसतात.

आज शिक्षणाच्या क्षेत्रात झालेल्या संशोधनाने प्रत्येक व्यक्ती ही एकमेवाद्वितीय तर असतेच, परंतु एक असामान्य प्रतिभेचा पैलू तिच्यात असतो, हे सिद्ध केलंय; पण मग अशा प्रतिभेच्या आविष्काराचा अभाव आसपास का दिसत असावा, हा विचार सहजच मनात येतो व त्याची उत्तरंही शोधाविशी वाटतात. गेली किती तरी र्वष मी त्या मुलांमध्ये राहिले, वावरले. ती बहुतांश मुलं ही अतिशय गरीब घरातून तरी आली होती किंवा घर नावाचं छप्पर त्यांच्या वाटय़ाला आलं नव्हतं अशी होती. त्यांच्या वयामुळे त्यांना मुलं म्हणायचं एवढंच. एरवी बालपण (‘रम्य बालपण’ तर फार दूरची गोष्ट) त्यांच्या वाटय़ाला आलंच नव्हतं. जरा समज आली की पैसे कमवायचे हेच त्यांना समजायचं. मला काही वर्षांपूर्वी संस्थेत राहायला आलेला पिंटू आठवतो. रस्त्यावर राहून भिक्षेची याचना करतो म्हणून त्याला आणलं. संस्थेत छान राहायचा. शाळेत जायचा, अभ्यास करायचा; पण कुठल्या तरी आडोशाला वास्तव्य करणाऱ्या आई-बापाला भेटायला दोन दिवस गेला तरी एखाद्या बागेत भीक मागताना दिसायचा. पुढे त्याला तिथं पाठवणं थांबवलं तेव्हा ही समस्या सुटली.

सलग तीन वर्षे पावसानं दडी मारल्यामुळे दुष्काळ पडला म्हणून सोलापूरहून पुण्याला आलेल्या विश्वासचं पुढे काय झालं? इथं आला, मावशीच्या आधारानं राहून सकाळी शाळा आणि दुपारनंतर रात्रीपर्यंत चणे-शेंगदाणे विकण्याचं काम करायला लागला. विश्वासला शिकायची खूप आवड. मावशीच्या घरच्यांचा कडवा विरोध सोसत कित्येकदा वडा-पाववर गुजराण करत त्याने शाळेला जाणं चालू ठेवलं; पण प्रश्न आला चणे, शेंगदाणे विकून कमावलेले पैसे गावी आईला पोहोचविण्यापूर्वी ठेवायचे कुठे? मग एक ‘हितचिंतक’ भेटला. रोज पैसे गोळा करणाऱ्या बँकेत पैसे ठेवतो म्हणाला. काही महिन्यांनी दहा, दहा तास उभ्यानं काम करणाऱ्या विश्वासला पैशाचं अपहरण समजलं. या अविश्वासाला कोवळा विश्वास नाही तोंड देऊ शकला.

या मुलांचा विचार करताना शिक्षणशास्त्रातील असामान्य प्रतिभेचा सिद्धांत पटतो, पण त्यातलं अपुरेपण स्पष्टपणे जाणवतं. या मुलांची प्रतिभा संपवून टाकणारे तर अनेक जण असतात, पण त्याच प्रतिभेला बहरून टाकणारे हात तेवढय़ाच संख्येनं नसतात खरे. दहावीच्या इंग्रजीच्या क्रमिक पुस्तकातील ‘अ‍ॅन अपॉइन्टमेंट विथ गॉड’ हा पाठ शिकवत होते. एका मुलीच्या स्वप्नात प्रत्यक्ष देव येतो. तो तिला दुसरे दिवशी भेटण्यासाठी वेळ आणि जागा सांगतो. मुलगी तिथं जाते, पण तिथं प्रत्यक्ष तिचे काकाच भेटल्यामुळे देवाशी तिची भेट हुकते. असा गमतीदार पाठ होता तो. त्या पाठाच्या शेवटी, ‘देव असता तर आम्हा सर्वाचे त्यानं इतके हाल केले नसते, देव नसतो म्हणून हा पाठ ऑप्शनला टाका’, असं म्हणणारी तेजस्वी कोमल मला आठवते, तर ‘दिवाळीच्या वेळी संस्थेतील मुलांसाठी जुने कपडे घेऊ नयेत, लोकांनी त्यांना नवीन कपडेच दिले पाहिजेत’, असं ठासून सांगणारी (आता डॉक्टर झालेली!) सुचित्रा आठवते. ‘धर्माच्या नावाखाली काही माणसांना एकटं पाडणं चूक आहे’, असं म्हणणारी नजमा डोळ्यासमोर येते. शालान्त परीक्षेच्या वेळी आमच्यापैकी एकाचं घडय़ाळ घेऊन जाणारा, त्या सुरेख घडय़ाळाचा मोह झाल्यावर ते चोरीला गेलं असं खोटंच सांगणारा व पुढे काही वर्षांनी स्वत:ला नोकरी लागल्यावर आपण खोटं बोललो याचा पश्चात्ताप होऊन संस्थेतील एका मुलाला घडय़ाळ घेऊन देणाऱ्या नाथालाही विसरता येत नाही; पण सगळ्यात लक्षात राहिला तो राजेंद्र.

आईनं दोनदा लग्न केल्यावर दोघांही पुरुषांकडून (यांना ‘बाप’ तरी कसं म्हणायचं?) भरपूर मार खाल्ल्यामुळे पळून गेलेला राजेंद्र. त्याला काहीही झालं तरी रडूच यायचं नाही. आजूबाजूला कोणी रडलं की त्याला एवढी मोठी माणसं रडतात का याचं आश्चर्य वाटायचं. मग एकदा संस्थेत असताना मुंबई दूरदर्शनच्या ‘ज्ञानदीप’ कार्यक्रमात त्यानं माझ्यासोबत काम केलं. इतकं उत्कृष्ट काम केलं त्यानं, की बघणारे चकित झाले. त्या भावशून्य दिसणाऱ्या चेहऱ्यापाठी एवढं काही दडलं असेल याची कल्पनाच नव्हती कोणाला. सर्वानी राजेंद्रचं कौतुक केलं. त्याच्यावर अभिनंदनाच्या शब्दांचा वर्षांव झाला. कार्यक्रम झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी राजेंद्र आणि मी संस्थेतल्या बागेत बसलो असताना राजेंद्र रडला, अगदी पोटभर रडला. रडता रडता हसला. राजेंद्र हसला आणि रडला यातच सारं काही आलं. पुढेही (राजेंद्र संस्थेतून बाहेर पडल्यावर) त्याच्या आणि माझ्या भेटीगाठी होत राहिल्या. त्या वेळीही तो न चुकता त्या कार्यक्रमाची आठवण काढायचा. एकच कार्यक्रम त्याच्या मधुर स्मृती राजेंद्रच्या मनात रेंगाळत राहिल्या. एवढंच नाही तर त्यानं मला असंही सांगितलं की, खूप दु:खं सोसणाऱ्या मुलाच्या आयुष्यात त्याचा सहभाग असलेला एखादा कार्यक्रम, एखादं नाटक, एखादं नृत्य अशीच जादू ठरलेल्या आयुष्यात तो हा प्रसंग जपून ठेवतो.

गेल्या वर्षभरातील लिखाणाच्या वेगवेगळ्या प्रसंगांतून एवढं सारं काही आठवलं. मुलांच्या दु:खानं मन हळहळलं. त्यांच्या प्रगतीनं मन आनंदून गेलं. पुन्हा एकदा मुलांसमवेत अधिक काही करू, अशी प्रेरणा मिळाली. बस्स! याहून अधिक काय हवं असतं?

eklavyatrust@yahoo.co.in

(सदर समाप्त)