विकास खेदानं सांगत होता, त्याच्या वर्गात किती तरी हुशार मुली आहेत, पण जवळपास सगळ्यांच्याच मनावर सुंदर दिसण्याचं दडपण आहे. यामुळे या मुली वयात आल्या की त्यांच्या या सजण्या-धजण्यात बुद्धीची चमक कमी होत जाते हे त्यांच्या लक्षातच येत नाही.’’ म्हणूनच जोडीदार निवडताना, रंग-रूप, आर्थिक निकषांऐवजी तो बघणार होता तिचं मोकळं, विचार करणारं मन.
अलीकडेच गडहिंग्लजला जायचा योग आला. विकास तिथं भेटणार नाही, हे माहीत असूनही, ‘एखाद वेळेस भेटेलही काय सांगावं’ असं वाटत राहिलं. कारण विकासची आणि माझी पहिली भेट इथेच गडहिंग्लजला झाली होती. किती र्वष उलटली त्याला? तेव्हा जेमतेम पंधरा वर्षांचा असलेला विकास आज तिशीचा तरुण होता. शासकीय सेवेत फार मोठं पद भूषवत होता.
गडहिंग्लजच्या मुक्कामात विकास मला आठवत राहिला. मोठमोठय़ा डोळ्यात बुद्धिमत्तेची तीव्र चमक असणारा पण त्याहूनही खास म्हणजे त्याच्या डोळ्यात भावनांची इतकी दाटी झालेली असे की, जणू कुठल्याही क्षणी त्या वाहू लागतील. बघणाऱ्यावर त्या डोळ्यांचा प्रभाव इतका तीव्र असे की त्याचा कमालीचा काळाभोर वर्ण, दणदणीत उंची, खांदे किंचित वाकवून सावकाश चालण्याची ढब व पांढरेशुभ्र दात (काळ्या वर्णावर शोभून दिसणारे) यांच्याकडे अभावानेच लक्ष जाई.
विकास मला भेटला तो गडहिंग्लज येथील शिबिरात! आंतरभारतीनं आयोजित केलेलं शिबीर होतं ते. १४ ते १८ या वयोगटांतील मुलांसाठी व तेही खासकरून ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी. विकासही एका गावातून आला होता. आल्या आल्या त्यानं जो नियोजनाचा ‘चार्ज’ घेतला तो शेवटपर्यंत. त्याच्या स्वभावातली लोकशाहीची पहिली चुणूक मला दिसली ती तिथेच. झालं असं की जवळपास पाचशेच्या जवळ शिबिरार्थी असणाऱ्या त्या शिबिरात जेवणाचं खटलं साहजिकच तेवढंच मोठं होतं. शिबिराचे संचालक मुलांनी पानात काही टाकू नये याविषयी कमालीचे जागरूक होते. जेवणाच्या वेळी ते सारखे पंगतीत फेऱ्या मारून आपली ही जागरूकता कडक शब्दात मुलांपर्यंत पोचवत असत. अन्न वाया न घालवण्याविषयी त्यांची ती कळकळ कितीही योग्य असली तरी त्याचा मुलांवर विपरीत परिणाम व्हायचा. पहिल्या एक-दोन दिवसातच (शिबीर दहा दिवसांचं होतं) विकासच्या हे लक्षात आलं असावं.
अतिशय गोड बोलून त्यानं ते काम स्वत:वर घेतलं. विकास पंगतीत फिरायला लागला आणि भोजनाचा आनंद द्विगुणित व्हायला लागला. अशा रीतीनं विकास सर्वाच्या नजरेत भरला. रात्री शतपावली करताना त्याची आणि माझी गट्टी जमली. ‘डोळ्यात बघून शिकवा’ असा विकासचा लाघवी हट्टाग्रह त्या वेळीच माझ्या लक्षात आला. शिक्षक सतत पुस्तकात बघून शिकवतात. मुलं काय करताहेत याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे किती तरी वेळ ते ‘पुस्तकी’ शिकणं नकोसं वाटतं, हा विकासचा मुद्दा असायचा. पण त्याहूनही काही तरी महत्त्वाचं असं त्याला सांगायचं असे. विकास म्हणायचा, मागच्या बाकावरच्या मुलांकडे तर इतकं कमी लक्ष जातं शिक्षकाचं की ती मुलं वर्गात नुसतीच ‘बसतात’, ‘असत’ नाहीत.
या आमच्या चर्चा रात्रीच्या निवांत वेळी चालायच्या. नववीतल्या या मुलाची वैचारिक झेप मोहवून टाकायची. चर्चेत सामील होणारी इतर मुलंही विकासचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायची. एकंदरीत दिवसापेक्षा रात्रीच्या वैचारिक आदानप्रदानात मुलांचं अंतरंग उलगडत जात होतं खरं. पण तरीही विकासचा एक खास पैलू त्या वेळी मला समजला नाही. एका गमतीदार खेळातून तो उलगडायचा होता.
शिबिराच्या पाचव्या दिवशी नुकत्याच कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी ‘शोध जोडीदाराचा’ असा एक वैचारिक खेळ आयोजित केला गेला होता. आपला/ आपली जोडीदार कसा/कशी असावी, आपल्याला कोणाशी विवाह करायला आवडेल यासाठी शिबिरार्थी मुलामुलींना वेगवेगळे प्रश्न दिले होते. त्यासाठी ‘वजनं’ आयोजित केली होती. उदाहरणार्थ भावी जोडीदार पैसे तर खूप कमवतोय पण त्याला एखादं व्यसन आहे.. चालेल की चालणार नाही, या प्रश्नाच्या उत्तराचं एक ठरावीक वजन पारडय़ात पडणार होतं. एकंदरीत ‘वजनदार’ खेळ होता तो. विकासचा अर्थातच या खेळात कमी वय असल्याने समावेश नव्हता. पण खटपट करून तो माझ्यासोबत प्रेक्षक म्हणून आला.
खेळ सुरू झाला. मुलं, मुली मोठय़ा हुरुपानं आपापली मतं मांडत होती. वजनं पारडय़ात पडत होती. बहुतेक मुलग्यांनी ‘गोरी बायको हवी’, ‘घरचं बघून नोकरी करणारी हवी’ अशी मतं मांडली. एका पठ्ठय़ानं मात्र ‘सुंदर नको कारण इतर लोक तिच्याकडे बघतील’ असं सांगून सर्वाची विकेट घेतली. बहुतेक मुलींनी ‘खूप पैसे कमावणारा’, ‘उंच रुबाबदार’, ‘सासरचा गोतावळा नसणारा’ अशा निकषांना भरघोस मतं दिली. एकीनं ‘व्यसन चालेल पण पैसा हवा’ अशीही अजब निवड केली.
विकास हे सर्व लक्षपूर्वक बघत होता, ऐकत होता. ऐकताना खूप अस्वस्थ झाला होता. त्याची सारखी चुळबुळ चालली होती. जणू त्याला काही सांगायचं होतं. व्यक्त व्हायचं होतं. शेवटी संयोजकांच्या ते लक्षात आलं. खेळाच्या शेवटी झालेल्या जोरदार चर्चेत भाग घेण्याची परवानगी त्यांनी विकासला दिली.
विकास बोलायला उभा राहिला. संथ सुरात बोलायला लागला. म्हणाला, ‘‘गेला तासभर ऐकतोय, प्रत्येक मुलाला सुंदर मुलगी पत्नी म्हणून हवीय. प्रत्येक मुलीला पैसेवाला नवरा हवाय. या सगळ्यात विचार, बुद्धी, भावना यांचा विचार कुठे झालाय असं मला वाटलं नाही, जाणवलं नाही. म्हणून मी बोलायला उभा राहिलोय. मी अजून शाळेत आहे. शालान्त परीक्षादेखील उत्तीर्ण झालो नाही, पण लग्न या विषयात मी विचार केलाय. मला बुद्धिमान, विचार करणारी, संवेदनशील मुलगी माझी सहचरी असणं आवडेल, नव्हे, ती तशी असावी असा माझा आग्रह आहे. तिच्या रूपाविषयी, आर्थिक स्थितीविषयी माझा कोणताही आग्रह असणार नाही.’’
विकास आणखीही काही बोलला. तळमळीनं त्यानं आपलं म्हणणं मांडलं. रूपाविषयी बोलताना कोपऱ्यातला एका टारगट मुलानं विकासच्या रंगाविषयी काही अनुदार उद्गार काढण्याचा प्रयत्न केला, पण विकासचं बोलणं ऐकताना अंतर्मुख होत गेलेल्या बाकीच्या मुलांनी त्या मुलाला तिथंच गप्प केलं. त्या शिबिराच्या उरलेल्या दिवसांत विकास शिबिरार्थीचा हीरो झाला. इतर वेळी नाचणारा, गाणारा, धमाल करणारा हा मुलगा चर्चाच्या वेळी इतका गंभीर होऊन जात असे की बस्स.
अशाच एका सायंकाळी विकासविषयी मला बरंच काही समजलं. विकास एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा एकुलता एक मुलगा. आई शिक्षिका. सर्व कुटुंबच उच्चशिक्षित, सुसंस्कृत. आर्थिक स्थिती भक्कम. विकासला पुढे आय.ए.एस. अधिकारी होऊन देशाच्या नियोजन कार्यात आपला सहभाग द्यायचा होता. घरच्यांना त्याचं कौतुक होतं. शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून त्याचा लौकिक होता. सारं कसं छान, अनुकूल होतं.
पण तरीही विकास मात्र अस्वस्थ होता. बेचैन होता.
विकासनं सांगितलं त्याच्या निवास गावाला शहरी वातावरणाचा पुसटसा स्पर्श झाला असला तरी तसा तो ग्रामीण भागच. स्त्रियांची स्थिती, मुलींचं शिक्षण याविषयी फारशा जाणिवा नसलेलं गाव. विकास म्हणाला की आई शिक्षिका आहे खरी पण शाळेत जाताना घरचे पाहुणे रावळे, स्वयंपाकपाणी सगळं करूनच जाणार ती शाळेला. त्या ‘अटीवरच’ तिला नोकरी करायला मिळतेय. शिवाय आर्थिक सुबत्ता असतानाही वडील आईला नोकरी करायला देतात म्हणून त्यांचं कौतुक वाटतं इतरांना.
विकासचं म्हणणं की बाईच्या (आईच्या) वाटय़ाला आलेला छुपा अन्याय कित्येकदा तिच्याच लक्षात येत नाही (किंवा ती येऊ देत नाही?). आईच विकासला गप्प बसवते. पण याहूनही विकासला टोचत होता तो मुलींच्या रूपाचा मुद्दा, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न. विकासच्या म्हणण्यानुसार मुलींचं वर्गीकरण दोनच गटात पडतं. एक ‘गोरी चिट्टी’ म्हणजे सुंदर. आणि दुसरा गट ‘काळी’ म्हणजे कुरूप. दुसरा गट लग्नाच्या संदर्भात बापाच्या गळ्यातली धोंड होऊन बसतो. लग्न होईस्तो या काळ्या मुलींचं ध्येय एकच, गोरं बनण्याची धडपड करायची आणि त्यातून एकदा लग्न जमलं की ‘गंगेत घोडं न्हालं’ म्हणून सगळ्यांनी हुश्श म्हणायचं.
विकास खेदानं सांगत होता की, त्याच्या वर्गात किती हुशार मुली आहेत, पण जवळपास सगळ्यांच्याच मनावर हे सुंदर दिसण्याचं दडपड आहेच. याउलट तो स्वत: इतका काळा पण ‘मुलग्याचं रूप नसतं बघायचं, गुण बघायचे’ म्हणून त्याचं कौतुक होणार. या सगळ्या गडबडीत मुली वयात आल्या की वरवरच्या सजण्या-धजण्यात बुद्धीची चमक कमी होत जाते हे लक्षातच येत नाही. म्हणूनच विकासनं ठरवलं होतं की, रंग-रूप महत्त्वाचं नाहीच. आर्थिक निकष तर त्याहून बिनमहत्त्वाचं. काय असेल तर मोकळं, विचार करणारं मन. आनंदी सहजीवन. समान पातळीवरचं जगणं.
शिबिराचे दहा दिवस संपले. पाखरं भुर्रकन उडून जावीत तशी मुलं आपापल्या गावी गेली. जाताना फोन, पत्त्यांची देवाण-घेवाण झाली. बहुतेक वेळा हे संपर्क काही काळ टिकतात, नंतर विसरले जातात. पण विकास व माझं तसं झालं नाही. पुढली काही र्वष तरी विकास मला फोन करत राहिला. तो मोठा होत होता. शिकत होता आणि मुलींच्या शिक्षणासाठी अविरत प्रयत्न करत होता. हुंडा घेऊ नये, साधेपणाने लग्नं व्हावी, बडेजावाला फाटा मिळावा म्हणून प्रयत्न करत होता. मुलींनी शिकावं हा कळीचा मुद्दा घेऊन प्रबोधन शिबिरं घेत होता. शाळा-कॉलेजातून बरा प्रतिसाद मिळतोय असं सांगत होता.
अशी काही र्वष गेली. विकास आय.ए.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं त्यानं कळवलं. अतिशय आनंदात होता तो. मग एके दिवशी त्याचा फोन आला. त्याचं लग्न ठरलं होतं. नव्हे, त्यानं ते ठरवलं होतं. भावी पत्नी त्याच्याच क्षेत्रातली होती. विकासच्या वैचारिक सहजीवनाची स्वप्नं समजावून घेण्याचा प्रयत्न ती करत होती. विकास म्हणाला, ‘‘ताई, ती अतिशय परंपरावादी घरातून आलीय. पण बंधनं तोडण्याचं बळ आहे तिच्यात म्हणून तर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मग जरा थांबून म्हणाला, आणि ‘माझ्या अपेक्षेनुसार काळी’ आहे ती. अगदी माझ्यासारखी.’’ नंतर फक्त विकासच्या सातमजली हसण्याचा आवाज आला.
eklavyatrust@yahoo.co.in