पुलाच्या खाली मुलांचं कोडांळं जमा झालं होतं. मध्ये काही तरी जळत होतं आणि त्याचा लालभडक प्रकाश मुलांच्या तोंडावर पडला होता. अतिशय भेसूर दृश्य होतं ते! मुलं मोठय़ानं हसत होती, ओरडत होती. वेडीवाकडी नाचत होती. या सर्वाच्या मध्ये मला बाळू नेमका दिसला. न दिसणं शक्यच नव्हतं म्हणा! त्याचा लाल रंगाचा जर्सी आणि काळी फुल पँट तिकडच्या मुलांच्या फाटक्या कपडय़ांत उठून दिसत होती. एकंदरीतच बाळू तिथं ‘मिसफिट’ दिसत होता.

बाळूला घरी आणण्याचा निर्णय मी का घेतला, हे मला आता खरोखरच आठवत नाही. पण बाळू मुलांच्या एका संस्थेत भेटला आणि तिथून तो एका ठरावीक काळानंतर वारंवार पळून जायचा, हे मात्र नक्की आठवतं. बाळू अगदी नाजूक चणीचा, छोटासा दिसणारा मुलगा (वयानं बारा-तेरा वर्षांचा असला तरी) होता. बाळूचे टप्पोरे, बोलके डोळे तर त्याच्याविषयी आपुलकी निर्माण करायचेच पण बाळूला दम्याचा त्रास व्हायला लागला की होणाऱ्या त्याच्या कासाविशीनंही त्याच्या विषयी काही तरी करावं असं वाटायचं.

एकदा संस्थेत बाळू बरेच दिवस दिसला नाही. चौकशी केल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवल्याचं कळलं. तेव्हा लगेच तिथं गेले. मुलांच्या वॉर्डमध्ये प्रवेश करताच बाळूचं अस्तित्व ताबडतोब जाणवलं. तिथली सगळी मुलं, एवढंच काय त्यांचे पालकदेखील बाळूच्या भोवती जमा झाले होते. बाळू त्या सर्वाना गोष्टी सांगून हसवत होता. बाळू त्या मुलांच्या वॉर्डचं ‘स्टार अ‍ॅट्रॅक्शन’ बनला होता. बाळूच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या अधून मधून चालूच असायच्या. अशाच भेटीच्या दरम्यान बाळू घरी नेण्याविषयी विचारायचा. केविलवाणा व्हायचा. एकदा तो हॉस्पिटलमधून पळूनच गेला. परत संस्थेत आलाच नाही. काही काळ मलाही भेटला नाही. मग भेटला. असाच कुठे कुठे राहतो म्हणाला. नंतर आमच्या घरी येऊ लागला. आपल्या वागणुकीनं त्यानं घरातल्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली. मग कधी तरी स्वत:चं घर अत्यंत नाइलाजानं सोडायला लागलेला बाळू आमच्याकडे राहायला आला. बाळू आमच्याकडे चटकन् रुळला. दिवसभर तो आसपास वावरत असायचा. भाजी निवडण्यासारखी कामं आवडीनं करायचा. त्याला थोडंबहुत लिहिता-वाचता यायचं. त्यामुळे घरातली गोष्टींची छोटी छोटी पुस्तकं घेऊन वाचत बसायचा. बाळू गप्पिष्ट तर होताच, बोलण्यातून त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी समजायच्या.

बाळूचा जन्म एका सधन शेतकऱ्याच्या घरात झाला. कशाचीही ददात नसलेल्या घरात. पण बाळूच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि कौटुंबिक चित्र पालटलं. शेतजमिनीच्या भावी वाटेकऱ्याला हुसकून लावण्यासाठी चुलत्यानं कोणतीही क्लृप्ती करणं बाकी ठेवलं नाही. शेवटी बाळूनं घराला रामराम ठोकला तो कायमचाच. बाळू घराबाहेर पडला. भटकत, भटकत मुंबईत आला. दादरच्या पुलाखाली भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांसोबत राहू लागला. थंडीच्या दिवसात ही मुलं चपला चोरून आणून त्या जाळत. बाळूच्या मते चपला जाळल्या की अंगात ऊब येते खरी पण त्या धुरानं दमाही होतो. त्या धुरामुळेच आपल्याला दमा लागला, असं तो सांगायचा. आम्ही त्या वेळी मुंबईत शिवाजी पार्कच्या अगदी जवळ राह्यचो. बाळूला शुद्ध हवेचा लाभ व्हावा म्हणून मी त्याला रोज सायंकाळी शिवाजी पार्कला फिरायला घेऊन जायला लागले. हळूहळू बाळूला फिरणं इतकं आवडायला लागलं की तो एकटा असला तरी फिरायला जायचा.

असं सगळं सुरळीत चालू असताना एके दिवशी बाळू अचानक गायब झाला. त्याला कुठे शोधावं असा विचार आम्ही करत असतानाच काही तासांनी बाळू परतला. आपण कुठे होतो, गायब कसे झालो याविषयी अवाक्षर न कढता, जणू काही घडलंच नाही अशा प्रकारे तो घरात वावरू लागला. एक महिनाभर सुरळीत गेला. बाळू आता घरात अगदी रुळून गेला होता. त्याला शाळेत जायचं होतं. त्याविषयी तो सतत विचारणा करायचा. त्यामुळे त्याचं मधलं एका दिवसाचं अदृश्य होणं आमच्याही मनातून पुसल्यासारखं झालं होतं. बाळूच्या भविष्याची धूसर पण सोनेरी स्वप्नं सर्वानाच खुणावत होती. मात्र त्याच वेळी एक दिवस बाळू सायंकाळी नाहीसा झाला.

या खेपेला मात्र असं काही तरी घडेल असं मला वाटत होतं. बाळू अस्वस्थ आहे अशी शंका येत होती. बाळू घरी परत आला नाही. तेव्हा तो कुठं असावा, याचा अंदाज बांधून मी दादरच्या पुलाखाली गेले. पुलाच्या खाली मुलांचं कोडांळं जमा झालं होतं. केसांची दशा झालेली, फाटके तुटके कपडे घातलेली ती मुलं कसला तरी जल्लोश करत होती. मध्ये काही तरी जळत होतं आणि त्याचा लालभडक प्रकाश मुलांच्या तोंडावर पडला होता.

अतिशय भेसूर दृश्य होतं ते! मुलं मोठय़ानं हसत होती, ओरडत होती. वेडीवाकडी नाचत होती. एकमेकांना टाळ्या वाजवत होती. या सर्वाच्या मध्ये मला बाळू नेमका दिसला. न दिसणं शक्यच नव्हतं म्हणा! त्याचा लाल रंगाचा जर्सी आणि काळी फुल पँट तिकडच्या मुलांच्या फाटक्या कपडय़ांत उठून दिसत होती. एकंदरीतच बाळू तिथं ‘मिसफिट’ दिसत होता. मी बाळूला हटकलं नाही. तशीच मागे सरून घरी आले. त्यानंतर काही वेळानं बाळू घरी आला. तो अतिशय गोंधळल्यासारखा दिसत होता. चकार शब्द न बोलता तो झोपी गेला.

दुसरे दिवशी बाळू स्वत:हून बोलायला आला. खूप बोलला. आपण आपल्या जुन्या दोस्तांकडे जात असल्याचा कबुलीजबाब त्यानं न विचारता दिला. किती तरी वेळ तो घडाघडा बोलत होता. आपल्याला घरदार सोडल्यानंतर पहिल्यांदा ती मुलं भेटली. त्यांनी मैत्री केली, आधार दिला, असं म्हणाला तो. त्यांची आठवण येते, त्यांना भेटायला जावसं वाटतं हेही त्यानं सांगितलं. तिथं गेल्याशिवाय राहवत नाही पण न जाण्याचा प्रयत्न करीन असंही तो हलक्या आवाजात पुटपुटला. पण त्या आश्वासनातला फोलपणा त्या क्षणी मला स्पष्ट जाणवला.

त्या रात्री बाळूच्या संदर्भात तातडीनं निर्णय घेण्याची निकड स्पष्ट झाली. बाळू आमच्याकडे राहणार आणि तिथंही जाणार यात कमालीचा धोका होता. पण आम्ही सगळे जण (घरचे) एका निर्णयाप्रत येणार एवढय़ात संध्याकाळी मी भाजी घेऊन येत असताना आमच्या शेजाऱ्यांनी मला थांबवलं. मी बाहेर पडल्यावर पाचच मिनिटांत फिरायला गेलेला बाळू परत आला होता. याचा अर्थ पार्कात फिरायला न जाता तो आसपासच कुठे तरी घुटमळत राहिला असणार. घराची एक किल्ली या शेजाऱ्यांकडे असायची. बाळूला ते माहीत होतं. बाळूनं शेजाऱ्यांपाशी आमच्या घराच्या किल्लीची मागणी केली. पण या सजग शेजाऱ्यांनी बाळूला किल्ली देण्यास तर नकार दिलाच पण किल्ल्या मागण्याचं कारणही विचारलं. त्यावर ‘ताई पिशव्या विसरून गेल्या आहेत’ असं बाळूनं त्यांना सांगितलं. त्यावर ‘ताई आल्या तरच किल्ली देऊ’ असं शेजाऱ्यांनी निक्षून सांगितल्यावर बाळूचा नाइलाज झाला. निरुपाय होऊन तो परत फिरला. त्यानंतर बाळू मला कधीच दिसला नाही. अगदी कधीच नाही. दादरच्या पुलाखालीदेखील मी काही वेळा गेले. परंतु तिथेही तो नव्हता. बाळूच्या पतंगासारख्या भरकटलेल्या आयुष्याचं काय झालं हे कधीच समजलं नाही.

बाळू अदृश्य झाला, पण जाण्याआधी त्यानं आमच्या शेजाऱ्यांपाशी किल्ली मागितली यावरून सर्वानी माझ्यावर टीकेची झोड उठवली. पण तरीही मन बाळूविषयी किती तरी काळ विचार करत राहिलं. बाळूला आमच्या घरी राहायला आवडायचं. पुस्तकं आवडायची. त्याला शाळेत जायचं होतं, शिकायचं होतं. तरीही एक ठरावीक कालावधी गेला की बाळू अस्वस्थ व्हायचा. त्याला एक वेगळं जग बोलवायचं आणि तो त्या जगाचा भाग होण्यासाठी जायचा.

मात्र त्या स्वैर, अर्निबध जगात बाळू कायमचा राहू शकला नाही. त्याच्या आतले प्रेरणास्रोत त्याला परत आणायचे. शाळा, पुस्तकं, खेळणं याचं त्याला आकर्षण होतं. आणखी काही काळ बाळूची अशीच दोलायमान अवस्था राहिली असती, तरी अखेरीला त्या भेसूर जगाचा त्यानं कायमचा निरोप घेतला असता का? त्याच्यात जे बदल होत होते, (अगदी हळूहळू का होईना पण होत होतेच) त्याला पुरेसा कालावधी मिळाला नाही का? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. कदाचित मिळणारही नाहीत. मला कधी कधी बाळू एखाद्या धूमकेतूसारखा अचानक उगवेल आणि मधल्या वर्षांत काय झालं याची इत्थंभूत कहाणी सांगेल अशी आशा वाटत राहते.

मात्र याहूनही महत्त्वाचं काही माझ्या लक्षात येतंय. बाळू आमच्या घरी राहत होता आणि पुलाखालील मुलांच्या संपर्कात होता. त्याला वाटलं असतं, तर तो आमचा पत्ता त्या मुलांना देऊ शकला असता. एवढंच नव्हे तर एखाद्या रात्री त्या मुलांना दरवाजा उघडून आत, घरात घेणं त्याला अशक्य नव्हतं. अवघड तर मुळीच नव्हतं. पण बाळूनं तसं केलं नाही. त्याच्या आयुष्यात गुन्हेगारीची, हिंसाचाराची जी बाजू होती, त्याची छायादेखील त्यानं आमच्यावर पडू दिली नाही. त्या अर्थानं बाळूनं आम्हांला सुरक्षित ठेवलं. खरंतर सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या जगानं एवढय़ा कोवळ्या वयात त्याला केवढय़ा दाहक अनुभवांना सामोरं जायला लावलं होतं. त्या तुलनेत एकाकी, असहाय असताना जी मुलं त्याला भेटली, ज्यांनी त्याला आश्रय दिला, ती बाळूला जवळची वाटली. पण तरीही या दोन जगांना दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यानं केला.

आता, इतक्या वर्षांनी शेजाऱ्यांपाशी घराची किल्ली मागवणारा बाळू मला आठवत नाही. घरांच्या पायऱ्यांवर बसून माझ्याकडून परीकथा ऐकण्यात गुंग झालेला टपोऱ्या डोळ्यांचा बाळू आठवत राहतो.

रेणू गावस्कर

eklavyatrust@yahoo.co.in