श्रीकांत अतिशय सहृदय मुलगा होता. संस्थेत आल्यावर, काही दिवसांनी तो तिथे रुळला. त्याची लहान आणि मोठय़ा अशा सर्वच मुलांशी मैत्री झाली. पण त्यातूनच श्रीकांतला कठोर परिस्थितीचं आकलन व्हायला लागलं. त्याने रिमांड होममधील अत्याचारग्रस्त मुलांना अतिशय संवेदनशीलतेने सांभाळलं, स्वत:लाही सावरलं. श्रीकांतचा जीवन प्रवास म्हणजे ‘याला जीवन ऐसे नाव’ असाच आहे.
शाळेसमोरच्या पटांगणात बसून मुलांसह आमच्या गप्पा चालल्या होत्या. अचानक एक चाळिशीचा माणूस दमदार पावलं टाकीत आत आला. हा कोण नवीन पाहुणा म्हणून उत्सुकतेनं पाहिलं तर समोर उभी असलेली ती रुबाबदार व्यक्ती म्हणते कशी, ‘‘काय आई, विसरलीस मला? एवढी विसरलीस? अगं, इतक्या मुलांवर लिहिलंस. माझ्यावर नाही लिहावंसं वाटलं?’’
तो खर्जातला आवाज ऐकला आणि लख्खकन् टय़ूब पेटली. शंकाच नको. हा तर श्रीकांत. शेवटचा भेटला त्यालादेखील आता वीसेक र्वष होऊन गेली असतील. पण आवाजात बदल नाही, तसाच दमदार. आपलं म्हणणं ठासून मांडणारा. मात्र माझ्यासमोर उभा असलेला चाळिशीचा श्रीकांत आणि वीस वर्षांपूर्वी रिमांड होममधून नोकरीसाठी बाहेर पडून गुजरातेत गेलेला कोवळा, विशीचा श्रीकांत यांच्यात मात्र जमीन-अस्मानचा फरक होता. मला आठवत होता गोरापान, सोनेरी रंगाकडे झुकणाऱ्या दाट पिंगट केसांचा, तशाच पिंगट डोळ्यांचा हसरा, हसताना मिस्कील चर्या करणारा विलक्षण देखणा श्रीकांत. समोर उभा असलेला तरुण देखणा नव्हता असं कसं म्हणू? पण ती कोवळीक लोपली होती. केसांनी खूप मागची जागा घेतली होती. पोट सुटलेलं दिसत होतं. डोळ्यांना गॉगलनं झाकून टाकलं होतं. आवाज मात्र तोच होता. तस्साच ‘पुंगीवाला’ नाटकातल्या पुंगीवाल्यासारखा!
रिमांड होमच्या कोरडय़ा शुष्क वातावरणात तिथल्या मुलांनी सादर केलेलं ‘पुंगीवाला’ हे नाटक म्हणजे एक चमत्कारच होता. सांगलीच्या श्रीनिवास शिंदगी सरांनी लिहिलेली ही संगीतिका मुलांकडून करून घेता येईल, असा विश्वास सरांच्या शिष्येनं, वर्षां भावे हिनं व्यक्त केला आणि सार्थही ठरवला. तोपर्यंत नाटक म्हणजे काय, हेच माहीत नसलेल्या मुलांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं. ते दिवस मंतरलेले होते. तासचे तास, दिवसचे दिवस नाटकाच्या तालमी चालत. रंगमंचावर उभं कसं राहावं, हे शिकण्यापासून सुरुवात होती. अभिनय, संवाद या गोष्टी तर पार दूर होत्या. मात्र या सर्वात बाजी मारली ती श्रीकांतनं!
श्रीकांतचं व्यक्तिमत्त्व ‘पुंगीवाला’ या भूमिकेला पूरक होतं. शिवाय त्याचा आवाजही चांगला होता. गरज होती ती मेहनतीची. त्याविषयी आम्हा सर्वाच्याच मनात काही शंका होत्या. श्रीकांत हे आव्हान कसं पेलेल याविषयी थोडी आशंका असली तरी एकदा नाटकात काम करायचं ठरल्यावर त्यानं त्या भूमिकेत अक्षरश: जीव ओतला. श्रीकांत पुंगीवालाची भूमिका अक्षरश: जगला. श्रीकांतची एंट्री प्रेक्षकांतून होत असे. रंगीबेरंगी पोशाख केलेला हसरा श्रीकांत, धीटपणे सगळ्यांकडे बघत रंगमंचावर यायचा तेव्हा त्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत होत असे. आजही ते आठवतांना अंगावर रोमांच उभे राहताहेत. ‘पुंगीवाला’ या नाटकाचे अनेक प्रयोग आम्ही करू शकलो. त्या प्रयोगांना नामवंत मंडळी हजर असायची. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी तर संपूर्ण नाटय़ प्रयोगाची व श्रीकांतची तोंडभरून स्तुती केली.
श्रीकांतमधला सभाधीटपणा, कलाकाराचे गुण या सर्वाची जाणीव आम्हांला या दरम्यान झाली, पण श्रीकांतला या वाटेला जाणं अवघड नव्हे तर अशक्य होतं. घरची परिस्थिती अगदीच डळमळीत होती. वडिलांच्या पराकोटीच्या व्यसनाधीनतेनं आणि परिणामत: झालेल्या अकाली मृत्यूनं हे चार
मुलगे आणि आई आर्थिक अडचणींना किती
तरी र्वष तोंड देत होते. कर्जाचा डोंगर, घेणेकऱ्यांचा ससेमिरा, आईचं अपुरं उत्पन्न, वणवण याचा अनिष्ट परिणाम सर्वावरच झाला. पण त्याची खरी शिकार बनला तो श्रीकांत. श्रीकांत शाळा बुडवायचा. इकडे तिकडे भटकत राहायचा. बाकीच्या भावांनी श्रीकांतचा मार्ग चोखाळला नाही. खासकरून श्रीकांतचा मधला भाऊ. त्याला विलक्षण समज होती. परिस्थितीची जाण होती. त्यानं मिळेल ते काम केलं. जमेल तसं शिक्षण केलं आणि सर्व शक्तीनिशी आईला मदत केली.
श्रीकांत रिमांड होममध्ये आला तोच या ‘पराक्रमी’ कृत्यांमुळे. आला तेव्हा आठवी देखील पास झाला नव्हता. मग हळूहळू संस्थेत चालणाऱ्या दहावीच्या वर्गात सहभागी झाला. आणि नंतर तर एकदम आदर्श विद्यार्थी झाला तो त्या वर्गाचा. सोबतीला यंत्रांचं प्रशिक्षण चालूच होतं. श्रीकांतची आई, त्याचे भाऊ त्याची ही प्रगती बघून अचंबित व्हायचे. त्यांना ‘वाया गेलेला’ श्रीकांत परिचित होता. ‘आदर्श’ श्रीकांत सुरुवातीला अपरिचित वाटे त्यांना. मग हळूहळू कुटुंबीय जवळ आले. भविष्याची मनोरम स्वप्नं बघू लागले. हा श्रीकांतचा वैयक्तिक प्रवास झाला. त्यातल्या ‘पुंगीवाला’ या नाटकातल्या नायकाच्या भूमिकेचा परीसस्पर्श तर नाकारताच येणार नाही. नाटक हे आपलं क्षेत्र बनू शकणार नाही हे वास्तव स्वीकारताना देखील श्रीकांतची नाटकातली ‘हीरोपंती’ त्याच्यातील सकारात्मक बदलाला फार मोठय़ा प्रमाणात कारणीभूत ठरली.
पण या यशस्वी वैयक्तिक प्रवासाच्या वर्णनातली श्रीकांतच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू मला फार महत्त्वाची वाटते. श्रीकांत अतिशय सहृदय मुलगा होता. संस्थेत आल्यावर, काही दिवसांनी तो तिथे रुळला. त्याची वयानं लहान आणि मोठय़ा अशा अनेक मुलांशी मैत्री झाली. त्यातून श्रीकांतला कठोर परिस्थितीचं आकलन व्हायला लागलं. लहान मुलांना मोठी मुलं कमालीचा त्रास देत. हा त्रास अनेक स्तरांवर चालत असे. मारणं हा त्या छळातला सर्वात प्राथमिक भाग. रिमांड होममध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलानं बाहेर भरपूर मार खाल्लेला असायचा. हिंसाचाराचं हे बाळकडू इतकं आतमध्ये गेलेलं असायचं की त्याची परतफेड अपरिहार्य असे. लैंगिक शोषण हे या छळाचं शेवटचं टोक असे. वयानं लहान असलेली मुलं या दोनही प्रकारच्या छळानं गांगरून जात. पुन्हा कुठंही या प्रकारांची वाच्यता करता येत नसे. किती तरी मुलं या छळानं उद्ध्वस्त होत.
श्रीकांतनं अशा अनेक मुलांना अत्यंत संवेदनशीलतेनं सांभाळलं. त्यांच्यावर प्रेम केलं. त्यांचं संरक्षण केलं. त्या वेळची दोन मुलं मला ठळकपणे आठवताहेत. बादल आणि संतोष दोघंही लहान खुरे, नाजूक, अबोल आणि शांत. ही दोनही मुलं ‘दादा लोकांच्या’ (मोठी मुलं) हातातली खेळणी बनली. बादल संस्थेत आला तेव्हा केवढा आनंदी होता. अगदी थोडय़ाच दिवसात तो सदैव भेदरलेला, रडवेला दिसायला लागला. हसणं तर पार दूर गेलं कुठल्याही क्षणाला अश्रू ओघळतील इतके तुडुंब भरलेले असत त्याचे डोळे. जणू खरोखरीचा बादल. पण हे जल संजीवक नव्हतं. त्यात दु:ख ठासून भरलं होतं. श्रीकांतला हे जाणवत गेलं. तोपर्यंत तो मोठा झाला होता. त्याच्या बरोबरीच्या मुलांना हे सारं करताना बघत होता. त्या वेळी रिमांड होमच्या अधीक्षकांशी श्रीकांतनं जवळीक साधली. त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. बरोबरीच्या मुलांशी बोलत राहिला. भांडण नाही, तंटा नाही. सामोपचार करत राहिला. त्यात त्याला अंशत: का होईना यश येत गेलं.
श्रीकांतनं बादलला, संतोषला वाचवलं. केवढी मोठी कामगिरी! रिमांड होममध्ये राहून आपल्या गोड बोलण्यानं त्यानं हे साध्य केलं. याला केवढी हिम्मत लागते! संवेदनशील मन लागतं. श्रीकांतच्या या गुणाचं कौतुक तर वाटतंच आणि अभिमानही वाटतो. श्रीकांत दहावी झाला. मेकॅनिकल इंजिनीयिरगचा एक छोटा कोर्स त्यानं पूर्ण केला. श्रीकांत घरी गेला. त्याला नोकरी लागली. लग्न झालं. त्याला एक मुलगा झाला. आईनं सगळं बघितलं. तिच्या चिंता दूर झाल्या.
फक्त मधल्या काळात एक दुर्दैवी घटना घडली, श्रीकांतचा मधला भाऊ गेला. ज्यानं या संपूर्ण कुटुंबाला आधार दिला तो अचानक गेला. त्या धक्क्यानं श्रीकांतची आई गेली. ‘भिंत खचली. कलथून खांब गेला’ अशी व्यवस्था झाली. श्रीकांत हळूहळू सावरतोय, सावरलाय.
त्याची ही कहाणी ऐकतांना वाटत होतं, ‘याला जीवन ऐसे नाव.’
रेणू गावस्कर
eklavyatrust@yahoo.co.in