त्यानंतर खरं सांगायचं तर सुनीताचं ‘आज मैं उपर..आसमाँ नीचे..’ झालं. विज्ञान, गणित आणि इंग्लिश या विषयांशी लढाई तर चालूच होती. पण या लढाईला नृत्याची जोड लाभली आणि सुनीतानं इतिहास घडवला. तिचं यश तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात अधिकच उमलून आलं..
सुनीता आमच्याकडे (संस्थेत) शिकायला यायला लागली, ती तिच्या पावलांनी म्हणण्यापेक्षा तिच्या आईच्या पावलांनी, म्हणणं जास्त योग्य ठरेल. सुनीताची आई आमच्या शेजारच्या हॉटेलात पोळ्या, भाकऱ्या करायला यायची. सकाळपासून सुरू झालेलं काम दुपारी संपलं की घडय़ाळ बघायला (संस्थेचं घडय़ाळच सगळ्यात बरोब्बर वेळ सांगतं, असं या बाईंचं म्हणणं) न चुकता सुनीताची आई येणार. त्यात ‘खाडा’ नाही. एवढा कामाचा रगाडा उरकल्यावर देखील सतत हसतमुख दिसणारा चेहरा आणि रुपयांएवढं गोल रेखलेलं कपाळावरचं कुंकू, हे मनात ठसून जायचं. हळूहळू ओळख वाढली. सुनीताची आई घरातलं आणि मनातलं सांगू लागली. आपल्या घरातलं कोणीही शिकलं नाही, ही खंत त्या अजिबात शाळेत न गेलेल्या बाईंच्या बोलण्यात सतत जाणवायची. त्यातूनच सातवीत शाळा सोडून घरी बसलेली त्यांची मुलगी सुनीता शालांत परीक्षेसाठी बहि:शाल विद्यार्थी म्हणून आमच्या शाळेत दाखल झाली. मायलेकी एकत्र यायच्या आणि एकत्रच जायच्या.
सुनीताचा शाळेतला पहिला दिवस भयंकर होता, म्हणजे असावा. ती बोलली काहीच नाही पण वर्गातून बाहेर आली, तेव्हा तिचा चेहरा लालबुंद झाला होता. खालमानेनं आईसोबत ती गेली. थोडय़ाच वेळात आमच्याकडे स्वेच्छेने शिकवायला येणारे गणिताचे कुलकर्णी सर खडूचे हात पुसत खाली आले. क्षणभर थांबले, थबकून म्हणाले, ‘सुनीताचं अवघड आहे, फार अवघड आहे. अगदी साध्या बेरजा, वजाबाक्यादेखील आल्या नाहीत आणि दहापर्यंतचे पाढेही जमत नव्हते तिला.’’
कुलकर्णी सर अतिशय सहृदय शिक्षक. दहापर्यंत पाढे न येणाऱ्या सुनीताला नक्की सांभाळून घेण्याचं आश्वासन देऊन नेहमीप्रमाणे घाईनं ते गेले खरे, पण माझ्या मनात मात्र सुनीताच्या आईचा श्रमानं दमलेला व मुलगी शिकेल, या आशेनं डवरलेला चेहरा तरळत राहिला.
काही दिवस असेच गेले. कुलकर्णी सरच नाहीत तर सर्वच विषयाच्या शिक्षकांचं सुनीताविषयी एकमत होतं. अभ्यासात ती खूप मागे होती. विषयांच्या संकल्पना अजिबात स्पष्ट नव्हत्या. हिंदी, इंग्रजी तर दूरच, मराठी वाचनाचा देखील आनंद होता, वगैरे वगैरे. सगळेच स्वयंभावी शिक्षक, त्यातही सेवानिवृत्तीनंतर हौसेनं हे काम करणारे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचं तर ठरवलं. आता प्रश्न होता सुनीताचा. मला तर ती वर्गात येत राहील किंवा नाही, याचीच शंका वाटायला लागली. कारण जिथं काहीच समजत नाही, तिथं विद्यार्थ्यांला बसावं असं न वाटणंच साहजिक नाही का? सुनीतानं चार-पाच वर्षांपूर्वी याच कारणानं शाळा सोडली असेल का असंही मनात आलं.
पुढच्या काही आठवडय़ांत सुनीताच्या अभ्यासात फारशी सुधारणा झाली नाही, पण तिनं शाळेचा एकही दिवस बुडवला नाही, हेच केवढं आशादायक वाटलं. एक दिवस सुनीताला बोलावून घेतलं. तिच्याशी बोलावं, तिच्या अडचणी समजून घ्याव्यात असं वाटलं. मात्र मी काही बोलणार, एवढय़ात सुनीताच बोलायला लागली. बोलताना थोडी भावविवश झाली तरी तिचा आवाज शांत होता. ती म्हणाली, ‘‘ताई, शाळा सोडून खूप र्वष झाली. त्या शाळेत जायचे तेव्हाही खूप काही कळत नव्हतं, पण म्हणून नाही शाळा सोडली. वडिलांचं काम गेलं, घरची परिस्थिती खूप बिघडली. आईसोबत काम करायला लागले, म्हणून शाळा सोडली. पण आता शिकणार, नक्की. ’’ पुढं काय बोलावं, हे तिला कळलं नाही. सुन्नपणे ती माझ्याकडे बघत राहिली.
त्यानंतर सुनीतानं मागे वळून बघितलं नाही. गणित, इंग्लिश आणि विज्ञान यांच्याशी दोन हात करायला ती सज्ज झाली. जणू ‘टग ऑफ वॉर’ होतं ते. एका बाजूला कर्दनकाळ वाटणारे हे विषय आणि दुसऱ्या बाजूला दमछाक होत असलेली, धापा टाकणारी सुनीता. फक्त आता सुनीता एकटी नव्हती. आमच्या शिक्षकांनी तिला घट्ट धरून ठेवलं होतं. शेवटी सुनीता जिंकली. शालांत परीक्षेत ४८ टक्के गुण मिळवून ती पास झाली. तिला एस.एन.डी.टी. महाविद्यालयात प्रवेश मिळाला, तोही अगदी सहज. तिच्याच आईच्या शब्दात सांगायचं तर ‘गेल्या सात पिढय़ांत आमच्यात कालेजात जाणारी पहिली पोरगी’ आणि कुलकर्णी सरांच्या शब्दात सांगायचं तर, ‘इतिहास घडला, नव्हे सुनीतानं इतिहास घडवला.’
खरोखरच इतिहास घडवला सुनीतानं. फक्त तो शालांत परीक्षा पास होण्यापुरता सीमित नव्हता. त्याच्या कक्षा विशाल होत्या, एवढय़ा विशाल की वस्तीत, एका १० बाय १०च्या खोलीत राहणारी सुनीता विमानात बसून परदेशातही गेली. त्याचं झालं असं की, नोव्हेंबर महिन्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेत स्नेहसंमेलनाचं वारं वाहू लागलं. गतवर्षीचं स्नेहसंमेलन मनासारखं जमलं नाही, असं वाटल्यानं, ‘या वेळी झोकात होऊन जाऊ द्या.’ असा सूर निघाला आणि आम्ही तयारीला लागलो.
या वेळी आम्ही नाटय़, नृत्य, केश-वेषभूषा यांच्या संदर्भात बाहेरून प्रोफेशनल मदत घ्यायची, हे आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे काही जण आमच्या संस्थेत येऊ लागले. नृत्यात पारंगत असलेली, नाटय़कलेत निपुण असलेली ही मंडळी आली ती उत्साह आणि आनंद सोबत घेऊनच. त्यांच्या येण्यानं सगळं वातावरणच बदलून गेलं. नृत्य शिकवणाऱ्या दादांनी सुनीताची निवड केली तेव्हा तर तिच्या आनंदाला सीमा उरली नाही. नृत्याच्या तालमी सुरू झाल्या. तोपर्यंत मागे, मागे राहणाऱ्या सुनीताचं एक वेगळंच व्यक्तिमत्त्व समोर यायला लागलं. लाजरीबुजरी, मागे मागे असणारी, कमीत कमी बोलणारी सुनीता. ती हीच का असा प्रश्न पडावा, इतक्या सहजसुंदर हालचाली करत सुनीता नाचायची. कधी ती पाण्यात सूर मारणारी मासोळी व्हायची तर कधी पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचं बेभान रूप साकार करायची. बघता, बघता सुनीताच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसायला लागला, उदास चेहेऱ्यावर हसू उमटू लागलं.
त्यावर्षीचं स्नेहसंमेलन तर गाजलंच शिवाय सुनीताच्या नृत्यकौशल्याची छाप सर्वाच्या मनावर उमटली. सर्वानीच तिची वाखाणणी केली. या सगळ्याचा सुनीताच्या मनावर सकारात्मक परिणाम होणं अपरिहार्य होतं आणि तसा तो झालाही.
त्यानंतर खरं सांगायचं तर सुनीता ‘आज मै उपर..’ झाली. विज्ञान, गणित आणि इंग्लिश या विषयांशी लढाई तर चालूच होती. खासकरून इंग्लिश. पण या लढाईला नृत्याची जोड लाभली आणि ही लढाई सुनीताला सुसह्य़ व्हायला लागली. सुसह्य़ म्हणतेय मी, सुकर नाही, सोपी नाही. याचं एक उदाहण देते. डिक्शनरी बघायला शिकताना सुनीताला अक्षरश: घाम फुटायचा आणि तिला ते शिकवताना आमच्या गोडबोलेबाई हवालदिल होऊन जायच्या. एकदा गोडबोले बाई हसत, हसत वर्गातून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, ‘‘शिकली बरं का शिकली. डिक्शनरी बघायला शिकली. नाचत, नाचत, डिक्शनरी बघते ती.’’ ऐकणारे आम्ही अवाक् झालो. नाचत डिक्शनरी कशी काय बघते बुवा, असं मनात आलं. मग बाई म्हणाल्या, ‘‘अहो डिक्शनरी बघताना बोटं नाचवते, ताल धरते. मग शब्द पटापट सापडतात तिला.’’ आम्हा सर्वाना एकदम हसू आलं. सर्वात जास्त हसू आलं सुनीताला. तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात ते अधिकच उमलून आलं.
सुनीता शालान्त परीक्षा पास झाली, तो दिवस मला कधीच विसरता येणार नाही. आई आणि मुलगी दोघी सोबतीनं शाळेत आल्या. आईचा चेहरा तसाच घामानं भिजलेला आणि श्रमानं दमलेला. पण भाव मात्र नेहमीपेक्षा अगदी वेगळे. तिनं जणू दुनिया जिंकली होती. तिच्या घरातील मुलीनं शाळेची पायरी यशस्वीपणे ओलांडून बाहेरच्या मोठय़ा जगात पाऊल टाकलं होतं. आम्ही त्या दिवशी सुनीताच्या आईनं आणलेले पेढे मनसोक्त खाल्ले. आजही ते आठवताना वाटतं की सुनीताचं यश हे एकटय़ा सुनीताचं नाहीच. ते तिच्या आईचं आणि तिचं मिळून यश आहे. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, आसपासच्या लोकांची नकारात्मक भूमिका (सुनीताच्या आत्याचा तर टोकाचा विरोध होता या सगळ्याला), कामात हातातोंडाशी आलेली मुलगी, हे सगळं सोडून सुनीताच्या आईनं सुनीताला शाळेत धाडलं आणि सुनीतानं ते जाणलं. सुनीता महाविद्यालयात गेली. निर्वेधपणे पदवीधर झाली. या सर्वात नृत्याचं बोट मात्र तिनं घट्ट धरून ठेवलं. तिला नृत्य शिकवणाऱ्या सरांनी तिच्याकडून कधीही पैसे घेतले नाहीत. सुनीता ते देऊ शकणार नाही, याची त्यांना कल्पना होती. अशी काही र्वष गेली. सुनीताला नृत्याच्या छोटय़ा-मोठय़ा शिकवण्या मिळणं शक्य व्हायला लागलं. चार पैसे हाताशी यायला लागले. तेव्हा सुनीतानं आईचं काम बंद केलं. सुनीताची आई आता घरात बसून लेकीची वाट बघते.
या दरम्यान एक संधी चालून आली. श्रीलंकेला जाण्याची. दोन्ही देशांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचा कार्यक्रम होता तो. सुनीता परदेशी गेली. खरोखर सांगते. जिथं चार माणसंदेखील बसू शकत नाहीत इतक्या चिंचोळ्या खोलीतल्या मुलीचं ते ‘हनुमान उड्डाण’ होतं. सुनीताला आता उत्तम नोकरी मिळाली आहे. नृत्यसाधना अखंड सुरू आहे. तिचे ठिकठिकाणी कार्यक्रम होतात. सुनीताची आई तिचे कार्यकम बघायला मधून मधून जाते.
ही केवळ एक यशोगाथा नाही. सुनीताच्या आयुष्यातले आणि त्या अनुषंगाने तत्सम अनेक मुलींच्या आयुष्याचे प्रश्न व त्याची सापडणारी/ न सापडणारी उत्तरं त्यात गुंतलेली आहेत. सुनीताला एक संधी मिळाली व त्याचं तिनं सोनं केलं यात काहीच शंका नाही. पण मुळात अशी संधीच किती जणींना मिळेल? खासकरून, सुनीताच्या आईइतकी खंबीर व्यक्तिमत्त्वाची आई? आमच्याकडे येणाऱ्या, कोणतीही अपेक्षा न बाळगता स्वयंभावानं शिकवणाऱ्या शिक्षकांचा सहभागसुद्धा किती उल्लेखनीय आहे! ही सारी शिक्षक मंडळी त्यांच्या कारकीर्दीत ‘हुशार’, तल्लख, करिअर घडवणाऱ्या मुलांना शिकवणारी होती. पण सेवानिवृत्तीनंतर एकही गणित सोडवू न शकणाऱ्या, मराठी लिहिण्यातही मागे असणाऱ्या मुलांना त्यांनी आपलं मानलं. नृत्यशिक्षकांनी सुनीतामधले सुप्त कलागुण हेरले आणि त्या गुणांना खुला रंगमंच दिला व तोही कुठल्याही आर्थिक लाभाच्या अपेक्षेविना.
या सर्वाच्या सहभागाचं मला फार मोल वाटतं. प्रतिकूलतेचे आघात सोसणारं मूल हे समाजाच्या अनेक धाग्यांनी आणि रंगांनी नटलेल्या वस्त्राचंच एक नाजूक सूत असतं. त्याला बळकटी देण्यासाठी अगणित हात व त्या हातामागची प्रबळ प्रेरणा असावी लागते. सुनीताच्या बाबतीत हे घडून आलं. अशी प्रत्येक सुनीता पुढच्या अनेक सुनीतांना हात देण्याची इच्छा अनेक नीतिमानांच्या मनात निर्माण करते,
हेच खरं.