रवी आणि प्रताप, दोघांनीही कधी चोरीमारी केली नाही. व्यसनाधीनतेपासून ते दूर राहिले. दोघांनी प्रारंभी एकेकटय़ाने आणि नंतर एकमेकांच्या सोबतीने पडेल ते काम केलं आणि आयुष्य चालू ठेवलं हे सांगताना त्यांच्या कोवळ्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित अभिमान दाटून यायचा. त्या जीवनक्रमात मानवी आयुष्यातील सर्वात अनमोल असं बालपण आपण गमावून बसलो हे मात्र त्यांच्या लक्षात येत नसे, पण शेवटी हाडाच्या या सहृदय माणसांना मुंबईनेही सामावून घेतलं.

मुन्ना उत्तर प्रदेशात आपलं घर शोधायला निघून गेला. जाताना दृष्टी गमावलेल्या वेद मेहतांचं छायाचित्र घेऊन गेला आणि ‘दुनियामे कोई बेचारा नही। हर कोई साइकल सीख सकता है।’ असा अंत:करणात कोरून राहणारा संदेश देऊन गेला. मुन्नाच्या त्या शब्दांनी जणू जादू केली. रिमांड होममधल्या मुलांसाठी अजून खूप काही केलं पाहिजे अशा प्रेरणाच जाग्या झाल्या. ‘अधिकाधिक केलं पाहिजे’ हे जणू आमच्यासाठी परवलीचे शब्द झाले. त्यातूनच साकारली शिबिराची संकल्पना.

रिमांड होममध्ये बाहेरच्या अनेक व्यक्ती, संस्था यांना बोलावून नियोजनपूर्ण शिबिरं घेणं ही गोष्ट सोपी नव्हती. तोपर्यंत एका आठवडय़ाचं (आम्हाला ते तितक्या दिवसांचं असावं असं वाटत होतं) शिबिर (वीस वर्षांपूर्वी) संस्थेत  झालं नव्हतं. शिवाय सर्वात मोठा धोका होता तो मुलं शिबिर चालू असताना पळून जाण्याचा. मुलांची एकूण संख्या तीन-साडेतीनशेच्या आसपास. त्यामुळे अधीक्षकांच्या मनात या शंकेची पाल चुकचुकत होती.

या वेळी आमच्या मदतीला अक्षरश: धावून आले ते प्रताप आणि रवी. प्रताप व रवी हे मुलगे तिथल्या मुलांचे म्होरके होते. प्रताप कर्नाटकचा. (त्याला सगळी मुलं परताप म्हणायची) काळा सावळा, बांध्यानं मजबूत, नाकाच्या टोकावर घामाचे थेंब, चेहऱ्यावर कायम हसू, किंचित पुढे असलेले पांढरे शुभ्र दात बोलताना मागे घेण्याचा प्रयत्न करीत दाक्षिणात्य हिंदी बोलणारा. तर रवी (बंगालीतला उच्चार रोबी) कोलकत्याचा बंगाली बाबू. अगदी बाबू मोशाय. गहुवर्णाकडे झुकलेला गौरवर्ण, घाऱ्या रंगाची झाक असलेले डोळे, नाजूक जिवणी व अगदी आत वळलेले दात. रवी अतिशय देखणा होता. हिंदीच्या बाबतीत मात्र प्रतापहून वाईट अवस्था. आम्हा तिघांचं हिंदी तीन प्रकारचं असूनदेखील (माझं बम्बैया हिंदी) आमची गट्टी जमली ती जमलीच. ती रवी आणि प्रताप आपापल्या मुदतीनंतर सुटून जाईपर्यंत टिकली.

तर शिबिराची कल्पना समजल्यावर रवी आणि प्रताप कमालीचे खूश झाले. पण मुलं पळून जाण्याची शक्यता असल्याने शिबिराची प्रत्यक्ष कार्यवाही होण्यात अडचण येण्याचा संभव आहे, असं लक्षात आल्यावर एकदम सावधही झाले. मग अजिबात वेळ न दवडता दोघांनी एकमताने मीटिंग घ्यायची असं ठरवलं. मुलांची मीटिंग. मुलांनी मुलांची ठरवलेली पहिली मीटिंग होती ती. दुपारी चार वाजता मुलांच्या जेवणाच्या भल्या मोठय़ा हॉलमध्ये मीटिंग सुरू झाली. सगळी मुलं दाटीवाटीने जागा मिळेल तिथं बसली होती. प्रतापनं शिबिराच्या मार्गात येऊ शकणारा संभाव्य अडथळा मुलांना सांगितला. त्यानंतर रवी उभा राहिला. त्याने शिबिराच्या कालावधीत एकाही मुलाने पळून न जाण्याचं आश्वासन मागितलं.

मुलं शांत होती. विचारमग्न झालेली दिसत होती. नेहमीचा टिंगलीचा सूर कुठेच नव्हता. हळूहळू एकेक मुलगा उठून उभा राहू लागला. ‘भाग नही जायेंगे’, ‘झूठ नही बोलेंगे’ असं आश्वासन देऊ लागला. थोडय़ाच वेळात एकेरी आश्वासनांचं रूपांतर एकमुखाने दिलेल्या घोषणांमध्ये झालं. आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. शिबिराच्या वाटेतला पहिला अडथळा दूर झाला, नव्हे प्रताप आणि रवी यांच्या नेतृत्वाखाली तीनशे मुलांनी तो दूर केला. पुढेही मुलांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळला. पण ती पुढची गोष्ट झाली. आठ दिवसांच्या त्या शिबिरात अनेक मान्यवरांनी आपलं योगदान दिलं. अभिनेत्री सुलभा देशपांडे आणि अरुण काकडे यांनी तर ‘आविष्कार’च्या बाल कलाकारांच्या मदतीनं एका सुंदर नाटय़प्रयोगाचं सादरीकरण केलं. त्या प्रयोगानंतर जे काही घडलं त्यातून कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण तर झालंच, पण प्रताप आणि रवी यांच्या एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय आम्हाला झाला.

आधी सांगितल्याप्रमाणे आठ दिवसांच्या त्या शिबिरात ‘आविष्कार’तर्फे एका बालनाटय़ाचा प्रयोग झाला. या नाटकात काम करण्यासाठी ‘आविष्कार’तर्फे पन्नासएक मुलं आली होती. ‘आविष्कार’ या संस्थेला आमच्याकडून कसली म्हणजे कसलीच अपेक्षा नव्हती. आम्हीच सगळ्या मुलांसाठी (आणि सहभागी मोठय़ांसाठीसुद्धा) बटाटेवडे आणायचं ठरवलं. लहान मुलं आणि मोठी माणसं जमेस धरून साधारण दीडशे बटाटावडय़ांची ऑर्डर दिली. नाटकाचा प्रयोग अत्युत्तम झाला. रिमांड होमच्या आमच्या मुलांनी तर नाटक अक्षरश: डोक्यावर घेतलं, पण नाटक संपलं तेव्हा नाटकात काम करणारी मुलं दमली तर होतीच, पण त्यांना भूकही लागली होती. मुलांनी वडय़ांचा फडशा पाडायला सुरुवात केली आणि अचानक वीज गेली. त्या अंधारात कोणी किती वडे खाल्ले, सर्वाना ते मिळाले की नाही याचा अंदाज बांधणं केवळ कठीण नव्हे तर जवळपास अशक्य होतं, ते शिवधनुष्य पेललं प्रताप आणि रवी यांनी. चार मोठय़ा मुलांना सोबतीला घेऊन त्यांनी परिस्थिती काबूत आणली. कितीतरी वेळ आरडाओरडा, वडे हिसकावून घेणं, तक्रारी करणं यांनी तो परिसर भरून गेला होता. त्यातच आमचा एखादा मुलगा पळून गेला असता तर परिस्थिती अधिक अवघड झाली असती. त्या तशा अवघड स्थितीतदेखील रवीनं मला एक खुर्ची आणून दिली व कोपऱ्यात बसवलं.

असा काही वेळ गेला. परिस्थिती निवळायला लागलीय असं वाटू लागलं. तेवढय़ात अचानक एका मुलाचं मोठय़ानं हुंदके देऊन रडणं ऐकू आलं. काय झालं तेच कळेना. टॉर्चच्या प्रकाशात त्याला जवळ घेऊन विचारपूस केली असता त्याचा नवीन शर्ट हरवल्याचं कळलं. नाटकातली वेशभूषा उतरवून तो आपला शर्ट घालायला आला. तर शर्ट गायब. तो मुलगा अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होता. पण त्याहीपेक्षा आम्हा सर्वाना विदीर्ण करून सोडणारं असंही काही तो सांगत होता. तो म्हणत होता, ‘‘याचसाठी माझी आई मला जाऊ नको म्हणत होती. ही मुलं चोर असतात म्हणून सांगत होती. तर मी हट्ट करून नवीन शर्ट घालून आलो. आता मला घरी जायची भीती वाटते.’’ तोपर्यंत वीज आली होती. रवी आणि प्रताप यांचे चेहरे त्या प्रकाशात मला दिसले. गेले आठ दिवस सळसळत्या उत्साहानं काम करणारे त्यांचे चेहरे अक्षरश: भकास दिसत होते.

पण दिवे लागले आणि दोघांनी स्वत:ला सावरलं. मला सोबतीला घेऊन त्यांनी सगळ्या डॉर्मिटरीज पालथ्या घातल्या. प्रत्येक डॉर्मिटरीत दोघेही मुलांना साकडं घालत होते. शर्ट परत देण्याविषयी आवाहन करत होते. शेवटी प्रकाश नावाच्या मुलानं तो शर्ट काढून रवीच्या हातात दिला. देताना एवढंच म्हणाला, ‘‘एवढा सुंदर शर्ट घालावासा वाटला.’’

झाल्या प्रकारानं आम्ही सारेच दमून गेलो होतो. समाधान एवढय़ाचंच होतं की त्या मुलाचा शर्ट आम्ही देऊ शकलो. त्यानंतर सगळी आवराआवर होईपर्यंत रात्रीचे दहा वाजत आले होते. आम्ही घरी येण्यास निघालो तो प्रतापनं आम्हाला खूण करून जवळ बोलावलं. आडोशाला नेऊन शर्टाच्या खिशात ठेवलेली बटाटावडय़ाची पुरचुंडी त्यानं आमच्या हातात ठेवली. त्या सर्व धामधुमीत प्रतापनं एक वडा कसाबसा वाचवून आमच्यासाठी राखून ठेवला होता.

शिबिराच्या त्या दिवशी एवढं काम करूनही एखादा बटाटावडादेखील रवी किंवा प्रताप यांच्या वाटय़ाला आला नव्हता. पण तरीही त्या द्वयीने कसाबसा मिळालेला एक वडा आमच्यासाठी राखून ठेवला. त्या पुरचुंडीकडे पाहताना आमचा कंठ दाटून आला. लाखमोलाचं ते बक्षीस हातात धरून आम्ही बाहेर पडलो.

रवी आणि प्रताप या देशाच्या अगदी वेगळ्या राज्यातून आले होते. पण त्यांची आयुष्याची गोष्ट मात्र आश्चर्य वाटावं इतकी सारखी होती. दोघांनाही आई नव्हती. घरात दारिद्रय़ इतकं की भावंडांसकट सगळ्यांची पोटं भरणं दुरापास्त होतं, मग एके दिवशी काही विचार करून दोघंही आपापल्या घरातून बाहेर पडले. सुरुवातीचा विचार असाच होता की मिळेल ते काम करावं, चार पैसे गाठीला बांधावेत आणि परत जावं घराकडे.

पण घरातून एकदा बाहेर पडल्यावर या देशातल्या अगणित मुलांचं जे होतं, तेच रवी आणि प्रतापचं झालं. घराचा डगमगता का होईना आधार सुटला तो सुटलाच. भटकत भटकत दोघेही मुंबईला पोचले आणि कुठल्याशा बांधकामावर काम करताना एकमेकांना भेटले. पुढे ते काम सुटलं. पुन्हा त्रिस्थळी यात्रा सुरू झाली. सुटली नाही ती एकमेकांची सोबत.

रवी आणि प्रताप आपल्या भूतकाळाच्या आठवणी सांगण्यात रमून जात. याचं कारण दोघांनीही कधी चोरीमारी केली नाही. उचलेगिरीच्या वाटय़ाला ते गेले नाहीत की रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना अगदी कोवळ्या वयात जो व्यसनाधीनतेचा शाप लागतो, त्याच्यापासून ते दूर राहू शकले. दोघांनी प्रारंभी एकेकटय़ाने आणि नंतर एकमेकांच्या सोबतीने पडेल ते काम केलं आणि आयुष्य चालू ठेवलं हे सांगताना त्यांच्या कोवळ्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित अभिमान दाटून यायचा. त्या जीवनक्रमात मानवी आयुष्यातील सर्वात अनमोल असं बालपण आपण गमावून बसलो हे मात्र त्यांच्या लक्षात येत नसे.

रवी आणि प्रताप ही दोन मुलं खरोखरच हाडाची सज्जन होती. अतिशय सहृदय होती आणि दुसऱ्यांना मदत करण्यात त्यांचा उत्साह मोठा अवर्णनीय असे. रिमांड होमच्या बंदिस्त भिंतीत राहून त्यांना जे प्रशिक्षण घ्यायचे होते ते त्यांनी घेतले. मुदत संपल्यावर दुनियादारीत सामील झाले, मिसळून गेले. त्यांची वर्तणूक इतकी चांगली होती की त्यांना काम तर मिळालेच पण एका समाजहितैषी व्यक्तीने त्यांच्या आश्रयाचीदेखील व्यवस्था केली. रवी आणि प्रताप परत आपल्या घरी गेले नाहीत. मुंबई नामक महानगराने दोघांना आपल्यात सामावून घेतलं.

ही रवी, प्रतापची साधीशी कहाणी. त्यात मोठे चढउतार नाहीत. पण मला एवढंच सांगायचंय की जे लोक रिमांड होमच्या एकंदर कार्यपद्धतीशी परिचित आहेत त्यांना रवी आणि प्रतापच्या क्षमतेची सहज कल्पना यावी. रिमांड होममधल्या मुलांची स्वतंत्रपणे मीटिंग घेणं, एकही मुलगा पळून न जाण्याची जबाबदारी स्वीकारणं, शिबिरातील अनेक अडचणींच्या वेळी खंबीरपणे उभं राहणं आणि स्वत: बटाटावडा न खाता दुसऱ्यासाठी राखून ठेवणं ही किती अवघड कामगिरी आहे! आणि आपल्या देशातल्या दोन मुलांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता हे काम सहजी केलं.

eklavyatrust@yahoo.co.in