अळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच भाव खाऊन जाते. वापरलेल्या पाण्यावर वाढणारे हे अळू बीटा कॅरोटिन, फॉलेट, रिबोफ्लोवीन अणि थायमिनने समृद्ध आहे. अळूच्या पानात झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियमही आहे. मात्र अळूत ऑक्झ्ॉलिक अॅसिड असल्यामुळे ते खाल्ल्यामुळे घशाला खाज सुटते, त्यासाठी अळू वापरताना त्यात चिंच, आमसूल किंवा काही तरी आंबट पदार्थ घालावा लागतो. भाजीच्या अळूची पानं थोडी पातळ, मऊ आणि थोडी खाजणारी असतात तर वडय़ांच्या अळूची थोडी जाड आणि न खाजणारी. अळू सोलून चिरताना अनेकांच्या हाताला खाज सुटते, त्यासाठी हाताला चिंचेचा कोळ लावून ते चिरावं. अळूचे कांदे म्हणजे अळकुडय़ा शिजल्या की थोडय़ा बुळबुळीत होतात. अळकुडय़ांचीही भाजी प्रसिद्ध आहे.
अळू मुठिया
साहित्य : वडय़ांच्या अळूची देठासकट चिरलेली पानं ३ वाटय़ा, १ वाटी बेसन, अर्धा वाटी रवा, पाव वाटी तांदळाचं पीठ, प्रत्येकी १ मोठा चमचा चिंचेचा कोळ आणि गूळ, प्रत्येकी १ चमचा तीळ, ओवा आणि धने-बडिशेप पावडर, चवीप्रमाणे मीठ, तिखट, चिमूटभर हळद आणि हिंग, चिमूटभर बेकिंग सोडा, २ मोठे चमचे तेल, १ चमचा मोहरी, ७-८ कढीलिंबाची पानं, १/२ चमचा चाट मसाला.
कृती : तेल, मोहरी, तीळ, चाट मसाला आणि कढीलिंबाची पानं वगळून इतर सर्व जिन्नस एकत्र करावेत, लागेल तसं पाणी घालून मिश्रण थलथलीत करावं, तेलाचा हात लावलेल्या थाळीत मिश्रण ओतावं आणि कुकरमध्ये शिटी न लावता १५-२० मिनिटं वाफवून घ्यावं. गार झाल्यावर तुकडे करावे, तेल तापवून मोहरी तडतडवावी, कढीलिंब, तीळ परतून त्यात हे मुठिया परतावे. वर चाट मसाला पेरावा.
वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com