भूक वाढवणारी, पित्ताशयाच्या तक्रारींवर उपयुक्त असणारी चिंच ताप, घसादुखी, सूज, उष्माघात या व्याधींवरही उपयोगी पडते. आतडय़ातला मळ पुढे सरकण्यासाठी चिंचेपासून केलेलं औषध वापरतात. चिंचेची पानं, फुलंही आंबटसर असतात. चिंचेत टार्टरिक अ‍ॅसिड आहे, जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ असून कॉपर, पोटॅशियम, आयर्न आणि कॅल्शियमही आहे. चिंचेच्या पानांचं पोटीस सुजलेल्या सांध्यांवर लावतात, पानं वाटून भाजलेल्या जखमेवर लावतात.

चिंच शेवया

साहित्य : २ मोठे चमचे चिंचेचा घट्ट कोळ, प्रत्येकी १ मोठा चमचा शेंगदाणे, काजू आणि तीळ,
२ वाटय़ा शेवया, ६ वाटय़ा पाणी, चवीला मीठ, तिखट, फोडणीसाठी २ मोठे चमचे तेल, मोहरी, हिंग, हळद, १-२ हिरव्या मिरच्या, ७-८ कढीलिंबाची पानं.
कृती : पाणी उकळत ठेवावं, उकळत्या पाण्यात शेवया, अर्धा चमचा मीठ, १ चमचा तेल घालून शेवया बोटचेप्या झाल्या की चाळणीत निथळाव्या. तेलाची फोडणी करून त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, शेंगदाणे, काजू आणि तीळ परतावे, त्यात मीठ, तिखट, चिंचेचा कोळ घालावा, थोडं पाणी घालावं, दोन मिनिटं उकळावं, शिजलेल्या शेवया बशीत घेऊन त्यावर हवा तसा चिंचेचा सॉस घालून खायला द्यावं.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com