सध्या सगळ्यात जास्त चर्चा चीनची नसून ‘चायनीज’ची आहे. जे जे चिनी ते ते त्याज्य अशा एका विकृत मनोवस्थेत बहुतेक जण एकमेकांना खुणावत असतात. एरवी रस्त्यावरच्या हातगाडय़ांवर वा अगदी मोठमोठय़ा हॉटेलमध्येही ‘चायनीज’ या नावाखाली सगळे भारतीय आजवर जे अन्नपदार्थ मिटक्या मारत खात होते, ते पदार्थही सध्या समाजाच्या भिंगाखाली आले आहेत. मग एखाद्या विषाणूला ‘चिनी विषाणू’ असे संबोधून त्याची टर उडवणे, ही आपली सध्याची आवड. पण रंगरूपावरून एखाद्याची टिंगल करणे हा तर नेहमीचा छंदच. म्हणजे, चपटे डोळे असणारा कोणीही आपल्यालेखी नेपाळी असतो. मग तो भारताच्या ईशान्येकडील राज्यातला असला तरी आपल्या लेखी नेपाळीच. चेहरेपट्टीवरून, खाण्यापिण्याच्या सवयीवरून सतत टवाळी करण्याचा आपला गुणधर्म आपण कधीही सोडू शकत नाही. म्हणजे ‘चिनी विषाणू’ म्हणून हिणवताना, आपल्याच देशात दरवर्षी केवळ मलेरियाने मृत पावणारी लोकसंख्या हजारांत असते. क्षयरोगासारख्या रोगावर अजूनही कोणतेही नियंत्रण मिळवता न आल्याने देशातील किमान दोन लाख नागरिक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात. समजा परदेशात गेल्यावर आपल्यालाच कोणी ‘ए मलेरिया’ अशी हाक मारली, तर आपल्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचायला वेळ लागणार नाही. पण ‘नावे ठेवणे’ हाच आपला स्थायिभाव असल्याने आपल्याला आपल्या देशाबद्दल इतरांना काय वाटत असेल, याचा विचार करण्याची गरजही वाटत नाही. हे इतक्या खालपर्यंत मुरलेले दिसते, की सोसायटीत एखादे केरळी, कानडी कुटुंब आले रे आले की दिवसरात्र त्यांची टवाळी करण्यातच धन्यता मानणारे काही कमी नसतात. कन्नड भाषेत नपुंसकलिंग नाही. त्यामुळे बहुतेक कन्नड भाषकांचा मराठीतून बोलताना गोंधळ उडतो. परभाषकही मराठी बोलू पाहतो, याचे कौतुक तर सोडाच, पण त्याची यथेच्छ टिंगल करण्यातच समाधान मानणारे संख्येने खूप. त्यामुळे ‘चिन्यांची खाद्यसंस्कृती’ हाही आपल्या टवाळीचा विषय बनतो. ते कसे साप, झुरळे खातात याची कल्पित वर्णने एकमेकांना सांगत ‘ते चिनी असेच असतात’, या पालुपदापाशी येऊन सगळे जण थांबतात. एखाद्या प्रदेशातील लोकांच्या खाद्यान्नावर बोलण्याचा अधिकार आपल्याला कसा काय पोहोचतो, असा विचार मात्र कोणीच करत नाही. पण ऑलिम्पिकमध्ये चीनमधील खेळाडूंनाच सर्वाधिक पदके कशी काय मिळतात, याचे आपल्याला जराही आश्चर्य वाटत नाही. काम करणाऱ्या प्रत्येकाला तिथे दोन तासांची जेवणाची सुट्टी मिळते आणि त्या वेळात त्यांना हवे ते खेळ खेळण्याची केवळ परवानगी देऊन तो देश थांबत नाही, तर कंपनीच्या आवारातच अशा सगळ्या खेळांसाठी लागणाऱ्या साहित्याची सोयही केली जाते. तिथल्या स्टेडियममध्ये तीन ते नव्वद वर्षांच्या गटातील अनेकजण कोणता ना कोणता खेळ खेळताना दिसतात. पण हे चित्र आपण पाहात नाही. जपानमध्ये कामगारांना सुट्टीच नको असते, हे चित्र आपल्याला फारसे आवडत नाही. आपल्या संस्कृतीचा टेंभा मिरवताना दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीबद्दल प्रेम आणि आदर दाखवण्याची वृत्ती आपण अंगी बाणवतच नाही, एवढाच याचा अर्थ. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याचीही आपली मानसिकता नसते. भारताची विख्यात बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिची आई मूळची चीनची. सामाजिक विषयांवर सडेतोड भूमिका घेणाऱ्या या खेळाडूला समाजमाध्यमांतून ‘अर्धचिनी’, ‘अर्धकरोना’ असेही  संबोधले गेले. ‘याबद्दल तक्रार नाही’ असे सांगणारा लेख तिने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिला, त्यातून या भेदभावाच्या वणव्याची आच नेमकी पोहोचते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader