विख्यात बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी निवर्तले त्यानंतर समाजमाध्यमांवर प्रसृत झालेली दोन छायाचित्रे सूचक होती. एका छायाचित्रात (दोहोंतील हे बहुधा अधिक ज्ञात) बंगाली चित्रपट दिग्दर्शक शिरोमणी सत्यजित राय हे बहुधा एका चित्रीकरणादरम्यान हातात फणी घेऊन सौमित्र यांचे केस विंचरत आहेत.. दुसरे छायाचित्रही या दोघांचेच. यात राय पाठमोरे एका खुर्चीवर विराजमान. समोर दिवाणावर सौमित्र बसलेले. राय यांच्या हातात वही व पेन्सिल. ते सौमित्र यांचे व्यक्तिचित्र रेखाटत आहेत. दोघांच्या अंगावर देशी वस्त्रे आणि हातात सिगारेट! सौमित्र चटर्जी यांनी सत्यजित राय यांच्या १४ चित्रपटांमध्ये काम केले. उत्तम अभिनेते ही सौमित्र चटर्जीची एरवीही ओळख; पण ‘सत्यजित राय यांचे पसंतीचे अभिनेते’ ही सर्वोत्तम ओळख. सत्यजित राय यांच्या चित्रपटांतील अपू नि फेलुदा या दोन ठसठशीत भूमिकांसाठी बंगालबाहेर सौमित्र चटर्जीना कायम ओळखले गेले आणि सौमित्रदांनीही ही दुहेरी ओळख निर्विष अभिमानाने वागवली. राय यांच्या विख्यात ‘अपू’ त्रिचित्रधारेतील शेवटच्या भागातील – ‘अपूर संसार’ – प्रौढ अपू ही त्यांची पहिली भूमिका. ऐंशीच्या दशकापर्यंत ही जोडी कायम होती. हे नाते बंगाली जनमानसावर गोंदले गेले होते. त्यामुळेच, १९८४मध्ये ‘घरे बायरे’ या राय यांच्या चित्रपटात सौमित्र यांची खलछटेची भूमिका पाहून बंगाली जनमत खवळले होते. कारण तोवर सौमित्र यांच्या बहुतेक भूमिका आदर्शवादी हळवेपणाकडे झुकणाऱ्या होत्या. सत्यजित राय यांच्या चित्रपटांतील सौमित्र यांच्या ‘अस्तित्वा’चे काही प्रस्थापित निकष आणि आडाखे तेथे रूढ होते. सौमित्र यांनी स्वत:ला सत्यजित राय यांच्याकडे ‘सुपूर्द’ केले होते. त्याबद्दल त्यांनी कधीही विषाद व्यक्त केला नाही. खरे तर राय यांच्याव्यतिरिक्त मृणाल सेन, तपन सिन्हा अशा इतरही मातब्बर बंगाली चित्रपटांमध्ये सौमित्र यांनी लक्षणीय भूमिका केल्या. पण ते ओळखले गेले, सत्यजित राय यांनी घडवलेले अभिनेते म्हणूनच.

त्यात वावगे काहीच नाही. जगभर अशा दिग्दर्शक-अभिनेत्याच्या जोडय़ा गाजलेल्या आहेत. उदा. फेदरिको फेलिनी आणि मार्चेलो मास्त्रोयानी, मार्टिन स्कोर्सेसी आणि रॉबर्ट डि निरो, अकिरा कुरोसावा आणि तोशिरो मिफुने, इंगमार बर्गमन आणि (अभिनेत्री) बिबी अँडरसन किंवा गुनर ब्योर्नस्ट्रांड अशी अनेक उदाहरणे सापडतील. सौमित्र प्रथम ‘अपराजितो’ या अपू त्रिचित्रधारेतील दुसऱ्या भागातील भूमिकेसाठी राय यांच्याकडे गेले होते. परंतु कोवळ्या अपूसाठी त्यावेळी राय यांना सौमित्र थोराड आणि उंच भासले. परंतु प्रौढ अपूच्या भूमिकेसाठी राय यांनी त्याचवेळी सौमित्र यांना हेरून ठेवले होते. राय यांनी त्यांच्यावर वडिलांप्रत माया केली आणि अभिनयाची शिस्तही लावली. अस्सल चित्रपटप्रेमी कधीही एका प्रांतापुरता किंवा देशापुरता विचार करत नाही. राय त्याच पठडीतले. जागतिक सिनेमातील उत्तमोत्तम कलाकृती पाहण्याची, आस्वादण्याची आणि अभ्यासण्याची सवय त्यांनी सौमित्र चटर्जीना लावली. ‘चारुलता’, ‘अरण्येर दिनरात्री’, ‘शोनार केल्ला’, ‘जोय बाबा फेलुनाथ’, ‘हिराक राजार देशे’ असे अनेक गाजलेले चित्रपट या दुकलीने दिले. डॉ. श्रीराम लागूंनी म्हटले त्याप्रमाणे, चित्रपट किंवा नाटक हे प्रामुख्याने दिग्दर्शकाचे माध्यम. बाकीच्यांची भूमिका भारवाही लमाणांचीच! तथाकथित मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटसृष्टीत हे सत्य नाकारले गेले किंवा बहुतांना उमगलेच नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटापासून सौमित्रदा दूर राहिले. सत्यजित राय यांच्याप्रमाणेच तपन सिन्हा, मृणाल सेन, तरुण मजुमदार, असित सेन किंवा नंतरच्या पिढीतील गौतम घोष, अपर्णा सेन, अंजन दास किंवा रितुपर्णो घोष अशा दिग्दर्शकांच्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. उत्तम कुमार या गाजलेल्या बंगाली अभिनेत्याला समांतर अशी सौमित्र यांची कारकीर्द सुरू झाली आणि तितकीच झळाळत राहिली. तरीही उत्तम कुमार मुख्य प्रवाहातले नि सौमित्रदा समांतर चित्रपटवाले असले निर्बुद्ध द्वंद्व बंगाली चित्ररसिकांमध्ये चर्चिले गेले नाही. बंगालीच्या परिघाबाहेर सौमित्र चटर्जी पडले नाहीत, तशी त्यांना गरजही वाटली नाही. आपण जे करतो आहोत ते अस्सल आहे याविषयीची विलक्षण खात्री आणि हिंदी वा इंग्रजी भाषेतील सारे काही ‘राष्ट्रीय’ वा ‘वैश्विक’ या अपसमजाला पूर्णतया दिलेली तिलांजली या दुहेरी मानसिकतेतूनच बंगालमध्ये प्रदीर्घकाळ साहित्यनिर्मिती आणि चित्रपटनिर्मिती होत राहिली. वैश्विकतेला भाषेची बंधने नसतात ही जाण, त्याचबरोबर केवळ आपल्याच भाषेत संपूर्ण सारस्वत सामावलेले नाही याचे अचूक भान बंगाली संस्कृतीत मुरलेले आहे. यातूनच तेथे सत्यजित रायही निर्माण होतात आणि सौमित्र चटर्जीही घडवले जातात.

राय यांच्याप्रमाणेच सौमित्र चटर्जीच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. वाचन सखोल होते. अभिनेता होण्यापूर्वीपासून ते एक मासिक संपादित करत होते. नंतर त्यांच्या मासिकाची मुखपृष्ठे सत्यजित राय यांनी रेखाटली. रंगभूमीवरील त्यांचे योगदान हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी अनेक उत्तम कविता लिहिल्या आणि ते चित्रेही काढत. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि कारकीर्दीच्या सुरुवातीलाच सत्यजित रायसारख्यांचा वरदहस्त लाभूनही सौमित्रदांचे पाय जमिनीवरच राहिले. अपूच्या नजरेतील तो सुपरिचित खोलपणा एकाच वेळी विचारीपणा आणि अगतिकतेचे निदर्शक होता.  सौमित्र कोविडसमोर अगतिक ठरले, पण विचारीपणा चिरंतन ठेवूनच!

Story img Loader