भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) करोनारूपी संकटकाळातही केंद्रीय करारबद्ध क्रिकेटपटूंच्या मानधनात कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही सध्याच्या काळातली बहुधा एकमेव क्रीडा संघटना किंवा बीसीसीआय म्हणवून घेते त्याप्रमाणे खासगी कंपनी ठरावी. हा निर्णय स्तुत्य आहे. इतर क्रिकेट मंडळे आणि क्रीडा संघटनांच्या तुलनेत बीसीसीआय आर्थिकदृष्टय़ा किती तरी अधिक सुस्थिर आहे. हे स्थैर्य सध्याच्या संकटकाळात धावून आले, असेच म्हणावे लागेल. बीसीसीआयच्या तुलनेत इतर मंडळांची स्थिती तितकीशी चांगली अजिबातच नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची क्रिकेट मंडळे बीसीसीआयइतकी नसली, तरी तुलनेने बऱ्यापैकी सक्षम आणि सुस्थिर म्हणवली जातात. मात्र ऑस्ट्रेलियाने केंद्रीय करारनाम्याची घोषणा पुढे ढकलली आहे. तर इंग्लंडमध्ये कर्णधार ज्यो रूट त्याच्या काही सहकाऱ्यांसह दीर्घ मुदतीच्या रजेवर (फलरे) गेला आहे. या फलरे योजनेअंतर्गत ८० टक्के वेतनाचा भार ब्रिटिश सरकार उचलते. दोन्ही संघांच्या क्रिकेटपटूंनी वेतनकपातीविषयी अनेकदा वक्तव्ये केली आहेत. फुटबॉलमध्ये लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोन अव्वल फुटबॉलपटूंनी जवळपास ७० टक्के मानधनकपात स्वतहून मागून घेतलेली आहे. या दोघांचे फुटबॉल क्लब बार्सिलोना आणि युव्हेंटस अनुक्रमे स्पेन आणि इटलीमध्ये येतात, जिथे करोनाने हाहाकार माजवला आहे. टेनिसमध्ये फ्रेंच, विम्बल्डन, अमेरिकन या तीन प्रमुख स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अमेरिका आणि फ्रान्स यांना करोना प्रादुर्भावामुळे बसलेला फटका पाहता, यंदा या देशांमध्ये टेनिस काय, पण कुठलीच महत्त्वाची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होण्याची शक्यता नाही. टोक्यो ऑलिम्पिक पुढील वर्षांपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. या सगळ्या विध्वंसामध्ये मेसी, फेडरर, रोनाल्डो, नडाल, कोहली ही मंडळी सहज तरून जातील. त्यांच्या नावावर खेळांत कोटय़वधींची उलाढाल होते. पण या वलयांकित खेळाडूंपलीकडचे एक विश्व आहे. स्थानिक खेळाडूंचे, उदयोन्मुख खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, व्यायाम प्रशिक्षकांचे. त्यांचे काय?

बीसीसीआयने वेतनकपात न करण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ मिळणारे क्रिकेटपटू तीसही नाहीत! कारण केवळ केंद्रीय करारबद्ध मंडळींनाच वार्षिक वेतन मिळते. उर्वरितांना सामन्यागणिक मानधन (जे भरपूर असते) मिळते. पण मार्चपासून क्रिकेट सामनेच होत नसल्यामुळे या मानधनाचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय इतर कोणत्याही संघटनांपैकी हीच एकमेव क्रीडा संघटना अशी आहे, जिने स्वतहून वेतनकपातीसाठी पुढाकार घ्यायला हवा. यातून बाजूला राहणारा निधी इतर उद्देशांसाठी- उदा. उदयोन्मुख खेळाडू, प्रशिक्षक, पंच यांच्या कल्याणासाठी- वापरता येऊ शकला असता. काही राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदीला मुदतवाढ दिल्यामुळे आणि केंद्राकडूनही तसा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे १५ एप्रिलपर्यंत इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मिळालेल्या स्थगितीला तसा काही अर्थच उरलेला नाही. आता आयपीएल कदाचित सप्टेंबर वा ऑक्टोबरमध्ये खेळवावी लागेल. तशी ती खेळवली गेली नाही, तर मात्र फार मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा बीसीसीआयने दिला आहे. मात्र विराट कोहलीसह एकाही प्रमुख क्रिकेटपटूने स्वतहून वेतनकपातीचा विषय काढलेला नाही. इंग्लिश क्रिकेटपटू आर्थिक अडचणीत असतानाही त्यांच्या संघटनेने सहा लाख डॉलरहून अधिक रक्कम तेथील मंडळाला कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी मदत निधी म्हणून अदा केली आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमधील बडय़ा क्लबनी दुहेरी कल्याणकारी निर्णय घेतला आहे. आपापल्या प्रमुख फुटबॉलपटूंना आणि बडय़ा प्रशिक्षकांना ३० टक्के वेतनकपातीचा निर्णय घ्यायला लावून त्यातून उभे राहणारे जवळपास १५ कोटी डॉलर इंग्लंडमधील सुप्रसिद्ध एनएचएस या आरोग्यसेवेला व दुय्यम क्लबांच्या फुटबॉलपटूंसाठी हंगामी आधार म्हणून दिले जातील. आपल्याकडे आयपीएलच्या फ्रँचायझी चालकांनी तसेच आयपीएल प्रशासकीय मंडळाने असा काही विचार करण्याची गरज आहे.

हे झाले सांघिक खेळांविषयी. परंतु टेनिससारख्या वैयक्तिक खेळांमध्ये- विशेषत: खालील क्रमांकांवर खेळणाऱ्या, पण टेनिसशिवाय चरितार्थाचे कोणतेही साधन नसलेल्या टेनिसपटूंसाठी परिस्थिती बिकट आहे. भारताचे विख्यात माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी अलीकडे काही मुलाखतींतून या प्रश्नाला वाचा फोडली. टेनिसपटूंची संघटना किंवा विम्बल्डनसारख्या स्पर्धाचे संयोजक यांच्याकडे दुय्यम टेनिसपटूंच्या मदतीची कोणतीही योजना नाही किंवा एखादा निधी नाही. या सगळ्यांना करोना विषाणूच्या महासाथीने अंतर्मुख होऊन विचार करायला लावले आहे. करोनासारख्या संकटातून निभावून न्यायचे, तर एखादी ठोस कल्याणकारी योजना हाताशी असणे यापुढे

अनिवार्य बनणार आहे. क्रीडा क्षेत्रासाठी करोनाच्या संकटातूनही कल्याणाचा हा धडा खूप काही शिकवणारा आहे.

Story img Loader