सागर सरहदींचे नाव अलीकडे फारसे चर्चेत नव्हते. चर्चेत किंवा वलयात राहण्यासाठी आवश्यक क्लृप्त्या आत्मसात नसल्यास हे व्हायचेच. गेली काही वर्षे त्यांच्या मनात विलक्षण कटुता आलेली होती असे त्यांच्याशी परिचित मंडळी सांगतात. याचे कारण संहिता आणि शब्दांचे महत्त्व हिंदी चित्रपटसृष्टीत मागे पडू लागल्याचे त्यांचे म्हणणे. हा बदल खरे तर गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे कटुता केवळ या बदलामुळे होती की आणखी कशामुळे, हे गुपित त्यांच्याबरोबर कालशरण झाले आहे. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थांमध्ये सरहदी सक्रिय होते. तेथील अनेक डाव्या विचारवंतांचे ते निकटवर्ती. पुढे हिंदुत्वप्रेमींच्या व्यासपीठावर काही कार्यक्रमांत त्यांनी हजेरी लावल्याने कोणत्याच कंपूला ते ‘आपले’ वाटेनासे झाले. या वैचारिक कंपूवादाने सरहदी दुर्लक्षित राहिले व जवळपास अज्ञातवासातच अंतर्धान पावले, हा करंटेपणा त्यांच्या वर्तुळातील स्नेहीजनांचाच. फाळणीपूर्व पाकिस्तानमध्ये जन्म आणि फाळणीनंतर उद्ध्वस्त, विपन्नावस्थेत भारतात निर्वासित म्हणून आगमन हे प्राक्तन हिंदी सिनेसृष्टीतील ज्यांच्या वाट्याला आले, अशांपैकी सागर सरहदी एक. वायव्य सरहद्द प्रांतात जन्मलेले मूळचे गंगासागर तलवार भारतात आल्यानंतर आणि पुढे मुंबईत स्थिरावल्यानंतरही त्यांना जन्मभूमीशी ऋणानुबंध चिरंतन ठेवावेसे वाटले, म्हणून नावापुढे ‘सरहदी’! लिहिण्याच्या ऊर्मीमुळे ते भावाबरोबर मुंबईला आले. तत्कालीन मुंबईतील प्रयोगशील, अभिरुचिसंपन्न वातावरणात शिकत असतानाच भरपूर वाचनाच्या सवयीतून लिहिते झाले. खालसा महाविद्यालयात शिकत असताना संपूरन सिंग अर्थात गुलझार हे त्यांचे सहाध्यायी होते. चित्रपटाचा आकृतिबंध शब्दांत उतरवण्याची आवड बहुधा त्या मैत्रीतून निर्माण झाली असावी. चरितार्थासाठी कथालेखन आणि एकांकिका दिग्दर्शन सुरू होते. हा प्रवास पुढे चित्रपटांसाठी कथा आणि पटकथांच्या दिशेने सुरू झाला. सागर सरहदींच्या नावापुढे चित्रकृती तशा मोजक्याच. यश चोप्रांची त्यांच्यावर मर्जी. त्यामुळे ‘कभी कभी’, ‘नूरी’, ‘सिलसिला’, ‘चाँदनी’ या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा किंवा/आणि संवाद लिहिले. या नामावलीवरून सरहदींनी गल्लाभरू चित्रपटांसाठीच संवाद वा पटकथा लिहिल्याचा गैरसमज त्याहीवेळी अनेकांचा व्हायचा. पण यश चोप्रांकडून मिळाला तसा स्नेह व स्वातंत्र्य इतरांकडून लाभणे अवघड होते. त्यांचे संवाद जड असतात, असा अनेक निर्मात्यांचा आक्षेप होता. पण त्यांनी रेखाटलेल्या पात्रांमध्ये फाळणीच्या जखमांची वेदना दिसून यायची. सरहदी लिखित चित्रपटांतील स्त्रिया काहीएक भूमिका घेत. व्यावसायिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी तडजोडी करण्याची त्यांची तयारी नव्हती, कारण प्रोग्रेसिव्ह रायटर्स आणि इप्टामध्ये त्यांची वैचारिक घडण झाली होती. अशा एका गोंधळलेल्या क्षणी वृत्तपत्रातील एक बातमी त्यांच्या नजरेस पडली. हैदराबादेतील एका कुटुंबाने त्यांची मुलगी अरबाला विकल्याचे ते वृत्त होते. सरहदींसाठी तोच धागा संहिता, पटकथा आणि पुढे चित्रपट उभा करण्यासाठी पुरेसा ठरला. ‘बाजार’ हा सरहदी दिग्दर्शित एकमेव चित्रपट; पण समीक्षक आणि रसिकांनीही गौरविलेल्या अत्यंत दुर्मीळांतील एक. पुढे ‘दीवाना’, ‘कहो ना प्यार है’ अशा मसालापटांसाठीही त्यांनी पटकथा लिहिल्या. आपल्या क्षमतेबरहुकूम आणि वैचारिक उंचीचे शब्दसंपन्न लिखाण त्यांना करता येत नव्हते अशातला भाग नाही; परंतु हे लिखाण पेलण्याची कुवत असलेले आणि व्यावसायिक यशापलीकडे पाहू शकणारे निर्माते-दिग्दर्शकच नंतर फारसे उरले नाहीत. राजकीय वा वैचारिक ‘सरहद’ न मानणारे सरहदी अखेरीस एकटेच राहिले आणि संपले!

Story img Loader