गिरीश कुबेर
फ्रेंच, इंग्रजी, अरबी, फारसी अशा अनेक भाषांवर हुकमत. देशोदेशींचे कायदे, संस्कृती यांचं चक्रावून टाकणारं ज्ञान, कविता उद्धृत करण्याइतकी सांस्कृतिक श्रीमंती अशा अनेक गुणांनी ठासून भरलेलं व्यक्तिमत्व..
एखाद्याच्या कर्तृत्वात त्याच्या मायदेशाच्या भाग्यरेषेचा उगम असतो. शेख अहमद झाकी यामानी यापेक्षाही भाग्यवान. कारण ते जन्माला आले तेव्हा त्यांचा मायदेशच जन्मला नव्हता. गावंढळ, मागास आणि शरीराने तगडय़ा अरबांचे तांडेच्या तांडे हलकीसलकी कामं करत इकडून तिकडे फिरत. मक्का आणि मदीना त्या प्रांतात असल्यामुळे भाविकांची नेआण, त्यांच्या जेवणाखाणाची सोय इतकंच काय ते उत्पन्नाचं साधन. पुढे जगातला धनाढय़तम म्हणून ओळखला गेलेला महमंद बिन इब्न सौद हाच जिथे उंटावरच्या व्यापाऱ्यांना चहापाणी देऊन पोटाची खळगी भरत होता तिथे बाकीच्या नागरिकांची काय कथा? आणि नागरिक म्हणावी अशी प्रजा तरी कुठे होती, हाही प्रश्नच.
अशा वातावरणात मक्केत धार्मिक यमनियमांचा अर्थ लावणारा ‘न्यायाधीश’ आणि साहित्यप्रेमी महिलेच्या पोटी झाकीचा जन्म झाला. आसपासचं वातावरण असं असतानाही आपल्या मुलानं परदेशी जाऊन शिकायला हवं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्या दृष्टीनं जवळचा परदेश म्हणजे एके काळी आधुनिक संस्कृतीचं केंद्र असलेला इजिप्त. तिथल्या शाळेत मग अहमदची रवानगी झाली. परिसरातल्या अनेक देशांचे विद्यार्थी त्या शाळेत होते. त्यातला एक तर अहमदचा वर्गमित्र. मोहम्मद यासर अब्दुल रहमान अब्दुल रौफ अराफात अल-कुडवा अल-हुसैनी असं लांबलचक नाव होतं त्याचं. जग त्याला यासर अराफात नावानं ओळखतं.
तर तिथल्या शिक्षणावरच त्याचे वडील समाधानी नव्हते. धर्माचरण करणारे होते तरी आधुनिकतेचं महत्त्व न कळणाऱ्या कट्टर धर्मवेडय़ांसारखे ते नव्हते. त्यांनी अहमदला शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवलं. त्या वेळी. तिथं आधी हॉर्वर्ड आणि नंतर मॅसेच्युसेट्सचं एमआयटी अशा हव्याहव्याशा विद्यापीठांत तो शिकला. महत्त्वाचं म्हणजे शिकून तो अमेरिकावासी झाला नाही. परत आला. आपल्या गावंढळ मायदेशात. एव्हाना त्या प्रदेशाला नाव मिळालं होतं सौदी अरेबिया. या सौदीचा संस्थापक महंमद बिन इब्न सौद हा अशिक्षित राजा म्हणायचा : शिक्षण नेहमी आईच्या भाषेत आणि आईच्या भूमीत घ्यावं. अहमदचं प्राथमिक शिक्षण असंच झालं होतं. आणि उच्चशिक्षण जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठात धनाढय़ देशात घेऊनही त्याला अमेरिकावासी व्हावं असं वाटलं नाही. रियाधला येऊन अहमद छोटीमोठी नोकरी करू लागला.
वर्तमानपत्रात लिहायची हौस त्याला. भरपूर लिहायचा. विषय सगळे आधुनिक. पण मांडणी मातृभाषेत. त्या वेळी राजे फैझल गादीवर होते. तो देश लोकशाही तेव्हाही नव्हता आणि आता तर नाहीच नाही. संपूर्ण देश म्हणजे एका घराण्याची खासगी मालमत्ता. पण या मालमत्तेवर निरंकुश सत्ता असलेले राजे फैझल चक्क वर्तमानपत्र वाचायचे आणि त्यावर प्रतिक्रियाही द्यायचे, निर्णय घ्यायचे. आणि हेही अनेकांना माहीत नसेल कदाचित की इस्लामच्या मक्का-मदीना या कडव्या धर्मकेंद्रांचा निसर्गदत्त रक्षक असलेला हा राजा विचारांनी आधुनिक होता. इतका की, त्या वेळी त्यांनी महिला शिक्षणासाठी शाळा काढली होती आणि सर्व बाप्येच असले तर या शाळेत कोणी मुली/ तरुणी येणार नाहीत हे माहीत असल्यानं आपल्या पत्नीला शाळेत कामाला लावलं. सौदीची महाराणी शिक्षिका होती त्या वेळी.
तर अहमदचं वर्तमानपत्रीय लिखाण राजे फैझल यांनी वाचलं आणि त्याला बोलावून घेतलं. आपल्या पंखाखाली घेतलं. तोपर्यंत सौदीत अमाप तेल असल्याचं निश्चित झालेलं होतं. अमेरिकी कंपन्यांची रांग लागली होती ते तेल मिळवण्यासाठी. या फुकाच्या पैशानं आपली तिजोरी केवळ न्हाऊनच नाही तर ओसंडून वाहणार हेही दिसत होतं. फुकाचा असा पैसा आला की नियोजनाची गरज वाटत नाही. माणसं आणि देश सैलावतात. आणि नंतर मातीत मिळतात. राजे फैझल यांना हे कळत होतं. या पैशाची उत्तम व्यवस्था लावून द्यायला कोणी हवं होतं.
आणि समोर अहमद झाकी यामानी होता. राजे फैझल यांनी त्याच्याकडे सरळ तेलमंत्रिपद दिलं.
हा तसा अपवादच. सौदी अरेबियात पुढल्या सर्व काळात, तेल मंत्रालय नेहमी राजाच्या मर्जीतल्या राजपुत्राहाती अथवा खुद्द राजाच्या हातीच राहिलंय. पण राजघराण्याशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या, एका सामान्य घरातल्या बुद्धिमान तरुणाहाती तेल मंत्रालयाची ही दुभती गाय देणं ही घटनाच मोठी ऐतिहासिक. अहमद झाकी यामानी यांच्यामागे ‘शेख’ ही राजघराण्यासाठी राखीव उपाधी लागली ती त्यामुळे.
यामानी यांनी आपल्या राजस वागण्यानं पुढच्या आयुष्यात ती अत्यंत सार्थ ठरवली. कधी जगातला अत्यंत महागडा सेविल सूट तर कधी अरबांचा तो पांढरा झगा. यामानी दोन्ही तितक्या सहजपणे वागवत. जिभेवर सरस्वती आणि तिला साजेशी सुप्रसन्न मिठास आणि डोक्यात गारवा. फ्रेंच, इंग्रजी, अरेबिक, फारसी अशा अनेक भाषांवर हुकमत. देशोदेशींचे कायदे, संस्कृती यांचं चक्रावून टाकणारं ज्ञान, मधेच सहज कविता उद्धृत करण्याइतकी सांस्कृतिक श्रीमंती अशा अनेक गुणांनी ठासून भरलेलं व्यक्तिमत्त्व. त्यामुळे मक्केतला इस्लामी धर्ममरतड असो की वॉशिंग्टनमध्ये मुत्सद्दीमरतड हेन्री किसिंजर असोत; यामानी कोणाशीही तितक्याच सहजतेनं संवाद साधत. त्यांची ही हातोटी इतकी विलक्षण की, त्यांच्या हत्येची प्रतिज्ञा करत अपहरण करणारा कुख्यात कार्लोस द जॅकलदेखील त्यांच्या शब्दजाळ्यात अडकला आणि त्यांना जिवंत सोडून देता झाला. यामानी यांच्याशी चर्चेच्या वाटाघाटी करायची वेळ आलेल्या जवळपास सगळ्यांनी लिहून ठेवलंय त्यांच्याविषयी. चर्चाविषय कितीही वादग्रस्त, गुंतागुंतीचा असो. यामानी अजिबात थकत नसत. त्यामुळे त्यांची मन:शांती कधीही ढळत नसे. समोर कोणीही असो. तीच शांती आणि तोच गोडवा. चर्चा जितकी लांबेल तितके यामानी अधिकाधिक शांत आणि गोड होत. अशा चर्चाचे आंतरराष्ट्रीय मानक अशा हेन्री किसिंजर यांनी यामानी यांच्या मुत्सद्दीकौशल्याला प्रमाणपत्र देऊन ठेवलंय यातच काय ते आलं. हे म्हणजे टेनिसचा सामना पाचव्या सेटमध्ये गेला की फेडरर जसा अधिक खुलतो आणि समोरच्याला दमवत दमवत जिंकतो तसं. यामानींसमोर चर्चेत समोरचे थकत आणि माना टाकत. एका मागास, अर्धशिक्षित अशा देशाचा साधा तेलमंत्री इतका सुसंस्कृत आणि व्युत्पन्न होता हेच अनेकांना झेपत नसे. आणि तिथेच अनेकांची चूक होती. कारण झाकी यामानी हा काही केवळ एखादा तेलमंत्री नव्हता.
तर पं. नेहरू यांनी काव्यात्मपणे ज्याचं ‘वसुधारा’ असं वर्णन केलं त्या खनिज तेलाचा आणि त्यानिमित्ताने ऊर्जा क्षेत्राचाच एक द्रष्टा भाष्यकार होता. ही बाब फार महत्त्वाची. म्हणून व्यापार, किमतीतील चढउतार या नैमित्तिक घटकांपलीकडे जात तेलाकडे पाहण्याची नजर त्यांना होती. म्हणूनच राजे फैझल यांचे उत्तराधिकारी असलेल्या फाहद यांचा तेल दर वाढवण्याच्या अव्यवहारी आग्रहास बळी पडण्यापेक्षा तेलमंत्रिपदाची किंमत त्यांनी मोजली. अत्यंत अशोभनीयपणे त्यांना त्या पदावरून दूर केलं गेलं आणि स्थानबद्धही ठेवलं गेलं. तरीही त्यांची शांतता जराही ढळली नाही. ही स्थानबद्धता संपल्यावर त्यांनी चंबूगवाळं उचललं आणि स्वित्झर्लंडला घर केलं. लंडन आणि मक्का इथंही घर होतीच त्यांची. नंतर ऊर्जा क्षेत्रावर मार्गदर्शन, सल्लामसलत करणारी कंपनी ते चालवत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदांत ते असतील तर भलेभले गर्दी करत त्यांना ऐकायला. ऊर्जेसारखा क्लिष्ट विषय पण यामानी यांचं भाषण म्हणजे रसाळतेचा अर्क असे. हरखून जाणं म्हणजे काय याचा अनुभव अशाच एका परिषदेत घेता आला होता. तिथेच या ‘एका तेलियाने’ मनात घर केलं.
‘‘तेलातून येणाऱ्या पैशामागे हे अरब धावत राहिले तर ते श्रीमंत तर होणारच नाहीत, उलट भिकेला लागतील.’’
‘‘अश्मयुग संपलं ते काही जगातले दगड संपले म्हणून नाही. पण तेल मात्र तेलयुगाचा अंत व्हायच्या आधीच संपेल.’’
‘‘आधुनिक तंत्रज्ञान, ते विकसित करण्याची क्षमता हेच उद्याच्या ऊर्जासमस्येवरचं उत्तर असेल.’’
– अशी अनेक वक्तव्यं त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतील आणि ‘टेस्ला’पासून अनेक बाबी त्याचा पुरावा देतील.
लंडनला हाईड पार्कच्या परिघावरल्या नाइट्सब्रिज या रम्य अतिश्रीमंत, पण अभिजात परिसरात घर होतं त्यांचं. हाईड पार्कवर रेंगाळत दिवस काढण्याचा आनंद अनेकदा लुटता आला. गप्पा मारत त्या अनादी-अनंत मैदानात हिंडण्याचं स्वप्न पाहावं अशा दोनच व्यक्ती. लेडी डायना आणि दुसरे अहमद शेख झाकी यामानी. काही स्वप्नांचं मोठेपण त्यांच्या अपूर्णतेच असतं. असो.
तेल क्षेत्रात अनेक सम्राट आजही आहेत. यामानी कधीच असे सम्राट नव्हते. सम्राटपद काय.. आनुवंशिकतेनंही मिळतं. यामानी या क्षेत्राचे बिरबल होते. अकल्पित श्रीमंती अकस्मात वाटय़ाला आलेल्या सौदी अरेबिया नामक देशास आधुनिक नागर संस्कृतीजवळ नेणाऱ्या तेल क्षेत्राच्या या बिरबलास आदरांजली.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber