अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य करदात्यांना दिलासा दिला आहे. नवी करप्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला यापुढे कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. या अगोदर ही मर्यादा २.५ लाख होती. आता ती ५ लाख करण्यात आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले आहेत. निर्मला सीतारामन बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये बदल करू शकतील, असे वृत्त लोकसत्ता डॉट कॉमने दिले होते. सध्या २.५ लाख रूपये ते ५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर लागत होता. आता ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.

५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागत होता. आता त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यानुसार ५ लाख ते ७.५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर लागेल आणि ७.५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर आकारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी जाहीर केले.

१० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आतापर्यंत ३० टक्के कर लागत होता. आता त्यातही तीन स्लॅब पाडण्यात आले आहेत. १० ते १२.५ लाख रूपये उत्पन्न असणाऱ्यांना आता २० टक्के कर लागेल. तर १२.५ ते १५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता २५ टक्के आयकर भरावा लागेल. १५ लाखांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे ३० टक्के आयकर भरावा लागणार आहे.

अशी असेल नवी करप्रणाली
– ५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही
– ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर
– ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार
– १० ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागणार
– १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार
– १५ लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे ३० टक्के कर लागणार

आणखी वाचा – बँक दिवाळखोरीत निघाली तरी ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित

करदात्यांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी सरकार कटिबद्ध : अर्थमंत्री
करदाते कोणत्याही प्रकारच्या कर-जाचापासून मुक्त राहतील, याची हमी देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांन सांगितलं आहे. कर कायद्यामध्ये सुधारणा करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच यावेळी त्यांनी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा त्यात काही घोटाळा झाला तरी खातेदाराच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतील अशी घोषणा करत खातेदारांना दिलासा दिला.