भांडवली बाजारातील निर्देशांक घसरण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सोमवारच्या मोठय़ा निर्देशांक आपटीनंतर मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात तेजीसह करणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी सत्रअखेर मात्र घसरणीसहच केली.

सेन्सेक्स २६१.८४ अंश घसरणीसह ३१,४५३.५१ वर तर ८७.९० अंश घसरणीने निफ्टी ९,२०५.६० पर्यंत स्थिरावला.

सप्ताहारंभ तुलनेत मंगळवारच्या व्यवहारात मुंबई निर्देशांकाने ८१० अंशांनी झेप घेतली होती. या दरम्यान त्याने ३१,५०० च्या पुढचा प्रवास नोंदविला होता.

सेन्सेक्समध्ये स्टेट बँकेचे समभाग मूल्य सर्वाधिक, ४ टक्क्य़ांपर्यंत घसरले. त्याचबरोबर बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, आयसीआयसीआय बँकही घसरणीच्या यादीत राहिले.

मुंबई निर्देशांकातील महिंद्र अँड महिंद्र, पॉवरग्रिड, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग मूल्य काही प्रमाणात वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, बँक, वित्त, आरोग्यनिगा, भांडवली वस्तू आदी जवळपास ३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर ऊर्जा, तेल व वायू, बहुपयोगी वस्तू निर्देशांक १.२७ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्क्य़ापर्यंत घसरले.