करोनाबाधितांची संख्या पुन्हा वेग घेऊ लागल्याबाबतची चिंता गुरुवारी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून व्यक्त झाली. परिणामी सलग दोन व्यवहारातील घसरणीतून बुधवारी सावरणाऱ्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारी पुन्हा घसरण नोंदविली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवार सत्रअखेर २४२.३७ अंश घसरणीसह ३१,४४३.३८ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१.८५ अंश घसरणीने ९,१९९.०५ पर्यंत स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये ओएनजीसीचे मूल्य सर्वाधिक, ४.५४ टक्क्य़ाने घसरले. तसेच एनटीपीसी, कोटक महिंद्र बँक, भारती एअरटेल, टायटन, बजाज ऑटो यांचेही मूल्य घसरले. तर एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड २.२६ टक्क्य़ांपर्यंत वाढले. इंडसइंड बँक, महिंद्र अँड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रिज, अ‍ॅक्सिस बँक, टेक महिंद्र जवळपास ७ टक्क्य़ांपर्यंत उंचावले.