सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत खरबदारीचा उपाय म्हणून अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मार्च तिमाहित अॅमेझॉनचा नफा २९ टक्क्यांनी कमी होऊन तो २५४ कोटी डॉलर्स इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहित अॅमेझॉनला ३५६ कोटी डॉलर्सचा नफा झाला होता. यावेळी त्यांना तब्बल १०२ कोटी म्हणजेच अंदाजे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीला लॉकडाउनच्या कालावधीत आपल्या सेवेवर अधिक खर्च करावा लागला. तर काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंना वगळून अन्य वस्तूंच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. मार्च महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
गेले तीन महिने अनेक ठिकाणी लॉकडाउनमुळे लोकं आपल्या घरांमध्ये बंद आहेत. या कालावधीत त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदीही केली. परंतु करोनामुळे कंपनीला आपल्या अन्य बाबींमध्ये म्हणजेच वस्तूंचा पॅकिंग, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं, त्यांना संरक्षण साहित्य पुरवणं आणि अधिक पैसे देणं यासर्वांमध्ये वाढ करावी लागली. या सर्व बाबींमुळे खर्चात अतिरिक्त वाढ झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. याव्यतिरिक्त काही ठिकाणी सामानाच्या विक्रीसाठी परवानगीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात घट झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर अधिक खर्च
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार उत्तम सेवा पुरवणअयासाठी कंपनीनं अधिक कर्मचाऱ्यांची भर्ती केली. तसंच अधिक काम केल्याबद्दल त्यांना मोबदलाही जास्त देण्यात आला. परंतु करोना व्हायरचा संसर्ग होण्याच्या भीतीनं काही जणांनी कामावर न येण्याचाच निर्णय घेतला. यामुळे कंपनीवरील खर्च वाढला आहे. परिस्थिती पूर्वपदावर केव्हा येईल हे सांगणं कठिण असून आता याबाबत काही सांगता येणार नाही, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
४०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार
कंपनी दुसऱ्या तिमाहित ४०० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक गुतवणूक करणार आहे. कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ काम केल्याचा मोबदला, संरक्षण साहित्य आणि अन्य कामांसाठी ही रक्कम खर्च केली जाणार असल्याची माहिती अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस यांनी सांगितलं.
भारतात सर्वाधिक नुकसान
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती कंपनीचे सीएफओ ब्रायन ओल्सावस्की यांनी दिली. भारतात केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी आहे. त्यामुळे आम्हाला अनेक ऑफर्स मागे घ्याव्या लागल्या. ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच काम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणीही कंपनीनं सरकारकडे केली आहे.