मल्यांना ४ कोटी डॉलर दिले – दिआज्जिओ
लंडनमध्ये गेलेल्या विजय मल्या यांना येत्या आठवडय़ात होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबतचे समन्स सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी बजाविले. यासाठी मल्या यांना आता मुंबईत हजर राहावे लागेल. शुक्रवारी सकाळी किंगफिशरचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन हे चौकशीसाठी उपस्थित राहिल्याचे कळते. तपास यंत्रणेने गुरुवारीच किंगफिशर एअरलाइन्सकडून येणी असलेल्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व बंद पडलेल्या हवाई सेवा कंपनीच्या माजी मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला समन्स बजावले होते.
राज्यसभा सदस्य मल्या सध्या लंडनच्या उत्तरेला एका खेडय़ात राहात आहेत. त्यांनी बँकांना ९ हजार कोटींचा गंडा घालत ते २ मार्चला देशाबाहेर गेले.
युनायटेड स्पिरिट्सबरोबरच्या व्यवहारानुसार विजय मल्या यांना ७.५ कोटी डॉलर देणे असून पैकी ४ कोटी डॉलर यापूर्वीच अदा करण्यात आल्याचे मद्य कंपनीवर ताबा घेणारी ब्रिटनस्थित दिआज्जिओने स्पष्ट केले आहे. कर्जवसुली लवादाच्या व्यवहार रकमेवर आणणेल्या टाचेबद्दल ‘आम्ही यंत्रणेच्या आदेशाचा आढावा घेणार आहोत’ असेही दिआज्जिओने शुक्रवारी वृत्तसंस्थेला पाठविलेल्या ई-मेलद्वारे स्पष्ट केले. हीच माहिती कंपनीने लंडन भांडवली बाजारालाही कळविल्याचे कंपनीचा प्रवक्ता म्हणाला. या व्यवहाराला आव्हान देणाऱ्या स्टेट बँकेच्या अर्जावरील सुनावणी लवाद येत्या २८ मार्च रोजी घेणार आहे.