विविध योजनांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. कृषि आणि सिंचन क्षेत्रासाठी २.८३ लाख कोटी रूपयांची तरतूद करून सीतारामन यांनी शेतकऱ्यांची मने जिंकली.

पण, त्यातही एक नवी योजना आणली आहे. ती म्हणजे, शेतकऱ्यांना आपला नाशवंत माल आता रेल्वेच्या एसी डब्यातून नेता येणार आहे. म्हणजेच येत्या काळात आता नाशवंत असलेल्या शेती मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेद्वारे विशेष एसी डबा दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल लवकर खराब होणार नाही आणि त्या मालाला चांगला भावही मिळेल. भाज्या-फळे यांच्या वाहतुकीसाठी या योजनेचा फायदा होईल.

शेतकऱ्यांसाठी आणखी कोणत्या घोषणा केल्या?

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
  • ६.११ कोटी शेतकऱ्यांसाठी विमा योजना लागू करणार
  • पंतप्रधान कृषी विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
  • अन्नदाता ऊर्जादाता बनवण्यावर भर देण्यात येणार आहे.
  • कृषी क्षेत्रासाठी मार्केटिंग-प्रोसेसिंगवर भर दिला जाणार आहे.
  • सोलारचा वापर वाढतो आणि वाढवत नेणार. त्यासाठी २० लाख शेतकऱ्यांसाठी सोलार पंप योजना लागू करण्यात येईल.
  • शेतजमिनीचा चांगला वापर करून अधिक उत्पन्न कसं घेता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.
  • जलसंकटात असलेल्या १०० जिल्ह्यांना सहाय्य देणार. त्यांच्यासाठी खास योजना आणण्यात येईल.
  • झिरो बजेट नॅच्युरल फार्मिंगवर भर देणार. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, अशी अर्थमंत्र्यांना आशा आहे.
  • किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, माशांची वाहतूक करणे सुसह्य करणार.
  • कृषी उड्डाण योजनेद्वारे आदिवासी भागांतील शेती सुधारणा करणार
  • मत्यपालनासाठी नवी योजना आणणार. २ कोटी टन उत्पादनाचे लक्ष्य
  • कृषी आणि सिंचन क्षेत्रासाठी २.८३ लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.