करोना आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर आता भारतीय अर्थव्यवस्थेची चाकं पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजेच एफपीआयच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेमध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या १८ दिवसांमध्ये ५४ हजार ९८० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जागतिक बाजारांमध्ये अतिरिक्त पैसा आणि विविध क्षेत्रांसाठी केंद्रीय बँकांना आणखीन एक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याने एफपीआयच्या माध्यमातून गुंतवणूक केली जात आहे. ठेवींसंदर्भातील आखडेवारीनुसार एफपीआयने एक डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान थेट ४८ हजार ८५८ कोटी तर बॉण्डच्या माध्यमातून सहा हजार ११२ कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यामुळेच या १८ दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये परदेशी गुंतवणुकदारांनी ५४ हजार ९८० कोटींची गुंतवणूक केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की वाचा >> कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पर्मनन्ट कामगारांना कंपन्या कान्ट्रॅक्टवर आणू शकत नाहीत; केंद्र सरकारचा इशारा

मागील महिन्यामध्ये एफपीआयच्या माध्यमातून झालेली ६२ हजार ९५१ कोटींची गुंतवणूक : नोव्हेंबर महिन्यामध्ये एपफीआयच्या माध्यमातून  ६२ हजार ९५१ कोटींची गुंतवणूक झाली होती. मॉर्निंग स्टार इंडियाशी संलग्न अशणारे निर्देशक आणि जाणकार हिमांशू श्रीवास्तव यांनी, “जागतिक बाजारपेठेत असणारा अतिरिक्त पैसा आणि कमी व्याजदरांमुळे भारतासारख्या वाढणाऱ्या बाजारपेठेमध्ये ही परदेशी गुंतवणूक येतेय,” अस मत व्यक्त केलं आहे.

वेगवेगळ्या देशांमधील केंद्रीय बँकांकडून आर्थिक विकासाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी नवीन प्रोत्साहन पॅकेजची घोषणा होण्याच्या आशेने गुंतवणुकदार धोका पत्कारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे, असं श्रीवास्तव म्हणाले. तसेच करोनाची लस आल्याने भारतासारख्या वाढ अपेक्षित असणाऱ्या बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीस चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळेच गुंतवणूक वाढली असून गुंतवणुकीला बळ मिळत आहे, असंही सांगितलं जात आहे.

एफपीआय म्हणजे काय?

> विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक ही परदेशामध्ये कोणत्याही पद्धतीने केलेली गुंतवणूक असते. यामध्ये स्टॉक्सबरोबरच बॉण्डच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने गुंतवणूक केली जाते.

> या गुंतवणुकीमध्ये कोणत्याही देशात राहणारे नागरिक शेअर्स, सरकारी बॉण्ड, कॉर्परेट बॉण्ड, परिवर्तनीय सिक्युरीटीज, अनेक श्रेत्रांमध्ये सिक्युरीटीजच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते.

> एफपीआयच्या माध्यमातून केली जाणारी गुंतवणूक ही कमी कालावधीसाठी वित्तीय फायदा मिळवण्यासाठी केली जाते. एखाद्या उद्योगामधील नियंत्रण मिळवण्याचा हेतू अशाप्रकारच्या गुंतवणुकीमध्ये नसतो.

> एखाद्या संपत्तीवरील हक्क या गुंतवणुकीच्या माध्यमातून सांगता येत नाही. बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन ही गुंतवणूक केली जाते.

> एफपीआय ही थेट गुंतवणूक असते.