आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या मौल्यवान धातूने प्रति औन्स २,००० डॉलरचा टप्पा ओलांडल्याने भारतात सोन्याचे दर तोळ्यासाठी ५५ हजार रुपयांच्या पुढे गेले. चांदीतील दरचकाकीही बुधवारी लक्षणीय ठरली. कमकुवत डॉलर आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोने, सोनेरूपातील गुंतवणूक पर्यायाकडील ओघ मौल्यवान धातूला विक्रमी टप्प्यापुढे घेऊन जात आहे.

मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड सोन्याचा भाव बुधवारअखेर १० ग्रॅमसाठी ५५,२२६ रुपयांवर पोहोचला. तर शुद्ध सोने तोळ्यासाठी ५५,४४८ रुपये होते. शहरात चांदी किलोमागे ७१,२०० रुपयांपर्यंत पोहोचली होती.

मौल्यवान धातू प्रथमच उच्चांकी दरटप्प्यावर पोहोचला आहे. सोन्याच्या किं मती चालू वर्षांत आतापर्यंत ३० टक्कयांहून अधिक वाढल्या आहेत. रोख्यांवरील व्याज कमी होत असतानाच अनेक देशांकडून जाहीर होणाऱ्या सरकारी सवलती, अर्थसाहाय्याच्या जोरावर सोने तसेच चांदीला मागणी येत आहे. भारतात सोने दर तोळ्यासाठी आठवडय़ाच्या आतच ५० हजार ते ५५ हजार रुपये असा प्रवास करते झाले आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे अवघ्या दोन दिवसात ८ हजार रुपयांची भर पडली आहे.

Story img Loader