हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवरील जास्त आयात शुल्कावर टीका

महागडी दुचाकी नाममुद्रा हार्ले डेव्हिडसन या अमेरिकी मोटारसायकलवरील जास्त आयात शुल्काबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. अशा पद्धतीने आमच्या उत्पादनांवर आयात शुल्क जास्त ठेवणे हे अमेरिकेवर अन्याय करणारे आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून महागडय़ा मोटारसायकलवरील आयात शुल्क हे पन्नास टक्के कमी करण्यात आले आहे, तरीही ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पोलाद उद्योगाबाबत अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले, की भारताने जो निर्णय घेतला आहे त्याच्या बदल्यात आम्ही भारताच्या मोटारसायकलींवर अमेरिकेत आयात शुल्क वाढवू.

भारताने अलीकडेच परदेशातून आयात होणाऱ्या महागडय़ा मोटारसायकलींवरचा आयात कर ७५ टक्क्यांवरून ५० टक्के केला आहे, पण आम्ही त्यावर समाधानी नाही, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिका आयात होणाऱ्या मोटारसायकलींवर शून्य आयात शुल्क लावते, त्यामुळे अमेरिकेच्या मोटारसायकलींवर भारताने आयात शुल्क आकारणे हे अन्यायकारक आहे. ‘आम्ही अनेक देशांत आमची उत्पादने पाठवतो, पण त्यावर आयातशुल्क भरमसाट लावले जाते. हार्ले डेव्हिडसन ही आमची मोटारसायकल जेव्हा एखाद्या देशात पाठवली जाते तेव्हा तिच्यावर आयात कर लावला जातो,’ अशी पुस्ती त्यांनी भारताचा उल्लेख न करता जोडली.

ट्रम्प यांनी गेल्या आठवडय़ात एका मुलाखतीत, ‘भारतातील सभ्य गृहस्थांनी (मोदी) मला फोन केला. परदेशी मोटारसायकलींवरचे आयात शुल्क ७५ टक्के ते १००  टक्क्यांवरून ५० टक्के केले असे सांगितल्याचा उल्लेख केला. स्पष्ट नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, ‘तुमच्याकडे जर भारतात हार्ले डेव्हिडसन कुणी घेतली असेल तर त्यावर ५० ते ७५ टक्के आयात शुल्क आहे, पण तुमच्या मोटारसायकली आमच्या देशात येतात तेव्हा आम्ही शून्य आयात शुल्क लावतो.’

अशा प्रकारे चढे आयात शुल्क लावले जाणार असेल तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊन तुमच्या वस्तूंवरचे आयात शुल्क वाढवू. यात मी भारताला दोष देत नाही, पण जे चालले आहे ते अन्यायकारक आहे. त्याला खुला व्यापार म्हणत नाहीत, असे ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसला सांगितले.