अमेरिकेची ई-व्यापार क्षेत्रातील महाकाय कंपनी अ‍ॅमेझॉन डॉट कॉमने फ्यूचर समूहाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजशी २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवसाय विक्रीचा व्यवहार करून फ्यूचर समूहाने अमेरिकी कंपनीबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन झाले असल्याचा यातून दावा केला गेला आहे.

करारबद्ध हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठीच हे पाऊल उचलले गेले आहे, असे सिएटलस्थित अ‍ॅमेझॉन डॉट कॉमने स्पष्ट केले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या संबंधाने अधिक तपशील देण्यास मात्र तिने असमर्थता दर्शविली.

अ‍ॅमेझॉनने गतवर्षी फ्यूचर समूहातील बिगर-सूचिबद्ध कंपनी- फ्यूचर कुपन्स लिमिटेडमधील ४९ टक्के भागभांडवल हस्तगत केले आणि त्यासमयी केलेल्या करारात समूहातील अग्रणी कंपनी फ्यूचर रिटेलच्या तीन ते १० वर्षे कालावधीत खरेदीचे हक्कही राखून ठेवले होते. फ्यूचर कूपन्सची या कंपनीत ७.३ टक्के हिस्सेदारी आहे. मात्र सरलेल्या ऑगस्टमध्ये फ्यूचर समूहाने आपल्या किराणा, घाऊक विक्री तसेच गोदाम व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विक्री करणारा सामंजस्य करार केला. सर्व प्रकारच्या नियामक मंजुऱ्यांचे सोपस्कार या व्यवहाराने अद्याप पूर्ण करावयाचे असले, तरी त्या संबंधाने पहिला कायदेशीर अडसर अ‍ॅमेझॉनने निर्माण केल्याचे त्रू्तास दिसून येते.

रिलायन्सबरोबरच्या व्यवहारासाठी फ्यूचर समूहाला सल्ला देणाऱ्या संस्थेने, फ्यूचर कूपन्स या कंपनीला अ‍ॅमेझॉनकडून कायदेशीर नोटीस आल्याची कबुली वृत्तसंस्थेला दिली आहे. तथापि फ्यूचर समूह हे प्रकरण मध्यस्थी अथवा लवादाच्या माध्यमातून सामोपचाराने सोडवू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर समूहाकडून या संबंधाने अधिकृतपणे कोणताही खुलासा केला गेलेला नाही.