बँकांच्या समभागांकडून तेजीचे इंधन

मुंबई : भांडवली बाजाराच्या निर्देशांकांनी सलग चौथ्या दिवशी आगेकूच कायम ठेवत मंगळवारी नवीन शिखरस्थान सर केले. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी स्थानिक बाजारातील खरेदी उत्साह कायम ठेवला आणि प्रामुख्याने बँकिंग समभागांतील तेजीने सेन्सेक्स-निफ्टीच्या मुसंडीला इंधन पुरविले.

देशांतर्गत महागाईचा दर नियंत्रणाबाहेर चालला असून, किरकोळ किमतीवर आधारित चलनवाढीच्या दराने ६.३ टक्के अशा रिझव्‍‌र्ह बँकेच्या समाधान पातळीच्याही पल्याड मजल गाठणारी आकडेवारी सोमवारी जाहीर झाली. याची अर्थव्यवस्थेला भोगावी लागणारी किंमत पाहता, मंगळवारी भांडवली बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र महागाई दराची चिंता बाजाराला शिवतानाही दिसून आली नाही. मंगळवारचे व्यवहार संपताना सेन्सेक्स २२१.५२ अंशांची भर घालत ५२,७७३.०५ या नव्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात त्याने ५२,८६९.५१ अशा अभूतपूर्व पातळीलाही स्पर्श केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने ५७.४० अंशांची वाढ साधून १५,८६९.२५ असा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. निफ्टीनेही दिवसाच्या व्यवहारात १५,९०० पल्याड इतिहासात पहिल्यांदाच मजल मारताना, १५,९०१.६० पर्यंत झेप घेतली होती.

सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या ३० समभागांपैकी निम्मे म्हणजे १५ समभागांमध्ये मंगळवारी मूल्य वाढ झाली. ज्यात प्रामुख्याने अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक अग्रेसर राहिले. तीन टक्क्य़ांहून मोठी मूल्य वाढ साधणारा एशियन पेंट्स हा सेन्सेक्समधील सर्वाधिक कमाई करणारा समभाग ठरला.

सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी अनुक्रमे ०.४२ टक्के आणि ०.३६ टक्के वाढीसह नवीन विक्रमी स्तर गाठला. तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांनी त्यापेक्षा सरस म्हणजे अनुक्रमे ०.४४ टक्के आणि ०.६० टक्क्य़ांनी मुसंडी मारली. याचा अर्थ बाजारात मंगळवारी खरेदीचा उत्साह सर्वव्यापी होता.

‘अदानीं’च्या समभागांची संमिश्र प्रतिक्रिया

विदेशी गुंतवणूकदारांची डिमॅट खाती गोठवल्याचे वृत्त हे अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, अदानी समूहातील सहा सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मंगळवारी फारसे सावरताना दिसून आले नाहीत. सोमवारी या समभागांमध्ये मोठी पडझड झाली होती. मंगळवारी बाजारातील तेजीच्या वातावरणातही, अदानी एंटरप्रायझेस २.४५ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी २.७९ टक्के असे सोमवारच्या पडझडीच्या जवळपास निम्म्याने भरपाई करताना दिसले. त्या उलट अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर हे समभाग दिवसातील खालच्या सर्किटपर्यंत म्हणजे पाच टक्क्य़ांपर्यंत गडगडताना दिसले. अदानी पोर्ट अँड एसईझेड हा समभागही ०.९४ टक्क्य़ांनी घसरणीत राहिला.

गुंतवणूकदारांच्या मत्तेत पावणेचार लाख कोटींची भर

*  मागील सलग चार सत्रांमध्ये सुरू असलेल्या ‘सेन्सेक्स’च्या आगेकुचीत, या निर्देशांकाने एकूण ८३१.४१ अंशांचा नवीन शिखर स्तर गाठला आहे. यातून गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही ३,७३,२६३ कोटी रुपयांची भर पडली आहे. निर्देशांकाने सार्वकालिक उच्चांक गाठलाच, तर मंगळवारी मुंबई शेअर बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवलही २,३१,५८,३१६.९२ कोटी रुपयांच्या अभूतपूर्व उच्चांक पातळीवर गेले आहे. २०२१ च्या वर्षांरंभापासून ‘सेन्सेक्स’च्या सुरू राहिलेल्या विक्रमी वाटचालीत, ५,०२१.७२ अंशांची (१०.५१ टक्क्य़ांची) नव्याने भर पडली आहे.

रुपयात सलग सहावी मूल्य घसरण 

भारतीय चलन रुपयाचा अमेरिकी डॉलरपुढे मूल्य ऱ्हास निरंतर सुरूच असून, मंगळवारी सलग सहाव्या सत्रात रुपयाचे विनिमय मूल्य आणखी दोन पैशांनी कमकुवत होऊन ते ७३.३१ या पातळीवर रोडावले. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीही सतत वाढत असल्याने, तेल आयातदारांकडून वाढलेल्या डॉलरच्या मागणीचा रुपयाच्या मूल्यावर सुस्पष्ट ताण पडल्याचे दिसून येत आहे. मागील सलग सहा सत्रांमध्ये रुपयाचे विनिमय मूल्य तब्बल ५१ पैशांनी कमजोर झाले आहे. यापूर्वी रुपयाच्या मूल्यात इतक्या तीव्र स्वरूपाची घसरण ही सरलेल्या एप्रिल महिन्यात दिसून आली होती. त्या महिनाभरात प्रति डॉलरमागे भारतीय चलनाचे मूल्य २.०७ रुपयांनी गडगडले होते.