विभा पाडळकर

गेल्या १९ वर्षांत आयुर्विमा व्यवसायात फेरबदल घडले आहेत. कुटुंबप्रमुखाने नजीकच्या विमा प्रतिनिधी जो बहुदा नातेवाईक अथवा मित्र असतो त्याच्याकडून गळ्यात मारली जाईल ती पॉलिसी खरेदी करायची, ही प्रथा केव्हाच मागे पडली आहे. २००० मध्ये विमा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केले गेले आणि या क्षेत्राने त्यानंतर अनेक नवप्रवाह अनुभवले आहेत. ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी आल्या आहेत आणि त्यानुसार विक्री व वितरणाचे प्रघातही बदलत आले आहेत. विमा हे एक महत्त्वाचे आर्थिक कवच असल्याचे ग्राहकांच्या ध्यानी आले असून, मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) योजनांकडे कल वाढला आहे.

आयुर्विमा योजना विकण्याच्या आणि खरेदी करण्याची पद्धतीही त्यामुळे आपोआपच बदलली आहे. आधुनिक युगाच्या डिजिटल व्यासपीठांमुळे – इंटरनेटची जाण नसलेल्या मंडळींनाही अगदी काही मिनिटांत विमा योजना खरेदी करता येतात. आयुर्विमा योजनांच्या खरेदीची प्रक्रिया सोपी आणि झटपट बनण्याबरोबरीनेच, निवडीचे पर्यायही कैकपटींनी वाढले आहेत. अनेक प्रसंगी विमा कंपन्यांनी प्रस्तुत केलेल्या उत्पादनांमधून निवड करणे गोंधळ उडवून देणारे ठरते. बरोबरीने ऐकीव माहिती आणि बऱ्या-वाईट अनुभवाच्या आधारे मित्र व स्नेहीजनांकडून मिळालेल्या अनाहूत सल्ल्याने संभ्रमात भर पडते.

आयुर्विमा योजना घेत असताना पुढील मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत –

आयुर्विमा हे दीर्घावधीचे उत्पादन आहे. कोणतीही आयुर्वमिा योजना खरेदी करताना किमान पुढची १० वर्षे गुंतवणूक सुरू राहील याचा विचार केला पाहिजे. त्यापेक्षा कमी कालावधी असेल तर तुमच्या गुंतवणुकीवर अपेक्षित परताव्याशी तुम्हीच तडजोड करीत आहात हे लक्षात घ्या.  भविष्याविषयी नियोजन करताना आर्थिक संरक्षणाला प्राधान्य द्या. तुम्ही सर्वप्रथम जीवनाला, तुमच्या आरोग्याला आणि निवृत्तीपश्चात जीवनमानाचे विशुद्ध संरक्षणाची काळजी घ्यायला हवी. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यायोगे तुम्ही तुमचे व प्रियजनांचे कोणत्याही अनपेक्षित संकटापासून संरक्षण करणार आहात.

तुम्ही जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहात, तुमची जोखीम सोसण्याची क्षमता आणि दीर्घ मुदतीची उद्दिष्टे यानुसार विमा योजनेची निवड करा. दीर्घ कालावधीसाठी बचतीच्या दृष्टीने विचार करता जीवनविमा दोन पर्याय सादर करतो – पारंपरिक आणि युनिटसंलग्न योजना. जर तुमची जोखीम सोसण्याची क्षमता कमी असेल तर प्रामुख्याने कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक असणाऱ्या पारंपरिक योजनेची निवड श्रेयस्कर ठरेल. मात्र काहीशी जोखीम घेत, समभागसंलग्न पर्यायांमध्ये गुंतवणूक करून परतावा वाढवू इच्छित तर युनिटसंलग्न योजनेचा विचार करता येईल.

तुमची विद्यमान आर्थिक क्षमता आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे यानुसार, विम्याची मुदत आणि हप्त्याच्या रकमेची निवड करा. तुम्ही विमा खरेदीच्या अर्जावर स्वाक्षरी करताना ते समजावून घेणे खूप महत्वाचे आहे. अनेक जण विमा पॉलिसीची मुदत आणि भरावयाच्या हप्त्याची रक्कम ही एजंटला/वित्तीय सल्लागारालाच ठरविण्यास सांगतात. हप्त्याची रकमेचा भार भविष्यात किती काळ आणि किती मर्यादेपर्यंत वाहता येईल याचा कोणताही विचार केला जात नाही. यातून मग हप्ता भरण्याला मध्येच खंड पडतो आणि पॉलिसीही खंडित होते अथवा तिच्यायोगे मिळणारा परतावा घटतो. काही प्रसंगी लॉक-इन कालावधी पूर्ण होण्याआधीच पैसे काढून घेण्याची वेळ येते, जी ग्राहकाचा तोटा वाढविणारी ठरते.

गंभीर आजारांवर संरक्षणाच्या योजनेत रोगाच्या सर्व पायऱ्यांवर संरक्षण मिळण्याची खातरजमा करा. हे खूपच महत्त्वाचे आहे. कारण अनेक पॉलिसींमध्ये गंभीर आजारांवर (क्रिटिकल इलनेस) सर्वागीण संरक्षण देण्याचा दावा जरी केला गेला असला तरी आजाराच्या प्रारंभिक पायरीला संरक्षणाच्या दृष्टीने विचारात घेतले जात नाही. त्यामुळे खरेदीसमयीच अपवाद केलेल्या घटकांना लक्षात घ्यायला हवे, जेणेकरून सर्वसमावेश संरक्षणाचा लाभ मिळविला जाऊ शकेल.

हप्त्याची रक्कम सर्वात कमी असणारी योजनाच सर्वोत्तम असे गृहित धरले जाऊ नये. तुमचे आणि कुटुंबाचे आर्थिक संरक्षण म्हणून तुम्ही विमा खरेदी करीत आहात हे लक्षात असू द्यावे. त्यामुळे खूप चांगल्या भासणाऱ्या परंतु फसव्या प्रकारांना बळी पडण्यापासून काळजीपूर्वक टाळले पाहिजे. तुम्हाला पॉलिसी समजावून दिली याचा अर्थ त्याच्याकडून ती खरेदी केलीच पाहिजे असे कोणतेही बंधन तुमच्यावर नाही. कोणतीही योजना तुम्हाला असामान्य, अवाजवी वाटत असल्यास थेट विमा कंपनीशी संपर्क साधून खातरजमा करून घ्या.

प्रत्येक आयुर्विमा योजना तपास कालावधी (फ्रीलूक) पर्याय देते. हा कालावधी सामान्यत: १५ दिवसांचा असतो. पॉलिसी योग्य न वाटल्यास भरलेले संपूर्ण पैसे या कालावधीत परत फेडले जातात. हवी असलेली वैशिष्ट्ये योजनेत नसतील, तर योग्य न वाटलेले उत्पादन विमा कंपनीला परत करण्याचा हक्क यातून दिला गेला आहे. त्यामुळे या कालावधीचा वापर हा बहुतांश विमा कंपन्यांकडून नवीन खरेदीदाराला दिले जाणारे पॉलिसीचे ‘मुख्य वैशिष्ट्य दस्तऐवज’ (केएफडी) तपासून घेण्यासाठी करा.

पॉलिसीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन हवे. आयुर्विमा पॉलिसींचे डिमटेरियलाज्ड स्वरूपात जतन केले गेल्याने, पॉलिसी कालावधीत ती बाळगून ठेवण्याची चिंता निश्चितच कमी होते आणि सुरक्षितही राहते. आयुर्विमा ही एक अत्यंत गंभीर स्वरूपाचा आर्थिक निर्णय आणि गुंतवणूक आहे, त्यामुळे तो निर्णय सर्वोत्तम ठरायचा झाल्यास, वरील सर्व गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे.

(लेखिका एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)