देशामधील घाऊक बाजरपेठेतील महागाईचा विस्फोट झाल्याचं चित्र दिसत आहे. एप्रिल महिन्यामध्ये १०.४९ टक्क्यांवर असणारा घाऊक महागाईचा दर मे महिन्यात थेट १२.९४ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती सरकारी आकडेवारीमधून समोर आली आहे. मे महिन्यामध्ये महागाईच्या दरामध्ये २.४५ टक्क्यांनी वाढ झालीय. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये हा दर ७.३९ टक्के इतका होता. महागाई वाढल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

करोनामुळे आधीच सर्वसामन्यांचं जगणं कठीण झालं आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात करोनामुळे मागील दोन महिन्यांमध्ये महागाई ५.५५ टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलेल्या आकडेवारुन स्पष्ट होतं आहे. घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक किंमतीची आकडेवारी दर महिन्याला जाहीर करण्यात येते. त्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यातील महागाई दर सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणारा आहे.

मार्च महिन्यात महागाई दर ७.३९ टक्के इतका होता. तर एप्रिलमध्ये हा महागाई दर १०.४९ टक्क्यांवर पोहोचला तर आता मे महिन्याच्या आकडेवारीमध्ये महागाईच्या दराने जवळजवळ १३ टक्क्यांचा आकडा गाठल्याचं चित्र दिसत आहे.. महागाई दरात एका महिन्यात जवळपास २.४५ टक्क्यांनी वाढ झाली असून यापूर्वी ही वाढ ३.१ टक्क्यांची होती. कच्चं तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. डाळी, फळं आणि अंडी-मांस यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

“मे महिन्यामध्ये महागाईचा दर वाढण्यामागे मूळ कारण हे इंधन दरवाढ आणि लो बेस इफेक्ट आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या तुलनेत यंदा पेट्रोलियम पदार्थ आणि निर्मिती खर्च अधिक असल्याने महागाईचा दर वाढलाय,” असं केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने म्हटलं आहे. करोना लाटेनंतर जगभरामधून कच्च्या तेलाची आणि इंधानची मागणी वाढल्याने इंधनाच्या दरांचा भडका उडालाय. त्यामुळेच त्याचा परिणाम महागाईच्या दरावर झाल्याचं सांगण्यात येत आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीत महागाई दर ४.८३ टक्के इतका होता. त्यानंतर मार्च महिन्यात महागाई दर २.५६ टक्क्यांनी वाढला आणि ७.३९ टक्क्यांवर पोहोचला. नंतर एप्रिलमध्ये तो १०.४९ टक्क्यांवर पोहोचला.