आगामी २०१३ या वर्षांत रिझव्‍‌र्ह बँक तब्बल पाऊण टक्क्यांची व्याजदर कपात करेल; पैकी अर्धा टक्का व्याजदर कपातीची मात्रा जानेवारी ते मार्च दरम्यानच लागू होईल, असा विश्वास ‘सिटी समूहा’ने व्यक्त केला आहे. नजीकच्या कालावधीत महागाई दर कमी होण्याची आशा असल्याने मध्यवर्ती बँकेला व्याजदर कपातीला पुरेसा वाव असल्याचे या आघाडीच्या वित्तसमूहाने म्हटले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचा तिसरा तिमाही पतधोरण आढावा येत्या महिन्यात २९ तारखेला जाहीर होणार आहे. खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. डी. सुब्बराव यांनीही आगामी पतधोरणात  व्याजदर कपातीचे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. मध्यवर्ती बँकेने गेल्या आठवडय़ात जारी केलेल्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले होते.
आगामी आशादायक व्याजदर कपातीबाबत ‘सिटी समूहा’च्या अर्थतज्ज्ञ रोहिणी मलकानी यांनी म्हटले आहे की, घाऊक किंमत निर्देशांक कमी होण्यासह अन्नधान्य तसेच निर्मिती वस्तूंच्या किंमती कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येणारे काही महिने हे विकासाचे असतील. तेव्हा रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कमी करता येतील. संपूर्ण २०१३ मध्ये पाऊण टक्का, तर पैकी अर्धा टक्का व्याजदर कपात ही जानेवारी ते मार्च २०१३ या चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत अपेक्षित आहे. विकासाला चालना देताना अर्थव्यवस्थेतील रोकड सुलभतेवरही रिझव्‍‌र्ह बँकेचे लक्ष असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये दुहेरी आकडय़ानजीक, ९.९ टक्के राहिला आहे. तर याच कालावधीत घाऊक किंमत निर्देशांक ७.२४ टक्के नोंदला गेला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ५ ते ५.५ टक्के सहनशील अशा दरांपेक्षा हा दर अधिक असला तरी गेल्या काही कालावधीत तो खाली येताना दिसत आहे. परिणामी व्याजदर कपातीची आशा रिझव्‍‌र्ह बँकेकडूनही व्यक्त केली गेली आहे.     
फेडरल बँकेच्या मुदत ठेवींवर वाढीव व्याज
दक्षिणेतील खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकेने निवडक कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर वार्षिक अध्र्या टक्क्यांनी वाढविले आहेत. एक ते तीन वर्षे मुदतीच्या ठेवींवर आता ८.७५ टक्क्यांऐवजी ९ टक्के तर ९१ ते ११९ दिवसांच्या ठेवींसाठी ७ टक्क्यांऐवजी ७.५० टक्के व्याज मिळणार आहे. अनिवासी भारतीयांना त्यांच्या एक ते तीन वर्षे मुदतीच्या ठेवींवरही ९ टक्के व त्यावरील मुदतीसाठी ८.७५ टक्के व्याज मिळेल. नवे दर २४ डिसेंबरपासून लागू झाले असून बँकेने कालावधींचा टप्पाही सुधारित केला आहे. ७ ते ४५ दिवसांसाठी ५ टक्के, ४६ ते ९० दिवसांसाठी ७ टक्के आणि १८१ दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी ८.५० टक्के व्याजदर अशी नवी कालावधी व व्याजदर रचना करण्यात आली आहे.