राज्यातील बंदर, माल वाहतूक क्षेत्राच्या विकासाला गती
पहिल्या भारतीय सागरी परिषदेचे यजमानपद भूषविणाऱ्या महाराष्ट्राने ७५० किलो मीटरच्या सागरी किनाऱ्याशी निगडित ११,००० कोटी रुपयांचे करार शुक्रवारी केले. राज्य शासनाच्या मेरिटाईम मंडळाने बंदर व माल वाहतूक क्षेत्रातील विविध करार परिषदेच्या मंचावर पार पाडले. ११,०३९ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक, ७,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक ही मानखुर्द (मुंबई) येथील योगायतन समूहामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या जेटीकरिता आहे. तर दिघी बंदरानजीकच्या एलएनजी टर्मिनलकरिता १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. अन्य करारांमध्ये जेएनपीटीने विविध २४ भागीदारांबरोबर केलेल्या करारांचा समावेश आहे. जेएनपीटीने महाराष्ट्र पर्यटन महामंडळाबरोबरही मुंबईतील बस सेवेबाबतचा करार केला आहे. यानिमिताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाने गेल्या १४ महिन्यात ८४ प्रकल्पांना मान्यता दिली असून त्याद्वारे येत्या पाच वर्षांत ५०,००० रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगितले.