सुमारे १६,००० कोटी रुपयांची स्रोत नसलेली व अघोषित उत्पन्नाची प्रकरणे गेल्या २० महिन्यांत समोर आल्याची माहिती सरकारने बुधवारी दिली. या प्रकरणी १,२०० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
२०१४-१५ हे संपूर्ण आर्थिक वर्ष तसेच विद्यमान वित्त वर्षांतील एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ दरम्यानच्या कालावधीतील ही रक्कम असल्याची माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी बुधवारी दिली.
देशातील काळ्या पैशाला अटकाव म्हणून उचलण्यात आलेल्या संपत्तीच्या स्वेच्छेने घोषणा करण्याकरिता दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीची योजनाही यामध्ये समाविष्ट आहे. या योजनेंतर्गत विविध ६३५ खुलाशांद्वारे ४,१६० कोटी रुपयांचा उलगडा झाला आहे. या मंडळीवर सरकारकडून महिनाअखेपर्यंत २,५०० कोटी रुपयांचा कर आणि दंड वसुल केला जाणार आहे. काळा पैसा कायद्यांतर्गत संपत्ती जाहीर करणाऱ्यांना ३१ डिसेंबपर्यंत प्राप्तिकर भरणे अनिवार्य आहे.
प्राप्तिकर विभाग व सक्तवसुली संचालनालय यांच्या संयुक्त कारवाईत १६,००० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा स्रोत अघोषित व ज्ञात नसल्याचे आढळून आले असून संबंधित प्रकरणात १,२०० कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१५ पर्यंत या संदर्भातील ७७४ प्रकरणे कारवाईच्या प्रक्रियेत असल्याचेही अधिया यांनी सांगितले.
काळ्या पैशाबाबत विद्यमान सरकार खूपच गंभीर आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी अनेक पावलेही उचलली आहेत. काळा पैसा तसेच संबंधित व्यक्तीला समोर आणण्याच्या प्रयत्नांत कोणतीही कसर न ठेवण्याचा या सरकारचा निर्धार आहे.
’ हसमुख अधिया -केंद्रीय महसूल सचिव