महागाईची चिंता वाहताना संभाव्य व्याजदर कपातीच्या अशक्यतेच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या संकेताने गेल्या तीन सत्रातील तेजी ‘सेन्सेक्स’नेही रोखून धरली. व्याजदराशी निगडित समभागांची जोरदार विक्री झाल्याने सलग तिसऱ्या सत्रातही २० हजारांच्या नजीक असणारा मुंबई निर्देशांक १६९.१९ अंश घसरणीसह बुधवारअखेर १९,८१७.६३ वर येऊन ठेपला. ५४.७५ अंश घसरणीमुळे ‘निफ्टी’ही पुन्हा ६ हजाराच्या काठावर येऊन ठेपला आहे.
गेल्या तीन सत्रात ‘सेन्सेक्स’ ३२४ अंशांनी उंचावला आहे. कालच्या व्यवहारात तर दोन वर्षांच्या उच्चांकाला गाठताना तो २० हजाराच्या पातळीलाही स्पर्श करून गेला. ‘गार’ची लांबणीवर गेलेली अंमलबजावणी, टीसीएस-इन्फोसिसचे फायद्यातील तिमाही निष्कर्ष भांडवली बाजाराला उंचावण्यास कारणीभूत ठरले.
गुरुवारी मात्र रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी महागाई अद्यापही वरच्या स्तरावर असल्याने यंदा व्याजदर कपात करणे कठीण असल्याचे मत व्यक्त केल्याचा परिणाम भांडवली बाजारावर दिसून आला. व्याजदराशी निगडित बँक, बांधकाम क्षेत्रातील समभागांमध्ये नकारात्मकता नोंदली गेली. प्रमुख १३ पैकी १२ क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत समाविष्ट झाले. वाहन निर्देशांक सर्वाधिक २.४ तर बँक आणि बांधकाम निर्देशांक अनुक्रमे १.६ आणि १.३ टक्क्यांसह खालावले.
आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँकचे समभाग तर २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, मारुती सुझुकी यांच्या समभाग मूल्यातही प्रत्येकी ३ टक्क्यांपर्यंतची घट नोंदली गेली. बांधकाम क्षेत्रातील डीएलएफ, शोभा डेव्हलपर्स, युनिटेक यांचे समभागही प्रत्येकी ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते.
बुधवारी युरोपीय बाजारांची सुरुवातही घसरण नोंदवत झाली. तर आशियाई बाजारही नकारात्मक लाल संकेतात अडकलेले दिसून आले. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी २४ समभागांचे मूल्य खालावले. ४.३ टक्के घसरणीसह पोलाद क्षेत्रातील हिंदाल्को घसरणीत आघाडीवर राहिला. रिलायन्स, डॉ. रेड्डीज्, टीसीएस यांनी मात्र एक ते दोन टक्क्यांपर्यंत तेजी अनुभवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा