अलविदा २०१५..
डॉलरच्या तुलनेत ६७ रुपयांपर्यंतचा तळ दाखविणारे २०१५ हे वर्ष भारतीय चलनासाठी सुमार कामगिरीचे वर्ष राहिले. सध्या ६६ च्या आसपास असलेला रुपयाचा प्रवास येत्या आठवडय़ातील व्यवहारात फार खाली अथवा वर न झाल्यास चलनासाठी हे सलग पाचवे वार्षिक घसरण नोंदविणारे वर्ष ठरेल. लक्षणीय म्हणजे आगामी वर्षांतही त्याचा घरोबा हा प्रति डॉलर ६७ ते ७० दरम्यानच राहण्याचे कयास आहेत.
२०१५ ची सुरुवात करताना रुपया डॉलरच्या समोर ६३.३५ वर होता. वर्षांच्या मध्यापूर्वीच चलन ६५ च्याही खाली घसरले. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. असे करताना रुपया गेल्या काही दिवसांत थेट ६७ पर्यंत घसरला. त्याचा हा गेल्या दोन वर्षांतील तळ होता.
भारतीय चलनाचा सध्याचा प्रवास गेल्या वर्षअखेरपेक्षा (६३.०३-डिसेंबर २०१४) पाच टक्क्यांनी खालचा आहे. २०१५ च्या अर्ध वर्षांनंतरच सावरत असलेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेपोटी डॉलर गेले काही महिने भक्कम होत गेले. परिणामी, घसरत्या रुपयाच्या व्यवहारात रिझव्‍‌र्ह बँकेला दोन वेळा हस्तक्षेप करावा लागून चलनातील अस्थिरता अधिक काळ ठेवण्यापासून रोखता आले.
२०१५ ची अखेर होत असताना निवडक तीन व्यवहारांत रुपयाचा प्रवास ६६ ते ६७ दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक जोखमीचे वातावरण तसेच देशांतर्गत सुधारणांचा रेटा यावर रुपयाचा प्रतिसाद २०१५ मध्ये नोंदला गेल्याचे ‘आयएफए ग्लोबल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गोएंका यांनी सांगितले.
भारतीय भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याच्या प्रयत्नानेही रुपया कमकुवत झाल्याचे मानले जाते. त्यातच शेजारील चीनने त्याच्या स्थानिक चलनात (युआन-४%) स्वत:हून अवमूल्यन करून घेतल्याचा परिणामही रुपयाच्या डळमळीत स्थानावर झाला. त्यामुळेच जागतिक स्तरावरही रुपया अन्य देशांच्या चलनांसमोर खराब प्रतिसाद देणारा ठरला.
रुपयाला बळकटी देणाऱ्या थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढ, वाढती निर्यात, चलनाकरिता अधिक वायदे व्यवहार खुले करणे आदी घडामोडी २०१५ मध्ये घडल्या आहेत. तर २०१५ मध्ये अप्रत्यक्ष कर संकलनातील वाढ, सार्वजनिक कंपन्यांमधील भागविक्री या सरकारच्या उपाययोजनाही रुपयाच्या घसरणीला रोखू शकल्या नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा