बंद झालेली वैयक्तिक खाती अथवा फोलिओचे प्रमाण जमेस धरल्यास, एप्रिल २०१३ ते ऑक्टोबर २०१३ या सात महिन्यांदरम्यान सुमारे २१ लाख गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांकडे पाठ फिरविली असल्याचे स्पष्ट होत आहे. या आधीच्या २०१२-१३ आर्थिक वर्षांत म्युच्युअल फंडांतील ३६ लाख गुंतवणूक खाती बंद पडली असून, सलग घसरणीचे ते चौथे वर्ष होते. त्या आधीच्या तीन वर्षांत म्युच्युअल फंड उद्योगाने १५ लाख गुंतवणूक खाती गमावली आहेत.
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ४४ म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांतील गुंतवणूकदारांचा ऑक्टोबर २०१३ अखेरच्या मिळविलेल्या तपशिलातून पुढे आलेल्या माहितीनुरूप, विद्यमान २०१२-१३ आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला असलेले ४.२८ कोटी गुंतवणूकदार खाती (फोलिओ) ऑक्टोबरअखेर ४.०७ कोटींवर म्हणजे २०.७७ लाखांनी रोडावली आहेत. नजीकच्या अनेक म्युच्युअल फंडांनी आपल्या विविध योजनांचे केलेले एकत्रीकरण या प्रमुख कारणासह, किंचितसा नफा दिसला तरी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा हा परिणाम असल्याचे ‘सेबी’ने म्हटले आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमधून माघारी जाणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या काळात समभागांशी संलग्न असलेल्या म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांच्या फोलिओंमध्ये सुमारे २६ लाखांची घट दिसून आली आणि मार्च २०१३ अखेरच्या ३.३२ कोटींवरून इक्विटी योजनांच्या फोलिओंची संख्या ऑक्टोबर २०१३ अखेर ३.०६ कोटींवर स्थिरावली आहे. विशेषत: या सात महिन्यांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक-सेन्सेक्समध्ये १,७८५ अंशांची म्हणजे सुमारे ९.२ टक्के वाढ होऊन, दिवाळीत त्याने सार्वकालिक उच्चांकालाही गवसणी घातली असताना, इक्विटी योजनांमधून गुंतवणूक काढून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
‘सेबी’ने प्रसृत केलेल्या तपशिलानुसार, अन्य सर्व फंड प्रकारांमधून गुंतवणूकदार काढता पाय घेत असले तरी एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात डेट फंडांच्या फोलिओंचे प्रमाण मात्र ४.२२ लाखांनी वाढून ६६ लाखांवर गेले आहे. बरोबरीनेच बॅलेन्स्ड योजनांनी १.०६ लाख नव्या फोलिओंची भर घालत ऑक्टोबरअखेर २७ लाखांचा आकडा गाठला आहे. ईटीएफ योजनांनी सरलेल्या सात महिन्यांत ४८,७७५ गुंतवणूक खाती गमावली असून, ऑक्टोबरअखेर त्यांचे एकूण फोलिओंचे प्रमाण सात लाखांच्या घरात आहे.    
सरलेल्या सात महिन्यात ४४ म्युच्युअल फंडांकडून एकूण १,३५५ नवीन योजना बाजारात आल्या, ज्यात ३४४ इक्विटी योजना, तर ८९१ योजना या डेट बाजारपेठेशी संलग्न आहेत.

Story img Loader