टायर्स आणि रबर उत्पादनांमधील ब्रिजस्टोन कॉपरेरेशन प्रा. लि. या कंपनीच्या चाकणमधील दुसऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या प्रकल्पात २६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे १८०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.  ब्रिजस्टोन इंडिया आणि महाराष्ट्र सरकार यांच्या दरम्यान एप्रिल २०१० मध्ये जो सामंजस्य करार झाला होता त्यानुसार या प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी झाला. १८७ एकर जमिनीवर विस्तारलेल्या या उत्पादन सुविधेचे सर्व टप्पे पूर्ण होतील तेव्हा त्याची उत्पादन क्षमता १० हजार पॅसेंजर कार रॅडिकल टायर्स आणि ३०० ट्रक-बस रॅडिकल टायर्स प्रतिदिन एवढी असेल. यातून भारतीय बाजारपेठेच्या वाढत्या गरजांची पूर्तता करणे कंपनीला शक्य होईल, अशी माहिती कंपनीचे मुख्याधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य काझुहीसा निशिगाई यांनी दिली. कंपनीने पहिला प्रकल्प मध्य प्रदेशातील खेडा येथे सुरू केला असून त्यातील उत्पादनाला १९९८ मध्ये सुरुवात झाली. देशभरात कंपनीचे अडीच हजार विक्रेत्यांचे जाळे आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत कियोशी असाको, आमदार दिलीप मोहिते, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी याप्रसंगी उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या माध्यमातून जपानमधील केवळ गुंतवणूक येत नाही. तर, त्यांची कार्यसंस्कृतीदेखील आली आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर आणखी बहुराष्ट्रीय कंपन्यांची राज्यात गुंतवणूक होईल. उद्योगांसाठी पाणी आणि विजेचा अखंड पुरवठा करण्याचा अंतर्भाव सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणामध्ये आहे. मात्र, उद्योगांनीही पावसाच्या पाण्याचा थेंब जमिनीमध्ये मुरविण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे.