सध्या आर्थिक पेचप्रसंगाला तोंड देत असलेल्या अमेरिकेच्याच तीन अर्थशास्त्रज्ञांना यंदाचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. दुसरी बाब म्हणजे प्रत्येकवेळी या पारितोषिकात अमेरिकेच्याच अर्थशास्त्रज्ञांचे नेहमी वर्चस्व राहिले आहे. शेअर बाजार म्हणजे अस्थिरतेचा खेळ असतो. एका कंपनीचा सकाळी वधारलेला शेअर शेवटी घसरत जाणारच नाही याची हमी देता येत नाही, जाणूनबुजून खेळलेल्या या जुगारात अनेक लोक लाखोंचे मालक होतात तर काही कंगालही होतात. पण या शेअर म्हणजे समभाग व बाँडस म्हणजे रोख्यांच्या या अनिश्चिततेच्या खेळाचे काही नियम आहेत. कुठला समभाग येत्या एक-दोन दिवसात, आठवडाभरात वर जाईल किंवा खाली जाईल याचे आडाखे बांधता येत नाहीत पण यातही काहीतरी सुवर्णमध्य साधून कालांतराने त्या समभागांची किंवा रोख्यांची नेमकी किंमत किती असेल याचे नियम शोधण्याचा प्रयत्न यंदा नोबेल मिळालेल्या युजीन फॅमा, लार्स पीटर हॅनसन व रॉबर्ट शीलर यांनी केला आहे. त्यांच्या मते असे समभाग किंवा रोखे यांच्या किमती शेअर बाजारात वर-खाली होत राहतात पण आपण त्यांचा दीर्घकालीन विचार केला तर तीन ते पाच वर्षांत त्यांच्या किमती किती असतील म्हणजे तुमच्याकडे असलेल्या कंपनीच्या समभागाचे किंवा रोख्याचे मूल्य काय असेल हे तुम्हाला सांगता येते. या तिघा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञांनी समभागांच्या किमती, रोख्यांच्या किमती व इतर मालमत्ता यांची माहिती गोळा केली व त्याच्या आधारे एक सिद्धांत तयार केला. मालमत्तांची किंमत नेमकी कशी ठरते हे अचूकपणे सांगणे अवघड असले तरी त्यात काही असे निकष जरूर सांगता येतात ज्यावर त्यांची किंमत ठरत असते. समभाग, रोखे व मालमत्तांच्या किमती वर जातील की खाली येतील याचे हे आडाखे स्थूल अर्थशास्त्रात फार महत्त्वाचे ठरत असतात. जर आपल्याला बाजार वर जाणे व तो कोसळणे याची प्रक्रिया समजली नाही तर तुम्ही आर्थिक संकटात पडू शकता. आताच्या जागतिक आर्थिक पेचप्रसंगात हे आडाखे चुकल्यानेच ही वेळ आली आहे. मालमत्तांची मूर्त स्वरूपात किंमत निर्धारण करणे अर्थशास्त्रात महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या मते आर्थिक बाजारपेठेची भाकिते ही बाजारपेठ व्यवस्था कशी काम करते यावर अवलंबून असतात. असे असले तरी व्यवस्थित चाललेल्या बाजारपेठेतही काही भाकिते करता येतात किंवा तसे काही कल दिसून येतात. जोखीम हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या जोखमीच्या मालमत्तेवर मिळणारा फायदा जास्त असू शकतो कारण त्याची किंमत वाढणार हा आडाखा आपल्याला सुरक्षित मालमत्तेच्या किमतीपेक्षा लवकर बांधता येतो. असे असले तरी जोखमीच्या मालमत्तेत नेमके किती नुकसान होऊ शकते याचा अंदाजही महत्त्वाचा ठरतो. डॉ. फॅमा यांच्या मते एखाद्या कंपनीच्या समभागांची पूर्वीची मूल्ये ही पुढचा अंदाज बांधण्यासाठी फारशी उपयोगी पडत नाही. एखाद्या माहितीचा मात्र शेअर बाजारावर परिणाम होतो. शेअर स्प्लीटच्या वेळी फॅमा, फिशर, जेनसन व रोल यांनी याबाबत संशोधन केले त्यांच्या मते एखादी बातमी पसरताच शेअर बाजारावर त्याचा परिणाम होतो. एखादी बातमी किंवा माहिती आल्यानंतर त्याचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल हे लगेच सांगता येत नाही. परंतु कुठलीही मालमत्ता, समभाग किंवा रोखे यांच्या किमती यांचा अंदाज अगदी नजीकच्या काळासाठी बांधता येत नसला तरी प्रदीर्घ काळासाठी अंदाज करता येतो असे शिलर यांनी १९८१ मध्ये दाखवून दिले. त्यानंतरच्या काळात क्लासिकल कॅपिटल अॅसेट प्रायसिंग मॉडेलच्या मदतीने विविध समभागांवर नेमका किती फायदा मिळेल याचा अंदाज करता येतो. यात त्यांनी असेही दाखवून दिले, की गुंतवणूकदारांचे एक वर्तनात्मक प्रारूपही त्यांच्याकिमतीचा अंदाज देऊ शकते, त्याला बिहॅवरियल फायनान्स असे म्हणतात. एखाद्या कंपनीच्या समभागाच्या किमतीबाबतचा खूप आशावाद किंवा इतर मानसशास्त्रीय घटकही त्यात महत्त्वाचे ठरतात. हितसंघर्ष, संस्थात्मक मर्यादा, जोखमीबाबतचे दृष्टिकोन असे अनेक मुद्दे यात महत्त्वाचे ठरतात.
युजीन फॅमा
जन्म : १४ फेब्रुवारी १९३९,
बोस्टन, एमए, अमेरिका
शिकागो विद्यापीठात कार्यरत.
संशोधन विषय : मालमत्ता किंमतींचे विश्लेषण
लार्स पीटर हॅनसन
जन्म : २६ ऑक्टोबर १९५२, श्ॉम्पेन, अमेरिका
शिकागो विद्यापीठात कार्यरत
संशोधन विषय : मालमत्ता किंमतींचे विश्लेषण
रॉबर्ट. जे.शीलर
जन्म : २९ मार्च १९४६,
डेट्राइट, अमेरिका
येल विद्यापीठात संशोधन
संशोधन विषय : मालमत्ता किंमतींचे विश्लेषण