जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या जळगावस्थित जैन हिल्स येथे येत्या २८ ते ३० मे दरम्यान ‘शेतीतील भविष्यातले आव्हाने व पर्याय’ या विषयावर राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषद अमितसिंग मेमोरियल फाऊंडेशन, कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग, कृषिमंत्रालयाचे सचिव डॉ. एस. के. पटनाईक त्याचप्रमाणे, राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे, तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची परिषदेला उपस्थित असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आयसीएआरचे माजी महासंचालक डॉ. आर. एस. परोडा, कुलगुरू डॉ. पी. एल. गौतम (कुलगुरू), डॉ. एस. एल. मेहता (माजी कुलगुरू महाराणा प्रताप कृषी विद्यापीठ उदयपूर), डॉ. ए. आर. पाठक (कुलगुरू, जुनागड कृषी विद्यापीठ), डॉ. आर. सी. श्रीवास्तव (कुलगुरू, राजेंद्रगर कृषी विद्यापीठ पुसा, बिहार), डॉ. बी.एम.सी. रेड्डी (कुलगुरू, वाय. एस. आर. उद्यान विद्यापीठ, विजयवाडा), डॉ. एस. के. मल्होत्रा (कृषी आयुक्त कृषी मंत्रालय भारत सरकार) त्याचप्रमाणे देशातील ६० शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करतील.
२९ मे रोजी राष्ट्रीय केळी निर्यात कार्यशाळेचे आयोजनदेखील केले आहे. या कार्यशाळेमध्ये केळी निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण उत्पादन, केळी काढणीपूर्व व काढणी पश्चात व्यवस्थापन आणि निर्यात या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत जिल्ह्य़ातील निवडक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे केळी निर्यातीसाठी जळगावला असलेली संधी, जागतिक बाजारपेठ जगातील केळीची मागणी, केळीचा जगातील निर्माण झालेला तुटवडा त्याचा फायद्यासाठी आपण काय केले पाहिजे या दृष्टीने केळी निर्यातीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परिषदेचा समारोप अमितसिंग मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने देशातील निरनिराळ्या राज्यातील १९ शेतकऱ्यांना ‘उद्यानरत्न’ पुरस्कार देऊन होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा