तोटय़ातील सरकारी कंपन्यांच्या यादीतील पाच कंपन्या लवकरात लवकर बंद करण्यात येणार असल्याचे सरकारने बुधवारी सांगितले. मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी ही माहिती दिली.
तोटय़ातील सरकारी उपक्रमांमध्ये ६५ कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये एअर इंडिया, एमटीएनएल, हिंदुस्थान शिपयार्ड, एचएमटी आदी आहेत. मात्र पैकी कोणत्या पाच कंपन्या त्वरित बंद होणार हे मंत्र्यांनी स्पष्ट केले नाही. मनगटी घडय़ाळ बनविणाऱ्या केवळ एचएमटीचा उल्लेख करताना कंपनीतील कर्मचाऱ्यांना आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना बहाल केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांतील सरासरी निव्वळ मालमत्तेच्या ५० टक्क्यांहून अधिक तोटा असलेल्या सरकारी कंपन्या या आजारी म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ३१ मार्च २०१४ अखेर अशा ६५ कंपन्या  आहेत. दरम्यान, बंद होण्याच्या चर्चेने संबंधित कंपन्यांचे समभाग मूल्य बुधवारी भांडवली बाजारात कमालीने खाली आले. मुबई शेअर बाजारात एमटीएनएलचा समभाग १९ टक्क्यांनी तर एचएमटीचा ११ टक्क्यांनी घसरला.

Story img Loader