आर्थिक शिस्त, व्यवस्थापन कौशल्य आणि उत्तम ग्राहकाभिमुख सेवा विश्वासार्हता या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यातील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने ५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठून, २४ नोव्हेंबर २०१२ अखेर एकूण ५१ कोटी ७२ लाख रुपयांच्या ठेवी संकलित केल्या आहेत. संस्थेने जिल्ह्यातील पाच शाखांमधील २९ हजार ठेव खात्यांच्या माध्यमातून हे लक्ष्य गाठले आहे. चालू आर्थिक वर्षांअखेर दीड कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याचे संस्थेचे लक्ष्य आहे.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे कर्ज/ठेव गुणोत्तरही सरस असून, जवळपास ५२ कोटींच्या ठेवींच्या बदल्यात संस्थेने ४६ कोटींचे कर्जे वितरीत केली आहेत. शिवाय ९९.४२ टक्के वसुलीचे विक्रमी प्रमाण राखत संस्थेने सातत्याने अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के ठेवले आहे. मोठय़ा प्रमाणावर ठेवी गोळा करताना पाळावे लागणारे आर्थिक र्निबध काटेकोरपणे पाळले गेले आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. रोख तरलतेपोटी संस्थेने १२ कोटी ५० लाख रुपयांची केलेली गुंतवणूकही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेची विश्वासार्हता अबाधित राहील हे प्राधान्याने पाहून आगामी काळात कायद्याने उपलब्ध केलेल्या चौकटीत नवीन उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
संस्थेने स्थापनेपासून सलग २१ वर्षे ‘पतसंस्था- अ’ वर्गात स्थान कायम राखले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत रु. २.९७ कोटी असलेल स्वनिधी चालू आर्थिक वर्षांत रु. ४ कोटी १५ लाख ५९ हजार झाला आहे. स्वनिधीत झालेली ३९.७३ टक्क्यांची लक्षणीय वाढ संस्थेच्या आर्थिक ताकदीचेच द्योतक असल्याचे पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा