देशातील सुमारे ५ कोटी कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी अर्थात ‘पीएफ’वर २०१२-१३ या आर्थिक वर्षांसाठी ८.५% व्याज देण्याच्या निर्णयावर येत्या १५ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेबाबत निर्णयक्षम केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक येत्या १५ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाची ही २०१ वी बैठक असेल. केंद्रीय कामगारमंत्री अध्यक्ष असलेल्या या मंडळाद्वारे व्याजदर निश्चितीचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्रीय अर्थखात्याकडे पाठविण्यात येतो. निधीवर वार्षिक ८.५% व्याज दिल्यास ना नफा-ना तोटा संतुलन साधले जाईल. त्यामुळे ५ कोटी लाभार्थीना हा दर देणेच परवडेल, अशा निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कामगार संघटनांचा मात्र वार्षिक ८.८% व्याज देण्याचा आग्रह आहे. याशिवाय २०१०-११ या वर्षांसाठी ९.५% व्याजदर देण्याचीही मागणी आहे. संघटनेने या वर्षांत १.२५% ने व्याजदर कमी करीत ८.२५% व्याज देऊ केले होते. तत्पूर्वी २००४-०५ पासून सलग पाच वर्षे वार्षिक ८.५% व्याज दिले जात होते.
विश्वस्त मंडळाशी होणाऱ्या भेटीत चालू आर्थिक वर्षांसाठी ९.५% व्याजदर देण्याची मागणी आम्ही करणार आहोत. हे दर बँकांच्या सध्याच्या ठेवींवरील ९ ते १० टक्क्यांच्या प्रमाणातच असायला हवेत, असे हिंद मजदूर सभेचे सचिव व कर्मचारी भविष्यनिर्वाह संघटनेचे एक विश्वस्त ए. डी. नागपाल यांनी मत व्यक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा