निवृत्तीपश्चात निधीची तरतूद असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ‘ईपीएफ’वर सध्याचाच व्याजदर चालू आर्थिक वर्षांसाठीदेखील कायम ठेवण्याचा निर्णय भविष्यनिधी संघटनेने घेतला आहे. यानुसार देशातील ५ कोटी पीएफधारक कर्मचाऱ्यांना २०१४-१५ साठीही वार्षिक ८.७५ हाच व्याजदर त्यांच्या जमा रकमेवर मिळणार आहे.
भविष्य निधी संघटनेचे सर्वोच्च निर्णय मंडळ असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मंगळवारी झाली. चालू आर्थिक वर्षांसाठी द्यावयाच्या दराचे प्रमाण निश्चित करण्यासाठी ही बैठक होती.
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कमी करण्याची अटकळही या बैठकीपूर्वी होती. तथापि बैठकीत केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी दरकपातीला विरोध दर्शविला. परिणामी, ८.७५ टक्के हा दर कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर गेल्या आर्थिक वर्षांत पाव टक्क्याने वाढविण्यात आला होता. २०१३-१४ मध्ये तो आधीच्या ८.५० टक्क्यांवरून ८.७५ टक्के करण्यात आला होता, तर तत्पूर्वीच्या वर्षांत तो एक टक्का अधिक ९.५ टक्के होता. २००० ते २००२ या दोन वर्षांत तो १४ वर्षांतील सर्वाधिक १२ टक्क्य़ांचा होता.
अन्य निर्णय
* पात्रतेसाठी वेतन मर्यादेत वाढ
‘ईपीएफ’साठी पात्रतेसाठी असलेली सध्याच्या ६,५०० रुपयांची मासिक मूळ वेतनाची मर्यादा १५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यातून आणखी ५० लाख कर्मचारी हे भविष्यनिधी संघटनेत सामील होऊ शकतील.
* विम्याचे कवच विस्तारले
कर्मचारी ठेवसंलग्न विमा (ईडीएलआय) योजनेत कमाल विम्याचे कवच हे सध्याच्या १.५६ लाखांवरून ३.६ लाखांवर गेले आहे.
* किमान १००० रु. पेन्शनची हमी
कर्मचारी निवृत्तीवेतन (पेन्शन) योजनेतून आता प्रत्येकाला किमान १००० रुपयांच्या पेन्शनची हमी देणाराही निर्णय झाला आहे. या योजनेद्वारे दरमहा १००० रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळत असलेल्या २८ लाख सेवानिवृत्त याचे लाभार्थी ठरतील.