ऑप्टिक फायबरच्या जाळ्यासाठी केवळ १,२०० कोटी रुपयांचा करार करूनच थोरले बंधू मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानी यांना सहाय्य केले नाही तर धाकटय़ा बंधूच्या फंड व्यवसायात सुमोर ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘अर्थ-सहकार्य’ कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील वित्तसंस्था असलेल्या रिलायन्स म्युच्युअल फंड कंपनीत विविध फंड योजनांमध्ये मुकेश अंबानी यांनी ८०० कोटी रुपयांची गंगाजळी ओतली आहे. १३ विविध फिक्स्ड मॅच्युरिटी योजना आणि इतर डेट योजनांमध्ये मुकेश यांचा हा पैसा आहे.
उभय बंधूंनी कालच सुमारे १,२०० कोटी रुपयांच्या व्यवसाय कराराची घोषणा केली होती. याअंतर्गत अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन्स रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या ४जी ब्रॉडबॅण्ड सेवेसाठी १.२० लाख किलोमीटरचे ऑप्टिक फायबरचे जाळे पुरविणार आहे.
२००५ मध्ये रिलायन्स समूहाचे विभाजन झाल्यानंतर अंबानी बंधूंमधील ‘ना- स्पर्धा करार’ २०१० मध्ये संपुष्टात आल्यानंतर एकमेकांच्या व्यवसायात कार्य करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यानुसार मुकेश अंबानी हे अनिल अंबानी यांचे कार्य असलेल्या दूरसंचार क्षेत्रात पुन्हा आले.