कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ५ कोटींहून अधिक अंशदानकर्त्यां कामगारांच्या ठेवींवर २०१५-१६ या वर्षांकरिता ९ टक्के इतका व्याजदर मिळावा अशी मागणी संघपरिवारातील भारतीय मजदूर संघासह केंद्रीय कामगार संघटना लावून धरणार आहेत.
येत्या १६ फेब्रुवारीला होणाऱ्या ईपीएफओच्या विश्वस्तांच्या बैठकीत, चालू आर्थिक वर्षांत सध्याचा ८.७५ टक्क्यांचा व्याजदर कायम ठेवण्यास, तसेच सर्व अंशदानकर्त्यांना सरसकट २०० रुपये बोनस देण्यास विरोध करण्याचे या संघटनांनी ठरवले आहे.
ईपीएफओच्या अंशदानकर्त्यांना चालू आर्थिक वर्षांत ९ टक्के व्याजदर मिळावा अशी आम्ही मागणी करू. या योजनेत बोनस देण्याची कुठलीही तरतूद नसून आम्ही तिलाही विरोध करू, असे भामसंचे सरचिटणीस वृजेश उपाध्याय यांनी सांगितले.
सध्या व्याजदर कमी राखण्यासाठी अर्थमंत्रालयावर दबाव आहे. ईपीएफओवर कमी व्याजदर देण्याला पर्याय शोधण्याचा ते प्रयत्न करत असावेत, असेही उपाध्याय म्हणाले. प्रत्येक अंशदानकर्त्यांला ८.७५ टक्के व्याजदर देण्यासोबतच बोनसपोटी २०० रुपये देण्याबाबत ईपीएफओच्या ‘फायनान्स ऑडिट अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट कमिटी’ या सल्लागार मंडळात चर्चेला आला होता.
ऑगस्टपासून पीएफची ऑनलाइन वठणावळ
निवृत्तीपश्चात पीएफच्या रक्कम कागदी प्रक्रिया न करता सत्वर कर्मचाऱ्याला मिळू शकेल. येत्या ऑगस्टपासून ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे पीएफची रक्कम काढण्याचा अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या काही तासांत ती संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा होईल.

Story img Loader