आलिशान मोटारींची साधी व्याख्या म्हणजे २२ ते २५ लाख रुपयांवरील कार. जर्मन हा देश तर त्यात आघाडीचा. भारताबाबत सांगायचे झाल्यास या वाहन प्रकारातील अव्वल तीन स्थानांसाठी सध्या तीव्र स्पर्धा सुरू आहे ती तिन्ही जर्मन कंपन्यांमध्ये! ऑडी आणि बीएमडब्ल्यू यांच्यात तर महिन्यात जाहीर होणाऱ्या वाहन विक्रीच्या आकडेवारीवरून रस्सीखेच सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत प्रेक्षक बनलेल्या तिसऱ्या क्रमांकावरील मर्सिडिझ बेन्झने आता मात्र क्रमांक एकची तयारी सुरू केली आहे. मर्सिडिझ बेन्झने गुरुवारी मुंबईत ‘ए क्लास ही २२ लाख रुपयांच्या घरातील कॉम्पॅक लक्झरी श्रेणीतील कार प्रस्तुत करून हे अभिजन वाहन बाळगण्याच्या श्रेणीत आता अनेक मध्यमवर्गीयांनाही सामील केले आहे. मुंबईत हे वाहन २१.९३ ते २२.७३ लाख रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहे. ए १८० स्पोर्ट आणि ए १८० स्टाईल अशा याच्या दोन मॉडेल्स अनुक्रमे पेट्रोल तसेच डिझेल या इंधन प्रकारावर आहेत. जागतिक स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या कारसाठी महिन्याभरात ९० हजार जणांनी नोंदणी केल्याचे मर्सिडिझ बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्याधिकारी एबहार्ड केर्न यांनी स्पष्ट केले.

Story img Loader