यूनायटेड स्पिरिट्स खरेदी प्रकरणात मुख्य प्रवर्तक विजय मल्ल्या यांच्याकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती देणे आपल्याला बंधनकारक नाही, अशी भूमिका ब्रिटनच्या डिआज्जिओने घेतली आहे. मल्ल्या यांच्या यूनायटेड स्पिरिट्सवर ताबा मिळविणाऱ्या डिआज्जिओच्या नव्या व्यवस्थापनाने यामार्फत राष्ट्रीय शेअर बाजारापाठोपाठ मुंबई शेअर बाजारालाही माहितीचा नकार कळविला आहे.
याबाबत बुधवारीच राष्ट्रीय शेअर बाजाराबरोबर माहिती देण्यास नकार देण्यात आला होता. तशी विचारणाच देशातील आघाडीच्या बाजार मंचाने केली होती. तसेच गुरुवारी मुंबई शेअर बाजाराबाबतही घडले. या दोन्ही बाजारांना कंपनीतील गैर व्यवहारांची माहिती देणे आपल्याला बंधनकारक नाही, असे यूनायटेड स्पिरिट्सने म्हटले आहे.
विजय मल्ल्या यांच्या अखत्यारितील यूनाटेड स्पिरिट्सवर २०१३ पासून ब्रिटनच्या डिआज्जिओने ५५ टक्के हिश्यासह ताबा घेतला. या व्यवहारात गैर आढळून आल्याचे नव्या प्रवर्तक कंपनीने गेल्या आठवडय़ात जाहीर करून अंतर्गत कंपनी वादाला तोंड फोडले होते. याबाबत सेबीकडून हस्तक्षेपाची अपेक्षा असताना सूचिबद्धता असलेल्या भांडवली बाजारांनीच कंपनीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजारांना त्यासाठी कंपनीने विरोध दर्शविला.
गोपनीयतेचे कारण देऊन यूनायडेट स्पिरिट्सने बाजारांची मागणी धुडकावली आहे. अशी माहिती जारी करून आपण स्पर्धक कंपन्यांना आयते कुरण देत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. उभय कंपन्यां दरम्यान झालेल्या समभाग हस्तांतरण प्रक्रियेबाबत काहीही सांगण्यासही नकार देण्यात आला आहे. यूनायटेड स्पिरिट्समध्ये मल्ल्या यांचा आता केवळ ४ टक्के हिस्सा आहे.
यूनायटेड स्पिरिटवरील मल्ल्या यांचे वर्चस्व संपुष्टात आले असून त्यांना आता अध्यक्ष व संचालक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कंपनीच्या नव्या व्यवस्थापनाने केली होती. त्याबाबत बाजारमंचाकडून विचारणा झाली. या प्रकरणात भांडवली बाजार नियामक म्हणून सेबीद्वारे अद्याप ठोस कारवाई अथवा चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळावरून बाजुला करण्याचा अधिकार केवळ भागधारकांना असल्याचा दावा करणाऱ्या मल्ल्या यांची यूनायटेड स्पिरिट्सपासून दूर होण्यातील असमर्थता अद्यापही कायम आहे.
यूनायटेड स्पिरिट्समधील हिस्सा खरेदी करताना मल्ल्या यांच्याबरोबर झालेल्या व्यवहारात गैर प्रकार घडला असून कंपनीतील पैसा त्यांनी त्यांच्या बुडत्या हवाई कंपनी किंगफिशरसाठी लावल्याचा आरोप डिआज्जिओ व्यवस्थापनाने केला होता. याबाबत आपण अंतर्गत चौकशी केल्याचा दावाही करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा