‘क्या आपने कभी ऑनलाइन हॉटेल सर्च किया हैं?’ हे वाक्य वाचल्यानंतर डोळ्यासमोर येतो तो मोठाल्या मिशा आणि विचित्र आवाजात बोलणाऱ्या ‘त्रिवागो’च्या जाहिरातीमधील त्या तरुणाचा चेहरा. ‘त्रिवागो’ या ऑनलाइन हॉटेल सर्च इंजिनची जाहिरात करणारी ही व्यक्ती आहे अभिनव कुमार. मात्र त्रिवागो बॉय म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अभिनवने त्रिवागो कंपनी सोडली असून तो ‘पेटीएम’ कंपनीमध्ये उपाध्यक्षपदी (व्हाइस प्रेसिडंट प्रोडक्ट मार्केटींग पदी) रुजू झाला आहे. पेटीएमच्या उत्पादन विपणन विभागाचे उपाध्यक्ष पदावर काम करताना दिसणार आहे.
अभिनव हा ‘त्रिवागो’चा भारतातील प्रमुख होता. मात्र मागील अनेक महिन्यांपासून तो पेटीएममध्ये रुजू होणार असल्याची चर्चा होती. अखेर या वृत्तावर पेटीएमनेच शिक्कामोर्तब केले आहे. ‘अभिनव हे आमच्यासोबत काम करणार असल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. उत्पादन आणि मार्केटींगमधील त्यांचा अनुभव कंपनीला फायद्याचा ठरेल. कंपनीचा व्याप वाढत असून देशभरामध्ये डिजीटल पेमेंटचे जाळे पसरवण्यासाठी अभिनव यांचा अनुभव आणि कौशल्य नक्कीच फायद्याचे ठरतील असा आम्हाला विश्वास आहे,’ असं पेटीएमने म्हटलं आहे. अभिनवने इटलीमधील टोरेंटो विद्यापिठामधून मास्टर्स इन इंटरनॅशनल मॅनेजमेंटमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. डिजीटल मार्केटींग क्षेत्रातील तज्ज्ञ आहे. तो मूळचा झारखंडचे असले तरी मागील अनेक वर्षांपासून मागील अनेक वर्षांपासून अभिनव जर्मनीमध्येच वास्तव्यास आहे.
अशी मिळाली ओळख
ज्या त्रिवागोच्या जाहिरातीमुळे अभिनवला ओळख मिळाली ती कंपनी मूळची जर्मनमधील आहे. ५६ हून अधिक देशांमध्ये ही कंपनी ऑनलाइन हॉटेल सर्चिंगची सेवा पुरवते. या कंपनीच्या जाहिरात धोरणानुसार प्रत्येक देशामध्ये आधी कधीही टीव्हीवर न दिसलेला चेहरा वापरला जातो. त्यामधूनच भारतात कंपनीने थेट भारतातील प्रमुख असणाऱ्या अभिनवला संधी दिली होती. भारतामधील बाजारपेठेसाठी ‘डेव्हलपमेंट हेड’ पदावर अभिनव कार्यरत होता. मध्यंतरी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने जाहिरातीमध्ये काम करण्यासंदर्भातील माहिती दिली होती. ‘बराच काळ शोध घेतल्यानंतरही आम्हाला जाहिरातीसाठी योग्य कलाकार मिळत नव्हता. अखेर कंपनीमधील मार्केटींग विभागाच्या प्रमुखांनी माझेच नाव पुढे केले आणि मला जाहिरातीमध्ये झळकण्याची संधी मिळाली. सुरुवातील मी नकार कळवला होता मात्र नंतर मी जाहिरात करण्यासाठी तयार झालो,’ असं अभिनवने सांगितले होते. अभिनव यांची जाहिरात इतकी लोकप्रिय झाली की त्यांना अनेकजण ओळखू लागले. काही महिन्यांपूर्वी अभिनव दिल्लीमध्ये आला होता त्यावेळी अगदी टॅक्सीवाल्यांपासून ते मॉलमधील लहान मुलानेही मला ‘त्रिवागो गाय’ म्हणून ओळखलं होतं असं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.