गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महागाई दर ओसरत असला, तरी लगेचच व्याजदर कपातीची संभावना नाही, असेच संकेत देत ‘अच्छे दिना’बाबत सबुरीनेच घ्यावे, असे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी शुक्रवारी येथे उद्योगक्षेत्रासमोर बोलताना केले.
कमी होत असलेल्या महागाईचा उत्सव साजरा करण्याची घाई करू नका, असा इशारा देत डेप्युटी गव्हर्नरांनी उद्योगांकडून होत असलेली व्याजदर कपातीची मागणीही अनाठायी ठरवीत अप्रत्यक्षरीत्या धुडकावून लावली.
भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वतीने मुंबईत आयोजित मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांच्या परिषदेत खान बोलत होते. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे मुख्य वित्तीय अधिकारी व्ही. एस. पार्थसारथी यांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले.
रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण २ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. गव्हर्नरपदाची दीड वर्षे पूर्ण करताना डॉ. रघुराम राजन यांनी वाढत्या महागाईचे कारण देत तीन वेळा व्याजदर वाढ केली आहे. सप्टेंबरमधील घाऊक तसेच किरकोळ महागाई दर कमालीचा खाली आल्याने यंदा व्याजदर कपातीची उद्योगांची आशा बळावली आहे.
डेप्युटी गव्हर्नर यांनी मात्र कंपन्यांची आर्थिक नाडी हाती असलेल्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांसमोरच संभाव्य व्याजदराची अटकळ मोडीत काढली. गेल्या काही दिवसांमध्ये महागाई दर निश्चित कमी झाला आहे असे मान्य केले, मात्र मध्यवर्ती बँकेला अपेक्षित असलेला दर अद्यापही दूरवर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महागाईवर अद्यापही वेतन, खर्च, अन्नधान्याच्या किमती, ग्रामीण भागातील महागाई यांचा जोर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महागाई दर कमी झाल्याच्या आनंदात उद्योग असले, तरी त्यांनी तो उत्सवरूपात साजरा करण्यासारखी स्थिती नाही; उलट यापेक्षा अधिक उत्तम स्थिती ही यापुढे आहे, असेही स्पष्ट केले.
ब्रिक देशांतील वाढत्या महागाईचा उल्लेख करत जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही सुधारलेली नाही, असे खान म्हणाले. भारतात महागाई कमी झाल्याच्या आनंदात राहणे म्हणजे उत्सव आधीच साजरा करण्यासारखे आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशातील विकासाचे वातावरण उत्तम असून, बचत तसेच गुंतवणूकही वाढत असल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. केंद्रातील स्थिर सरकार आर्थिक सुधारणा राबवीत असल्याचा हा परिणाम असला, तरी अद्याप पूर्ण स्थिती सुधारलेली नाही, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
सप्टेंबरमध्ये महागाई दर कमी होत ६.४७ टक्क्य़ांवर आला होता. रिझव्‍‌र्ह बँकेचे महागाई दराचे जानेवारी २०१५ साठीचे उद्दिष्ट ८ टक्के, तर पुढील वर्षभरासाठीचे लक्ष्य ६ टक्के आहे.
‘अभ्यास न करताच उद्योगांची विदेशात गुंतवणूक’
व्याजदरात नरमाईची अपेक्षा करणाऱ्या उद्योगांना केवळ कानपिचक्याच डेप्युटी गव्हर्नर खान यांनी या परिषदेच्या व्यासपीठावर दिल्या नाहीत, तर भारतीय कंपन्यांमार्फत विदेशात होणारी गुंतवणूक आणि विदेशातून निधी उभारणीबाबतही त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. भारतीय कंपन्या व त्यांचे प्रमुख हे पुरेशा अभ्यासाशिवायच विदेशातील गुंतवणुकीचे निर्णय घेत आहेत, असे विधान खान यांनी यावेळी केले. गेल्या चार वर्षांत विदेशातील गुंतवणुकीत चौपट वाढ झाली असली तरी अपुऱ्या अभ्यासामुळे गुंतवणुकीतून, व्यावसायिक भागीदारीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, असे निरीक्षणही खान यांनी नोंदविले.

Story img Loader