शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले. अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव कोसळले.
अदानी ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी गुंतवणुकदारांची खाती एनएनडीएलने गोठवली. या तिन्ही गुंतवणूकदारांनी अदानी समुहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जवळपास ४३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांची खाती सील केल्यानं याचा थेट परिणाम अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या समभागांवर (शेअर्स) झाला आहे. कंपन्यांच्या समभागांचे भाव पडले आहेत.
एनएसडीएलने अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तिन्ही गुंतवणूकदारांची खाती गोठवली आहे. गुंतवणूकदारांच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती दिलेली असून, एनएसडीएलने ३१ मे किंवा त्याआधी खाती गोठवली असावीत, असं म्हटलेलं आहे.
अदानी ग्रुपमधील कोणत्या कंपन्यांवर झाला परिणाम?
एनएसडीएलने केलेल्या कारवाईचे वृत्त समोर येताच शेअर बाजारात याचे पडसाद उमटले. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले. अदानी इंटरप्राईजेसचे शेअर १५ टक्क्यांनी घसरून १,३६१.२५ रुपयांवर आले. तर अदानी पोर्ट अॅण्ड इकॉनॉमिक झोन या कंपनीचे शेअर्सचे भाव १४ टक्क्यांनी खाली आले आहेत. अदानी पावरच्या शेअर्सवरही याचा परिणाम दिसून आला. कंपनीच्या शेअर्सचे भाव ५ टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांचे शेअर्सच्या भावामध्येही प्रत्येकी ५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
तीन गुंतवणुकदारांवर का करण्यात आली कारवाई?
कारवाई करण्यात आलेल्या तिन्ही खात्यांचे गुंतवणूकदार मॉरिशिसस्थित असून, अदानी इंटरप्राईजेसमध्ये ६.८२ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५.९२ टक्के, तर अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये ३.५८ टक्के गुंतवणूक केलेली आहे. या संबंधात अदानी समूहाकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार खातेदारांच्या मालकी हक्कांविषयी पुरेशी माहिती न दिल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. खाती गोठवण्यात आल्यामुळे हे तिन्ही गुंतवणूकदार स्वतःकडील शेअर्स विकू शकत नाही आणि नवीन खरेदीही करू शकत नाहीत.