मुंबई : आयसीआयसीआय बँक समूहात विविध उपक्रमांच्या नेतृत्वाची तीन दशकांची कारकीर्द राहिलेल्या विशाखा मुळय़े यांची आदित्य बिर्ला कॅपिटलच्या संचालक मंडळाने कंपनीच्या आगामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत असल्याची घोषणा केली आहे. त्या १ जुलै २०२२ पासून या पदाची सूत्रे हाती घेतील. कंपनीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अजय श्रीनिवासन यांची मुळय़े जागा घेतील. श्रीनिवास हे येत्या काळात आदित्य बिर्ला समूहामध्ये दुसरी भूमिका स्वीकारत असल्याचे सांगण्यात आले.
आदित्य बिर्ला कॅपिटलने शेअर बाजाराला दिलेल्या सुचनेनुसार, मुळय़े १ जून २०२२ रोजी कंपनीत रुजू होतील आणि नेतृत्वाचे सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी त्या एका महिन्याच्या कालावधीसाठी अजय श्रीनिवासन यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी (नियुक्त) म्हणून काम करतील. त्या त्यांच्या भूमिकेचा कार्यभार सांभाळतील. या कालावधीपश्चात कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या भूमिकेतून त्या कार्यभार सांभाळतील.
तब्बल ३० वर्षांच्या कारकीर्दीत, मुळय़े यांनी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या असून, या आधी त्या आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि आयसीआयसीआय व्हेंचर्सच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या.